आपल्या कामाचा ठसा उमटवल्यावर आणि मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे कामकाज प्रभावीपणे पाहिल्यानंतर बर्वे यांना सोलापूरला राज्य राखीव पोलिस दलात पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. तेथून परत मुंबईच्या वाहतूक शाखेत सहपोलिस आयुक्त झाल्यावर त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे अनेक कल्पक प्रकल्प राबविले. नाशिकला पोलिस प्रशिक्षण केंद्राचे संचालक असताना त्यांच्या शिस्तीचा प्रत्यय प्रशिक्षण घेणाऱ्या पोलिसांना आला. महाराष्ट्र पोलिस मुख्यालयात अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशासन) पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर त्यांची महाराष्ट्र सुरक्षा बल आणि तेथून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक ते मुंबईचे पोलिस आयुक्त या सेवाकाळात त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटविला. घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर येथे उसळलेल्या दंगलीत त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी स्वतःला झोकून दिले होते. तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळ्यातही तपासणी अधिकारी म्हणून बर्वे यांनी अतिशय उत्तम तपासकाम केले. मुंबईसारख्या शहराच्या कायदा सुव्यवस्थेची चांगली जाण त्यांना आहे.
शिस्तीचा अधिकारी – श्री संजय बर्वे –महाराष्ट्र टाइम्स
शिस्तीचा अधिकारी
कडक शिस्तीचे संजय बर्वे मुंबईचे बेचाळिसावे पोलिस आयुक्त आहेत. सुबोध जयस्वाल पोलिस महासंचालक होणार हे निश्चित झाल्यानंतर बर्वे आणि अपर पोलिस महासंचालक परमवीर सिंह यांच्या नावांची चर्चा होती. १९८७च्या आयपीएस बॅचचे बर्वे यांची पहिली नियुक्ती अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नाशिकमध्ये झाली. करड्या शिस्तीचा अधिकारी म्हणून ते तेव्हापासूनच प्रख्यात आहेत. नाशिकनंतर १९९० साली नागपूरला अतिरिक्त पोलिस अधीक्षक बनले. नागपूरनंतर गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात अधीक्षकपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. यानंतर वर्धा येथून पुढे १९९०मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत मध्य, पूर्व आणि पश्चिम मुंबईत परिमंडळ तीन, सहा आणि आठची जबाबदारी त्यांनी संभाळली.