धोक्याची घंटा! – महाराष्ट्र टाइम्स

जिथे सामाजिक सौहार्द मोठ्या प्रमाणावर आहे, देशांतर्गत समूहांतील, गटा-तटांतील कलह फारसा नाही, असंतोष कमी आहे, बाह्य संघर्ष नाही, तिथे शांतता अधिक असते. याच निकषांच्या आधारे शांतता नांदत असलेल्या देशांची जागतिक क्रमवारी ‘ग्लोबल पीस इंडेक्स’ या नावाने दरवर्षी प्रसिद्ध केली जाते. या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडमध्ये वांशिक कट्टरतावादाने पछाडलेला एक दहशतवादी हातात बंदूक घेऊन मशिदींत प्रार्थनेसाठी जनलेल्या निरपराधांवर बेछूटपणे गोळीबार करतो ही घटना संपूर्ण जगासाठी धक्कादायक आहे. धार्मिक आणि वांशिक कट्टरपंथीयांनी विविध देशांत छेडलेल्या दहशतवादी युद्धाचे लोण न्यूझीलंडसारख्या शांत देशापर्यंत पोहोचल्याने जगात एकही देश सुरक्षित नसल्याचा संदेश गेला आहे. दहशतवादाला धर्म नसतो हेही यातून अधोरेखित झाले. एखाद्या माथेफिरूने बंदूक घेऊन बेछूट गोळीबार करण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या; परंतु त्यांमध्ये आणि शुक्रवारी ख्राइस्टचर्चमध्ये घडलेल्या घटनांत मूलभूत फरक आहे; कारण या घटनेतील ब्रेंटन टॅरेंट हा हल्लेखोर केवळ माथेफिरू नाही. वांशिक वर्चस्ववादाने तो पछाडला आहे. अन्य वांशिकांच्या विरोधातील विष त्याच्या मेंदूत भिनले आहे आणि ते वरचढ ठरू नयेत यासाठी त्यांना ठार मारण्याच्या निष्कर्षापर्यंत तो आला आहे. म्हणूनच निरपराधांना मारण्याआधी त्याने आपला कथित ‘जाहीरनामा’ पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आणि सोशल मीडियावरही तो टाकला; त्यानंतर प्रत्यक्ष हत्याकांडाचे फेसबुकवर त्याने प्रक्षेपणही केले. त्याची ही कृती माथेफिरूची नव्हे, तर दहशतवादाची आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंड आर्डर्न यांनी त्याचा ‘दहशतवादी’ असा केलेला उल्लेख म्हणूनच योग्य आहे. ४९ निरपराधांचा बळी घेणाऱ्या या दहशतवादी कृत्यानंतर आर्डर्न आणि त्यांच्या प्रशासनाने परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली आणि हल्लेखोराच्या कृत्याची कारणमीमांसा करण्याच्या बहाण्याने कोणतीही सबब सांगितली नाही. असे हल्ले झाल्यानंतर बळींना श्रद्धांजली वाहून, त्यांच्या नातेवाइकांचे सांत्वन करून झाले, की ‘ही वेळ का आली याचा विचार करण्याचा’ सल्ला काही मंडळी देत असतात. गेल्या एक-दोन दशकांत आशिया आणि आफ्रिका या खंडांतील लोक मोठ्या संख्येने युरोपीय देशांत; तसेच अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांत स्थलांतरित होत आहेत. त्यांच्यामुळे आपल्या नोकऱ्या जात आहेत, आपले संख्याबळ कमी होत आहे, आपण असुरक्षित होत आहोत, असा युक्तिवाद काही देशांत वाढतो आहे आणि तेथील काही राजकीय पक्ष तो उचलून धरत आहेत. यातूनच संघर्षाच्या ठिणग्याही पडत आहेत. गेल्या काही वर्षांत ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांत वांशिक हल्ले होत आहेत. यातून एक ‘श्वेत राष्ट्रवाद’ जोरकसपणे पुढे मांडला जात आहे; तसेच मुस्लिमांच्या विरोधात (इस्लामफोबिया) भीतीही निर्माण केली जात आहे. न्यूझीलंडमध्ये हल्ला घडवून आणलेला टॅरेंट हा दहशतवादीही इस्लामफोबियाने पछाडलेला श्वेत राष्ट्रवादी असल्याचे त्याच्या कथित जाहीरनाम्यावरून दिसते. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हे जरी प्रशांत महासागरातील देश असले, तरी त्यांची नाळ युरोपशी जोडलेली आहे. म्हणूनच तिथेही श्वेत राष्ट्रवाद पसरविण्याचा प्रयत्न कट्टरपंथी करीत आहेत. मूळ ऑस्ट्रेलियन असलेला टॅरेंट हा त्यांपैकीच एक. तो एकांडा आहे की त्याच्या मागे एखादी विकृतांची टोळी आहे हे चौकशीनंतर कळेल. त्याच्या मागे तशी टोळी किंवा कडवी संघटना नसली, तरी एकांड्या विकृताचे कृत्य म्हणून या घटनेला बाजूला सारता येणार नाही. टॅरेंटने ‘जाहीरनाम्या’त भारत आणि टर्की या देशांचा थेट उल्लेख केला आहे. ‘या देशांसह आफ्रिकी देशांतील लोक आपल्या देशांत येऊन त्यांची संख्या वाढवित आहेत; त्यांच्यापासून धोका आहे,’ असे नमूद करून या लोकांना युरोपच्या भूमीवरून हाकलून देण्याचा मुद्दा त्याने मांडला आहे. ‘जर ते आपले लोक नसतील तर ते या भूमीत का,’ असा सवाल करून टॅरेंटने स्थलांतराने येणाऱ्या बहुसांस्कृतिकतेलाच आव्हान दिले आहे. टॅरेंटची ही भाषा नवी नाही. जगभर ती ऐकू येतच आहे. किंबहुना, ती बोलणाऱ्यांची संख्या वाढते आहे आणि मते मिळविण्यासाठी राजकारणीही अशांच्या सुरात सूर मिसळत आहेत. वास्तविक, बहुसांस्कृतिकतेतून मोठ्या प्रमाणावर प्रगती होते. अमेरिका हे याचे उत्तम उदाहरण आहे. मात्र, तिला नाकारून वर्चस्ववादासाठी राष्ट्रवाद अधिक संकुचित करण्याचा प्रयत्न वाढतोच आहे. त्याला कट्टरतेची जोड मिळाल्यास दहशतवाद फोफावतो. या घटनेने ती अधोरेखित केली. म्हणूनच ती जगासाठी आणि भारतासाठीही धोक्याची घंटा आहे.

via Editorial News: धोक्याची घंटा! – warning bell | Maharashtra Times

Leave a Reply