‘कोविड संपल्यानंतर देशाला आलेल्या अनुभवाअंती नवा भारत जन्माला येईल,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये सांगितले आहे…
मुंबई महापालिकेत शंभर टक्के हजेरी पाहिजे, असा निर्णय घ्यायचा. ते शक्य होत नाही, असे लक्षात आल्यावर पुन्हा त्यात बदल करायचा. उन्हाळा असल्यामुळे नागरिकांना शिजवलेल्या अन्नापेक्षा धान्य द्या, त्यांचीच तशी मागणी आहे, असे लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना वारंवार सांगून झाले आहे; मात्र निवृत्तीनंतर सेवावाढ मिळालेले काही ‘झारीतील शुक्राचार्य’ पेशवाईतील घाशीराम कोतवालासारखे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. महाराष्ट्रातून परराज्यात जाण्यासाठी आसुसलेल्या गरीब कामगारांना करोनाची लक्षणे नाहीत, हे प्रमाणपत्र देण्यासाठी अनेक डॉक्टर बक्कळ पैसा उकळत आहेत. दारूची दुकाने पन्नास दिवसांनंतर उघडल्यानंतर, त्या दुकानांमध्ये गर्दी उसळेल, इतका साधा अंदाज प्रशासनातील एकालाही कसा येऊ नये? दारूची दुकाने बंद करण्यामागे नक्की कोणता तर्क होता? दारूमुळे करोना विषाणू अधिक वेगाने वाढतो, असा काही शोध लागला आहे का? तरीही राज्यातील सगळी दुकाने बंद केली. मग अचानक पन्नास दिवसांनी ती लहर आल्यासारखी उघडायचा आदेश आला. दुकाने उघडायचीच होती, तर उडणाऱ्या झुंबडीचा अंदाज घेऊन, त्या प्रकारची व्यवस्था, दारू घरपोहोच करण्यासाठी काही व्यवस्थापन, या उपायांबाबत यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेत सामान्य ज्ञानाच्या विषयात उत्तीर्ण झालेल्या, एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याला सुचवावेसे का वाटले नाही? स्वतःचेच म्हणणे पुढे रेटत राहायचे, हा संदेश केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांमध्येही व्यवस्थित रुजल्याचे सर्वत्र दिसते आहे. टाळेबंदीच्या चाळीस दिवसांत चार हजार वेगवेगळ्या निर्बंधांचे निर्णय केंद्रातील नोकरशाहीने घेतले. नोएडासारख्या शहरातील पोलिस अधिकारी ‘आरोग्य सेतू’ हे अॅप डाउनलोड न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रक बिनधास्त काढत आहेत. एकंदर इंग्रजी राजवटीचा एकछत्री अंमल लागू होण्यापूर्वीची ‘खुल्क खुदा का, मुल्क बादशहा का, राज कंपनी सरकार का,’ अशी परिस्थिती सर्वत्र तयार झाल्याचे दिसते आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांमधील मंत्री इतके नाराज आहेत, की करोनानंतर राजकीय भूकंप तर होणार नाही ना, अशी भीतीही काही समंजस नेत्यांना वाटू लागली आहे. एक तर अशा उफराट्या कारभारामुळे जनता प्रचंड त्रस्त व संतप्त झाली आहे. कुणालाच कुणाचा पायपोस नसल्यामुळे, दाद तरी कोणाकडे मागायची, असा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधींकडे जावे, तर जिथे मंत्र्यांची डाळ शिजत नाही, तिथे सामान्य आमदार, नगरसेवकांना कोण विचारतो? सरकारी कार्यालयात छोटेमोठे नोकरशहा एरवीही कसे मुजोरीने व मस्तीत वागतात, हे सगळ्यांना माहीत आहे. आता करोनाच्या नावाखाली त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढले आहे. या अनागोंदीत कठोर राजकीय निर्णयक्षमतेला दुसरा पर्याय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही क्षमता लवकर दाखवतील, इतकीच अपेक्षा आहे. निर्नायकीचे हे थैमान परवडणारे नाही.
via Editorial News : निर्नायकीचे थैमान – new india after covid 19 says pm modi | Maharashtra Times