रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं गुरुवारी रात्री कारवाई करत सीकेपी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळं बँकेच्या ठेवीदारांना मोठा धक्का बसला आहे. बँकेतील सुमारे ४८५ कोटींच्या ठेवी त्यामुळं संकटात सापडल्या आहेत.
दादरमध्ये मुख्यालय असलेल्या सीकेपी बँकेचा तोटा वाढल्याने व नक्त मूल्यात मोठी घट झाल्याने बँकेच्या व्यवहारांवर २०१४ मध्ये निर्बंध आणले गेले. त्यानंतर अनेकदा या बँकेचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी ठेवीदारांनीही प्रयत्न केले. त्याचे निकाल काही प्रमाणात दिसू लागले होते. तोटा कमी होत होता. पण त्याचवेळी रिझर्व्ह बँकेने सीकेपी बँकेचा परवानाच रद्द करीत ठेवीदारांना मोठा धक्का दिला.
बँकेच्या ठेवीदार फोरमचे अध्यक्ष व माजी संचालक राजू फणसे यांनी ‘मटा’ला सांगितले की, ‘बँक पुन्हा उभी राहावी, यासाठी ठेवीदारांकडून प्रयत्न सुरू होते. ठेवीदारांनी व्याजदरात कपात करून घेतली. व्याजदर २ टक्क्यांपर्यंत आणले. स्वत:च्या ठेवी भागभांडवल म्हणून परावर्तित केल्या. अन्य बँकांप्रमाणे बँकेला आर्थिक मदत मिळाल्यास बँक वाचू शकेल, यासाठी सरकारला अनेक पत्रे पाठविण्यात आली. उच्च न्यायालयात हा विषय मांडण्यात आला आहे. ठेवीदारांनी प्रयत्न केल्यानेच मार्च २०२० अखेरपर्यंत बँक परिचालनात्मक नफ्यात आली. संचित तोटा असल्याने ताळेबंद तोट्यात दिसतो. पण वास्तवात बँक पुनरूज्जीवन होण्याच्या स्थितीत नक्कीच आहे. तसे असतानाच रिझर्व्ह बँकेने ही कारवाई करून ठेवीदारांवर अन्याय केला आहे.’
रिझर्व्ह बँक २०१४ पासून सातत्याने बँकेवरील निर्बंधांना मुदतवाढ देत आहे. आता अलिकडील मुदतवाढ ३१ मार्चला देण्यात आली. ती ३१ मे रोजी संपणार होती. त्याआधीच रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला. परवाना रद्द केल्याच्या वृत्ताला मुंबईचे विभागीय सहकार सह आयुक्त संतोष पाटील यांनी ‘मटा’शी बोलताना दुजोरा दिला. बँक सध्या सहकार विभागाच्या प्रशासकांच्या नियंत्रणात आहे.
नक्त मूल्यातील घट कारणीभूत
नक्त मूल्यातील घट हे सीकेपी बँकेचा परवाना रद्द करण्यासाठी कारणीभूत ठरले, असे संबंधितांचे म्हणणे आहे. २०१६ मध्ये बँकेचे नक्त मूल्य उणे १४६ कोटी रुपये होते. ते आता उणे २३० कोटी रुपयांवर आले आहे. परिचालनात्मक नफा असला तरी नक्त मूल्यात घट होत असल्यानेच परवाना रद्द झाला, असे संबंधितांनी स्पष्ट केले.
बँकेची स्थिती अशी
एकूण ठेवीदार-खातेदार : १ लाख ३१ हजार ५००
एकूण ठेवी : ४८५ कोटी रुपये
एकूण भागधारक : ४५ हजार ९१४
भाग भांडवल : ६२.५० कोटी रुपये
एकूण कर्जे : १५ हजार ८०६ कोटी रुपये
एनपीए टक्क्यांत : ९७ टक्के
नक्त मूल्य (नेट वर्थ) : उणे ४७.४५ टक्के (उणे २३०.१५ कोटी रुपये)