महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्या काही ज्येष्ठ मंत्र्यांशी सल्लामसलत करावी, त्यांचे भले ऐकायचे नसेल पण निदान त्यांना विश्वासात घ्यावे, हे संकेत ट्रम्प पाळत नाहीत..
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एकटय़ाच्या जिवावर काय काय करणार हा प्रश्नच आहे. तो कोणा एका टिंबाएवढय़ा देशाच्या प्रमुखाबाबत पडला असता तर त्याची दखलही घ्यावी लागली नसती. परंतु तो पडला आहे जगातील एकमेव महासत्ताप्रमुखाबाबत. त्यामुळे त्याची दखल घ्यावी लागते आणि काळजीही करावी लागते. त्यात पुन्हा भारतीय म्हणून ही काळजी अधिकच. कारण ट्रम्प यांचा हात सोडून त्यांना सोडचिठ्ठी देणारे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस हे अमेरिकी प्रशासनातील त्यातल्या त्यात अधिक असे भारतमित्र. भारताविषयी त्यांना ममत्व आहे. ट्रम्प यांच्या िहदोळी धोरणास काही प्रमाणात का असेना पण स्थिरता देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यास गेले असताना ट्रम्प आणि मोदी यांच्यात विख्यात कॅम्प डेव्हिड येथे बैठक व्हावी अशी त्यांची इच्छा होती. या कॅम्प डेव्हिडचे म्हणून एक स्थानमाहात्म्य आहे. इस्रायल आणि पॅलेस्टीन यांच्यातील शांतता करार ते अनेक महत्त्वाच्या जागतिक परिषदा या कॅम्प डेव्हिड येथे घडल्या. जागतिक राजकारणात काहीएक स्थान असणाऱ्यांचा पाहुणचार अमेरिकी अध्यक्ष कॅम्प डेव्हिड येथे करतात. एक लोकशाही देश म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या समवेतही तेथे एखादी बैठक आयोजित करावी असा मॅटिस यांचा प्रयत्न होता. तो ट्रम्प यांनी यशस्वी होऊ दिला नाही. आता या मॅटिस यांच्या मंत्रिमंडळातील अस्तित्वावरच फुली मारून ट्रम्प यांनी त्यांनाही नाकारले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन, व्हाइट हाऊसचे प्रशासनप्रमुख रिन्स प्रिबस, ट्रम्प यांचे जनसंपर्क संचालक अँथनी स्कारामुची, आरोग्यमंत्री टॉम प्राइस हे मान्यवर तर अत्यल्प काळ ट्रम्प यांच्याबरोबर टिकले. याखेरीज ट्रम्प यांच्या दोन डझनभर सहकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत राजीनामा दिला. यापैकी सर्वात ताजी घटना म्हणजे मॅटिस यांची अमेरिकी अध्यक्षास अशोभनीय अशी गच्छंती. वास्तविक २०१९च्या मार्चपासून आपण या पदावर राहणार नाही, असे खुद्द मॅटिस यांनीच सूचित केले होते. पण हे दोन महिनेही ट्रम्प यांना धीर धरवला नाही. अत्यंत अशोभनीय पद्धतीने अमेरिकेतील या सर्वोच्च मानांकित सनिकावर पदत्यागाची वेळ आली. अमेरिकी प्रशासनात जे काही सुरू आहे ते सारेच काळजी वाढवणारे.
याचे कारण ट्रम्प यांची बेतास बात अशी समजशक्ती. सीरिया या देशातून अमेरिकी फौजा तडकाफडकी काढून घेण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला. असे काही महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्या काही ज्येष्ठ मंत्र्यांशी सल्लामसलत करावी, त्यांचे भले ऐकायचे नसेल पण निदान त्यांना विश्वासात घ्यावे, काही अधिकाऱ्यांना आपल्या संभाव्य निर्णय आणि परिणामांची कल्पना द्यावी वगैरे सभ्य संकेती परंपरांवर ट्रम्प यांचा काडीचाही विश्वास नाही, हे आतापर्यंत अनेकदा दिसून आले. ‘आले ट्रम्पोजींच्या मना..’ हेच त्यांचे धोरण. दुसऱ्या महायुद्धापासून अमेरिकेचा मित्र राहिलेल्या दक्षिण कोरियातूनही ट्रम्प यांना अमेरिकी सेना मागे घ्यायच्या होत्या. शेजारील उत्तर कोरियाच्या प्रमुखास ट्रम्प यांनी ठार वेडा ठरवले आणि नंतर काही महिन्यांनी त्याच्यावर आपले प्रेम आहे असे सांगत दक्षिण कोरियास वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला. त्यांचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी त्यास विरोध केला. त्यांचे आणि ट्रम्प यांचे खटके उडाले आणि अखेर टिलरसन यांना जावे लागले. एक्झॉन मोबिल या जगातील सर्वात मोठय़ा कंपनीचे ते एके काळचे प्रमुख. जागतिक अर्थकारणातील बडी असामी. पण ते म्हणजे दगड आहेत, असे त्यांच्याविषयी ट्रम्प यांचे मत. तर ट्रम्प यांची आकलनशक्ती इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांइतकी आहे, अशी टिलरसन यांची खात्री. या अशा परिस्थितीत अमेरिकी परराष्ट्र धोरणाचे किती तीनतेरा वाजत असतील याचा अंदाज बांधण्यास अभ्यासक असण्याची मुळीच गरज नाही.
