via Dhavte Jag News: अर्थमंत्र्यांचे खडे बोल – running world | Maharashtra Times
अर्थमंत्र्यांचे खडे बोल –महाराष्ट्र टाइम्स
सार्वजनिक बँकांचा ग्राहकांशी संपर्क कमी झाल्याचे नमूद करीत तेथील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अधिक सौजन्याने वागण्याचा सल्ला देऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्य ग्राहकांना येणाऱ्या कटू अनुभवांना एक प्रकारे वाचा फोडली आहे. आपले खाते सुरू करण्यापासून पासबुक भरण्यापर्यंत आणि बँकांच्या विविध योजना जाणून घेण्यापासून त्यातील कर्ज काढण्यापर्यंतच्या विविध गोष्टींसाठी सरकारी बँकांमध्ये जाणाऱ्या ग्राहकांना बहुतेक ठिकाणी चांगली वागणूक मिळत नाही. ग्राहकांच्या साध्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत, असा अनुभव आहे. खाते उघडण्यापासून विविध योजनांसाठी बँकांत असलेले अर्ज वेगवेगळ्या रकान्यांनी भरलेले असतात आणि सुशिक्षितांनाही ते धड समजत नसतात. ते समजावून सांगण्याची व्यवस्था अनेक ठिकाणी नसते. नोकरदार, महिला, विद्यार्थी, पेन्शनर, गरीब, अशिक्षित अशा विविध घटकांतील लोक सरकारी बँकांचे ग्राहक आहेत; परंतु त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. सामान्य ग्राहकांचा हा अनुभव लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सरकारी बँकांच्या प्रमुखांना चार खडे बोल सुनावले ते योग्यच झाले. ग्राहकांकडे दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमुळेच बँकांचा त्यांच्याशी असलेला संपर्क कमी झाला आहे हे कटू सत्य आहे. बँकांमधील अधिकारी आणि कर्मचारी ग्राहकांना उत्तरदायी आहेत; परंतु तशी भावनाही त्यांच्यात सहसा दिसत नाही. कर्ज थकविणाऱ्या किंवा बुडविणाऱ्यांसमोर बँका झुकतात आणि सामान्य ग्राहकांप्रती ते सौजन्यशीलही नसतात, ही बहुतेक सर्व ग्राहकांची तक्रार आहे. ती आपल्यापर्यंत पोहोचल्याचे नमूद करीत सीतारामन यांनी सरकारी बँकांना अधिक उत्तरदायी होण्याचा दिलेला सल्ला मोलाचा आहे. ग्राहकांना कर्ज द्या अथवा देऊ नका; परंतु त्यांच्याशी स्नेहाने वागा, हे अर्थमंत्र्यांनी सांगितलेले विधान कृतीत येण्याची आवश्यकता आहे. ग्राहकांच्या असमाधानाबद्दल युक्तिवाद करताना बँक अधिकारी आणि कर्मचारी अनेकदा कमी होत असलेल्या मनुष्यबळाचा आणि वाढलेला ताणाचा उल्लेख करीत असतात. तो मान्य केला तरी ग्राहकांप्रती त्यांचे असलेले उत्तरदायित्व यत्किंचितही कमी होत नाही. त्यामुळे अर्थमंत्र्यांच्या कानपिचक्यांनंतर तरी बँकांनी आता ग्राहकाभिमुख व्हावे.