देश कोणत्याही हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा नाही: अरुणा ढेरे –

‘जर एखाद्याने वेगळी भूमिका घेतली की लगेच त्याने एका विचारधारेचा झेंडा हातात घेतलाय, असं होत नाही. देश कुठल्याही प्रकारच्या हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर आहे, असं मला वाटत नाही. सर्वजण सुजाण नागरिक आहेत,’ असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी व्यक्त केलं आहे. शुक्रवारी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी JNU मधल्या हिंसाचारावर बोट ठेवत देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे असं वक्तव्य केलं होतं. तसंच मोदी सरकारवरही टीका केली, त्यावर एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नावर ढेरे यांनी हे मत व्यक्त केलं. साहित्यिकांवर कोणताही दबाव नाही असंही त्या म्हणाल्या.

९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे सुरू आहे. संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आपल्या भाषणात देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतही ते आपल्या भाषणात बोलले. ‘लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो, हादेखील लोकशाहीला फार मोठा धोका आहे. असे जेव्हा जेव्हा घडते, तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रिय नागिरकांनी आणि विशेषत: साहित्यिकांनी व विचारवंतांनी सजग राहून स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असे मला वाटते,’ असे मत दिब्रिटो यांनी व्यक्त केले. गोवंश हत्याबंदी, झुंडबळी या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. जमावाकडून, गायीच्या नावाने विशिष्ट धर्मीयांच्या केल्या जाणाऱ्या हत्या हा सावरकर-विचारांचा पराभवच असल्याचे त्यांनी सूचित केले.

या पार्श्वभूमीवर ढेरे यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या बोलत होत्या. ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून ते निरनिराळ्या विषयांवर दिब्रिटो तळमळीने बोलले. ती तळमळ खरी होती. देशात घडणाऱ्या काही गोष्टींचे पडसाद हे संमेलनात उमटणं स्वाभाविक होते तसे ते उमटले. मात्र साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्य याबाबत बोलण्यापेक्षा या पडसादांवर जास्त भाष्य करण्यात आलं. साहित्य आणि समाज यामधल्या बदलांबाबत दिब्रेटो हे फारसं काही बोलले नाहीत,’ अशी खंत ढेरे यांनी व्यक्त केली.

via Aruna Dhere : देश कोणत्याही हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा नाही: अरुणा ढेरे – no hitlerism in india says former president of marathi sahitya sammelan aruna dhere | Maharashtra Times

Leave a Reply