ट्रम्प यांचे सहकारी मतभेद होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जागतिक राजकारण, अर्थकारण याचे ट्रम्प यांना असलेले शून्य भान. दुसऱ्या महायुद्धानंतर विविध देशसंघटना जन्माला आल्या त्यातील सर्वात प्रबळ नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, म्हणजे नाटो. या संघटनेत मोठा वाटा अमेरिकेचा. पश्चिम आशियातील उलथापालथीत या संघटनेची सक्रिय आणि निर्णायक भूमिका असते. लीबियातून कर्नल मुअम्मर गडाफी याची राजवट उलथून पाडण्याची जबाबदारी या नाटो संघटनेने पार पाडली. तेथील लष्करी कारवाईचे नेतृत्व या संघटनेने केले. तसेच टर्की वा सीरिया येथील संघर्षांतही या संघटनेचे काम नि:संशय मोलाचे आहे. पण ट्रम्प यांचा नाटोलाही विरोध. त्यातून त्यांचे आणि युरोपीय देशप्रमुखांचे वाजले. या एके काळच्या आपल्या सहकारी देशांबरोबर संबंध सुधारायला हवेत, असे मॅटिस यांचे प्रयत्न होते. ट्रम्प यांना ते मान्य नाही. या सगळ्यासंदर्भात ट्रम्प एकतर्फी घोषणा करीत गेले आणि त्या त्या मंत्र्यांना संकटात टाकत राहिले. यातील ताजा वाद म्हणजे सीरिया. या देशातून अमेरिकी फौजा पूर्णपणे मागे घेतल्या गेल्या तर त्या देशाचे प्रमुख बशर असाद यांना मोकळे रान मिळेल, तेव्हा त्यांच्यावर वचक म्हणून तरी आपल्या फौजा तेथे असायला हव्यात, असे मॅटिस आणि अन्य अधिकाऱ्यांचेही मत होते आणि ते रास्तच होते. अलीकडेच सीरियावर अमेरिकी फौजांनी बॉम्बफेक केली. असाद यांना इशारा देण्याचा उद्देश त्यामागे होता. तो कितपत साध्य झाला याबाबत तसा संशयच आहे. असाद हे एका बाजूला रशिया आणि दुसरीकडे इराण या देशांशी संधान बांधून आहेत, याचे अनेक दाखले समोर येत असताना ट्रम्प यांना त्या देशातून सन्य मागे घेण्याची उपरती झाली.
यास मॅटिस यांचा विरोध होता. किंबहुना आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणास काही किमान सातत्य हवे, असाच त्यांचा प्रयत्न होता. अमेरिकी लष्करात अत्यंत मानाचे स्थान भूषविलेला हा सेनानी प्रशासनातही आदर राखून होता. ट्रम्प यांच्या चक्रम कारकीर्दीतील भरवशाचा साथीदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पण त्यांची कसलीही तमा ट्रम्प यांनी बाळगली नाही. एका साध्या ट्वीटद्वारे त्यांनी नवा संरक्षणमंत्री नेमत असल्याचे जाहीर करून टाकले. कोणताही स्वाभिमानी हा असा अपमान सहन करणार नाही. मॅटिस यांनीही तेच केले. आपल्या पदाचा राजीनामा दिला.
ही मोठी खळबळजनक घटना. अमेरिकेत गेले काही आठवडे अशांतता आहे. त्याची प्रमुख कारणे आर्थिक म्हणता येतील. अमेरिकी भांडवली बाजार १९३० नंतरच्या नीचांकी अवस्थेकडे घरंगळत निघालेला असताना मॅटिस यांनी राजीनामा दिल्याने वातावरणात अधिकच नराश्य दाटेल यात शंका नाही. ऐन नाताळाच्या तोंडावर हे घडल्याने यंदा सांताक्लॉजच्या पोतडीत नक्की दडले आहे काय, असा प्रश्न सुज्ञ अमेरिकनांना पडलेला दिसतो. नागरिकांत घालमेल, प्रशासन गोंधळलेले अणि अध्यक्ष ट्रम्प मात्र नाताळ आणि वर्ष अखेरच्या मौजमजेसाठी सुटीवर अशी अवस्था त्या देशात आहे. परिस्थिती मोठी कठीणच म्हणायची.
स्वत:वर प्रेम असल्याखेरीज इतरांचे नेतृत्व करता येत नाही, हे मान्य. परंतु स्वत:वर इतकेही प्रेम नको की ज्यामुळे इतरांची गरजच वाटणार नाही. एखाद्या साध्या संसारी गृहस्थास असे वाटले तरी एक वेळ ठीक. पण एका महासत्तेच्या प्रमुखाचे विचारविश्व मी.. माझे.. आणि माझेच इतक्यापुरतेच मर्यादित असेल तर तो धोक्याचा गंभीर इशारा ठरतो. त्याच्यासाठी तसेच अन्यांसाठीही.