महत्त्वाच्या टिप्स : सोसायट्यांनी अशी घ्यावी घरकामगार, लिफ्टची काळजी | eSakal

Clipped from: https://www.esakal.com/

लॉकडाउननंतर जनजीवन काही प्रमाणात सुरळीत होत असताना संसर्ग वाढण्याच्या घटनाही दिसून येत आहेत. 

Dr Deepak Mhaisekar housing societies should take care of maids and lifts

लॉकडाउननंतर जनजीवन काही प्रमाणात सुरळीत होत असताना संसर्ग वाढण्याच्या घटनाही दिसून येत आहेत. तुमच्या घरात येणारे कामगार, मोलकरीण यांच्या बाबतीत काही दक्षता पाळणे अत्यंत गरजेचे आहे. हे नियम पाळल्यास बाहेरची व्यक्ती घरात आली, तरी काहीही धोका निर्माण होणार नाही. त्याप्रमाणे सोसायटीतील जिने, लिफ्ट यांची स्वच्छताही तितकीच आवश्‍यक आहे. 

– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गृहनिर्माण सोसायट्यांनी घ्यावयाची दक्षता
काय करावे 

  • प्रवेशद्वारावर थर्मल तपासणी करणे. केवळ लक्षणे नसल्यास कर्मचाऱ्यांना किंवा घरगड्यांना किंवा घरकामाच्या मोलकरणींना प्रवेश द्यावा. हीच बाब अभ्यागतांसाठीसुद्धा लागू राहील.
  • थर्मल गन वापराच्या बाबतीत – ४ ते ६ फूट अंतरावरून थर्मल गनचा वापर करावा. वॉचमनला या बाबतीत प्रशिक्षित करावे व त्याची नोंदवही ठेवावी.
  • शक्यतो बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश प्रवेशद्वारा-पर्यंतच मर्यादित ठेवावा. बाहेरून येणाऱ्या वस्तूंचे प्रवेशद्वारावरच निर्जंतुकीकरण करावे.
  • गृहनिर्माण सोसायटीमध्ये प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायजर किंवा साबण व पाण्याची व्यवस्था करावी.
  • पार्किंगमध्ये पुरेसे भौतिक अंतर राखणे.
  • इमारतीमध्ये लिफ्ट (उदवाहन) असल्यास त्याचे किंवा गेट या सर्व ठिकाणाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
  • गृहनिर्माण संस्थेतील तरुणांनी स्वयंसेवकाची भूमिका निभावून संस्थेतील वृद्ध व इतर व्याधीग्रस्त व्यक्तींची काळजी घ्यावी व ज्या सूचना शासन देत आहे, त्या सूचनांचे पालन करावे. असे करताना कुठलेही अनावश्यक बंधने सोसायटीमध्ये राहणाऱ्या व्यक्तींवर टाकण्यात येऊ नयेत.

काय करू नये

  • कुठल्याही परिस्थितीत एखाद्या व्यक्तीस कोरोनाची व्याधी झाली आहे, असे निदर्शनास आल्यास त्या व्यक्ती व कुटुंबास वाळीत टाकणे किंवा त्यांना बहिष्कृत केल्यासारखी वागणूक देणे अत्यंत चुकीचे आहे. किंबहुना अशा व्यक्तींना/कुटुंबांना आपल्या मदतीची गरज आहे व ती करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असा प्रसंग उद्भवल्यावर त्या व्यक्ती किंवा कुटुंबाच्या जागी तुम्ही किंवा तुमचे कुटुंबीय असते तर काय केले असते, याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.
  • डॉक्टर, नर्स किंवा दवाखान्यात काम करणारे कोणतेही कर्मचारी राहत असल्यास गृहनिर्माण संस्थेमध्ये राहण्यापासून प्रतिबंध करणे अत्यंत चुकीचे व समाजविघातक कृत्य आहे. या मंडळीमुळेच व या मंडळीबरोबरच आपल्याला कोरोनावर मात करावयाची आहे हे कधीही विसरू नये.

