सीए प्रफुल्ल छाजेड
प्रश्न
मी व माझी पत्नी निवृत्त ज्येष्ठ नागरिक असून माझ्या मुलाला एक फ्लॅट घ्यायचा आहे. त्यासाठी त्याला काही गृहकर्ज घ्यावे लागणार आहे. त्याने बँकेकडून कर्ज घेण्यापेक्षा आमच्या बचतीतील काही मुदतठेवी बंद करून किंवा मोडून त्यातून मिळणारी रक्कम त्याला कर्जरूपाने दिली आणि अशा माझ्या व माझ्या पत्नीच्या ठेवींतून दिलेल्या कर्जाऊ रकमेवर सहा टक्के व्याज आकारले तर चालेल का? बँकेचे कर्जदर यापेक्षा अधिक आहेत. आम्हाला त्याने हे व्याज दिल्यास त्याला त्यावर करलाभ मिळेल का?
– एक मटा वाचक, मुलुंड, मुंबई
उत्तर
घर खरेदी करण्यासाठी मुलगा जवळच्या नातेवाईकांकडून कर्ज घेऊ शकतो. अशा कर्जाची परतफेड करताना दिलेल्या व्याजाबद्दल प्राप्तिकर कलम २४ अंतर्गत मर्यादित सूटदेखील घेता येते. व्यवहार मात्र बँकेमार्फत आणि काळजीपूर्वक करावेत. संपूर्ण हिशेबाची नीट नोंद ठेवावी, जेणेकरून प्राप्तिकर विभागाकडून विचारणा झाल्यास अडचण होणार नाही.
प्रश्न
माझा २०१२ मध्ये घेतलेला फ्लॅट विकून दुसरा, बांधकाम चालू असलेला किंवा तयार ताबा असलेला मोठा फ्लॅट मला घ्यायचा आहे. फ्लॅट विकून आलेला पैसा मोठ्या फ्लॅटच्या खरेदीसाठी तीन ते सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने किंवा एकरकमी मी गुंतवणार आहे. या कालावधीपर्यंत कॅपिटल गेन टॅक्स वाचवण्यासाठी हाती आलेली पहिल्या फ्लॅटची रक्कम कुठे गुंतवू? त्याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.
– सुभाष के., मुंबई
उत्तर
नवीन घर खरेदीस उशीर होणार असेल तर, जुने घर विकताना झालेला नफा बँकेत विशिष्ट खाते उघडून त्यात ठेवता येईल. जवळच्या राष्ट्रीयीकृत बँकेत संपूर्ण माहिती मिळेल.
प्रश्न
आमच्या सोसायटीला तिच्यात राहणाऱ्या सदनिकाधारकांकडून मिळणाऱ्या देखभाल खर्चाव्यतिरिक्त (मेन्टेनन्स चार्जेस) बँक मुदतठेवींवर मिळमारे व्याज असे उत्पन्न मिळते. गृहनिर्माण सोसायट्यांनाही प्राप्तिकर लागू होतो का? सोसायटी स्वतःजवळ असलेले भांडवल भागधारकाला कर्जाऊ देऊ शकते का?
– डी. बी. जैन, पुणे
उत्तर
सहकारी गृहनिर्माण सोसायटीला मुदतठेवींवरील व्याज हे दुसऱ्या सहकारी बँकेकडूनच मिळालेले असल्यास प्राप्तिकर कलम ८०(पी)(डी) अंतर्गत सूट घेता येईल. सहकारी संस्थेलादेखील प्राप्तिकर देय असतो व विवरणपत्रही भरावे लागते. सोसायटी आपले पैसे सभासदांना देऊ शकत नाही.
via keep the record of accounts | हिशेबांची नोंद नीट ठेवा – Maharashtra Times