लघु उद्योजकांनी आता काय करणे अपेक्षित आहे ? — भाग एक –अनिल तिकोटेकर-

आलेल्या संकटामुळे जवळ जवळ सर्वच लघु उद्योजक संकटात सापडले आहेत.  त्यांचे व्यवसाय तर सध्या बंद आहेतच पण व्यवसाय सुरु करायची वेळ आली तर काय करायचे याबाबत त्याच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.

जेंव्हा व्यवसाय चालू होता तेंव्हाही तो व्यवसाय फार चांगल्या पध्दतीने चालला होता असे नव्हतेच.  त्याच्या समोर उभ्या असलेल्या प्रश्नाचे स्वरूप साधारणपणे खालीलप्रमाणे होते.

  1. कॅश फ्लो नेहमीच नाही पण बऱ्याच वेळेस निगेटिव्ह असायचा.  बऱ्याच जणांना कॅश फ्लो काढण्याचा अनुभव नसायचा. त्याबाबत त्याला त्यांच्या सल्लागारावर अवलंबून राहायला लागायचे.
  2. कॅश फ्लो काढला तर त्यातून दिसून येणारी तुट कशी भरून काढायची हे त्याला समजायचे नाही.  गरज पडली की [ म्हणजेच कॅश फ्लो निगेटिव्ह असला तर ] बँकेकडे जाऊन ओवरड्राफ्ट मागणे हाच एक राजमार्ग त्याला माहित असायचा. काही वेळेस ओवरड्राफ्ट मिळायचा देखील पण त्याची परतफेड करताना  अडचणी यायच्या व त्यामुळे बँकेबरोबरील संबंध बिघडायचे.
  3. अवलंबून राहावे असा कर्मचारी वर्ग नसायचा –असलाच तर तो कधी नोकरी सोडेल याचा नेम नसायचा.  दुसरी कंपनी जास्त पगार देऊन अशा कर्मचाऱ्याला पळवून नेण्याचे प्रमाण कमी नव्हते.
  4. बँकेकडे वेळेवर माहिती देता यायची नाही. विशेषतः ताळेबंद , मालसाठा पत्रक वगैरे.  याबाबात कायम सल्लागार किंवा माहितगार कर्मचाऱ्यावर अवलंबून राहावे लागत असे. तसेच —किंबहुना माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचे —अशी माहिती सही साठी आल्यानंतर ती माहिती  ढोबळ मानाने का होईना  बरोबर आहे की नाही हे तपासून बघण्पायासाठी चे कसब संबधित लघु उद्योजकाकडे नसायचे. परिणामी असा दिलेला डेटा जर चूक निघाला तर त्याला असा डेटा दुरुस्त करायला वेळ तर लागायचाच पण बँकेबरोबर जे गैरसमज व्हायचे ते वेगळेच.
  5. ज्यांना माल विकला आहे त्यांच्याकडून वेळेवर [ व हक्काचे ] पैसे येण्याचे प्रश्न उपस्थित व्हायचे. ज्यांनी वेळेवर पैसे दिले नाहीत अशा मध्ये मोठ्या कंपन्या तसेच सरकारी कंपन्या देखील असायच्या –ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येण्याची मुभा होती / मार्ग   उपलब्ध होता पण हा मार्ग खर्चिक व वेळखाऊ असायचा व त्यामुळे ताबडतोब काही उसंत मिळायची नाही. महत्वाचे म्हणजे अशा कंपन्या            [ सरकारी वा गैर सरकारी ] परत आर्डर देत नसत. त्यामुळे व्यवसाय बाधित होत असे. त्यामुळे कायदेशीर कारवाई करण्याआधी दहादा विचार करावा लागत असे.  एवढे करून अशा थकीत बिले असणाऱ्या कंपन्यानी नवीन आर्डर दिली तर तीही  नाकारून चालत नसे. थोडक्यात काय  तर  तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी परिस्थिती असायची.
  6. कच्चा माल वेळेवर न मिळणे ही एक कायमची अडचण असायची. बऱ्याच वेळेस कच्चा माल रोखीने घ्यायला लागायचा. काही वेळेस दबाव तंत्राला बळी पडून गरजेपेक्षा जास्त माल देखील घ्यावा लागत असे. त्यामुळे निर्माण होणारे  प्रॉब्लेम सोडवता सोडवता नाकी नऊ यायचे.
  7. याबरोबरच व्यक्तीगत अडचणी यायच्या व त्यामुळे व्यवसायाकडे दुर्लक्ष व्हायचे ते वेगळेच.

लघु उद्योजक अशा संकटात असताना सबंध राज्यच काय देश तसेच जगच एका अभूतपूर्व संकटात सापडले व सर्व व्यवहार सर्वच  ठिकाणचे ठप्प्प झाले.

आलेले संकट किती गंभीर होते याचा अंदाज भल्या भल्यांना आला नाही तर बिचाऱ्या लघु उद्योजकाची काय कथा.

आता या संकटातुन मार्ग काढण्याचे प्रयत्न चालू आहेत.  त्यातील काही संकल्पित योजना खालीलप्रमाणे

  1. पुढील काही महिने  कर्जाचे हफ्ते दिले नाही तरी चालतील.
  2. व्याज भरण्यास वेळ मिळण्याची शक्यता आहे.
  3. ज्यादा कर्ज –सुलभ अटीवर मिळण्याची सोय झाली आहे.
  4. निर्यात होण्यासाठी वाढीव मदत मिळण्याची शक्यता आहे.

पण मला वाटते की मुलभूत प्रश्नाकडे आपण अजूनही लक्ष देऊ शकत नाही. अर्थात याला सरकार जबाबदार नाही ना बँक ना संबधित लघु उद्योजक. जोपर्यंत मूलभूत प्रश्न / अडचणी काय आहेत हे समजत नाही तोपर्यंत मार्ग काय काढायचे याचा विचार करता येत नाही.

अडचणी काय आहेत हे आपण सविस्तर समजून घेऊ या पुढील भागात. तोपर्यंत काही लिंक मी सोबत जोडत आहे त्या वेळ मिळेल त्याप्रमाणे पाहाव्यात .

MSME: In the fight against Covid-19, MSMEs and startups can help each other – The Economic Times

Coronavirus outbreak: Credit flow to MSMEs needs to grow 20% from 2% to address growing unemployment–Business Today

शक्य असल्यास पुढील  संकेतस्थळ पहावे

Leave a Reply