कामाला येणाऱ्या बाहेरच्या व्यक्तींसाठी

  • घरकामासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुमच्या घरात वापरण्याचा वेगळा मास्क तयार ठेवावा. शक्यतो असे २ किंवा ३ वेगळे मास्क तयार ठेवावे.
  • घरात येताना त्याने घालून आलेला मास्क वेगळ्या डब्यात ठेवावा. वेगळ्या प्लॅस्टिकच्या बंद डब्यात ठेवावा व त्यांना तुमच्या घरातील वापरावयाचा मास्क देण्यात यावा. असे करण्यापूर्वी त्या व्यक्तीचे हात सॅनिटायजरने निर्जंतूक केले आहेत किंवा स्वच्छ साबणाने धुतले आहेत, याची खात्री करावी. जाताना तो त्यांचा मास्क घेऊन परत जाईल.
  • अशी व्यक्ती घरात कामाला आल्यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी, विशेषत: ज्येष्ठ नागरिक व व्याधीग्रस्त व्यक्तींनी त्यांच्या संपर्कात येऊ नये व घरी असतानासुद्धा मास्क वापरावा.
  • काम करणारी व्यक्ती घरी येईल, तेव्हा तिने आणलेल्या व्यक्तीगत वस्तू उदा. मोबाईल, किल्ल्या, पर्स किंवा इतर काही सामान ठेवण्यासाठी एक वेगळी कापडी बॅग दिली जावी.
  • काम सुरू करण्यापूर्वी हात, तोंड चेहरा साबणाने स्वच्छ धुण्यास सांगावे व त्यानंतर आपल्या घरातील मास्क वापरण्यास त्यांना द्यावा.
  • घरात काम करताना संबंधित व्यक्तीने व घरातील सर्व व्यक्तींनी मास्क वापरला पाहिजे.
  • घरकाम पूर्ण झाल्यानंतर जाण्यापूर्वी त्या व्यक्तीने वापरलेला मास्क साबण किंवा धुण्याची पावडर टाकून फेस केलेल्या पाण्यात भिजवून ठेवण्यास सांगावे.
  • त्यानंतर तिने स्वत: आणलेले मास्क लावून ती व्यक्ती जाऊ शकते. जाताना त्या व्यक्तीने ज्या कापडी पिशवीत तिचे वैयक्तिक सामान ठेवलेले आहे, ते सामान काढून घेतल्यानंतर ती पिशवीसुद्धा गरम पाण्याच्या साबणामध्ये वा धुण्याच्या पावडरमध्ये बुडवून ठेवावी. दोन तासांनंतर तो मास्क किंवा ती पिशवी स्वच्छ धुवून उन्हात वाळत घालावी. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ती वापरायोग्य होईल.

वाहनाबाबत घ्यावयाची काळजी. 

  • वाहनामध्ये वातानुकूलन यंत्रणेचा वापर न करता खिडक्या किंवा काचा खुल्या ठेवून प्रवास करणे जास्त सयुक्तिक आहे.
  • वारंवार वाहनाच्या आतील बाजू किंवा वाहनाच्या आतमध्ये किंवा बाहेर जिथे स्पर्श होतो, जसे की हँडल, काच वर करावयाचे नॉब किंवा हँडल, स्टिअरिंग, वाहनाच्या चाव्या या सर्वांवर १ टक्का हायपोक्लोराईड सोल्यूशन फवारणे आवश्यक आहे.
  • वाहनामध्ये अतिगर्दी टाळणे – वाहनचालक भौतिक अंतर ठेवून काम करतील अशा स्पष्ट सूचना त्यांना द्याव्यात.
  • कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या वाहनचालकास वाहन चालविण्यास देऊ नये किंवा बोलावू नये.
  • वाहनचालकांना मास्क वापरणे बंधनकारक आहे.
  • आपण स्वत: गाडी चालवीत असाल, तर व्हॅलेट पार्किंगमध्ये ऑपरेटिंग स्टाफने मास्क वापरणे, योग्य हातमोजे वापरणे व वाहन परत घेताना वाहनातील स्टिअरिंग दरवाजे, हँडल व चाव्या यांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.

लिफ्टमध्ये घ्यावयाची काळजी 

  • लिफ्टमध्ये शक्यतो कमी मजल्यावर जायचे असल्यास लिफ्ट वापरणे टाळावे व जिन्याने जावे.
  • लिफ्ट वापरणे अपरिहार्य असल्यास शक्यतो एका व्यक्तीने लिफ्ट वापरणे योग्य अन्यथा लिफ्टची (वहन) क्षमता लक्षात घेऊन एका कुटुंबातील व्यक्तींनीच लिफ्टमध्ये जावे.
  • लिफ्टला पर्याय म्हणून एस्कलेटर असल्यास ते वापरणे जास्त सयुक्तिक व एस्कलेटर वापरताना एक पायरीआड अंतर ठेवणे जास्त सयुक्तिक.

Leave a Reply