गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी जम्मू-काश्मीरमध्ये भेट दिल्यानंतर म्हटले होते, की या काळात देशांतर्गत सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आणि सोशल मीडियावर राष्ट्रभक्तीच्या नावाखाली शिवराळपणा करणाऱ्या लोकांना त्याचे भान आहे, असे म्हणता येणार नाही. घडलेल्या घटनेमागे पाकिस्तानचा हात आहे, हेही खरे आहे. परंतु पाकिस्तानविरोधातला संताप इथे रस्त्यावर, रेल्वे रुळांवर व्यक्त करण्यात शहाणपणा नाही. संवेदनशील काळाचा फायदा घेऊन केलेली हुल्लडबाजी असेच त्याला म्हणता येईल. हुल्लडबाजी करून, जनजीवन विस्कळित करून आणि व्यवहार बंद करून देशभक्ती सिद्ध होत नसते. एवढी मोठी घटना घडली असतानाही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर सभा घेतलीच आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपले सगळे नियोजित कार्यक्रम नीट सुरू ठेवले आहेत. त्यांच्याविरुद्ध कुणाला संताप व्यक्त करावा असे वाटत असेल तर त्याचाही मार्ग लोकशाहीने आखून दिला आहे. त्यामुळे संताप सरकारविरुद्ध व्यक्त करायचा असेल किंवा दहशतवादी आणि त्यांच्या पुरस्कर्त्या पाकिस्तानविरोधात व्यक्त करायचा असेल तरी तो करताना विवेक महत्त्वाचा आहे. ज्यांना राजकारण करायचे असते आणि बिघडलेल्या वातावरणाचा फायदा घेऊन राजकीय पोळी भाजून घ्यायची असते, त्यांना असले काही पटत नसते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये घुसून बदला घ्यायला पाहिजे. हीच भाषा २०१४च्या आधी आता पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी बोलत होते आणि टाळ्या घेत होते. सत्तेत असणाऱ्यांना विरोधकांसारखे बेजबाबदार वागता येत नाही. दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांचा पक्ष सत्तेतही आहे, परंतु सत्तेची कोणतीही जबाबदारी त्यांना नको आहे. आणि भविष्यातही ते देशाच्या सत्तेच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांनी काहीही बोलले तरी चालते. पंतप्रधान मोदी यांनाही छप्पन इंचाची बढाई मागे ठेवून किंवा आपले जेम्स बाँड अजित डोवल यांना बाजूला ठेवून लष्कराला सर्वाधिकार दिल्याचे सांगावे लागले. युद्धासाठी आतुर झालेल्या सर्वभाषिक वृत्तवाहिन्यांच्या वृत्तनिवेदकांनी गेल्या चार दिवसांत काही शेकडा वेळा केंद्रातील मंत्र्यांना आणि भाजपच्या नेत्यांना सर्जिकल स्ट्राईक कधी करणार किंवा बदला कधी घेणार असे प्रश्न विचारले असतील. परंतु पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून मिटवून टाकण्याची भाषा पाच वर्षांपूर्वी बोलणाऱ्या एकानेही त्याचे ठोस उत्तर दिलेले नाही. यावरून सत्ताधाऱ्यांची गोची लक्षात येऊ शकते. दहशतवाद्यांना, त्यांना आश्रय देणाऱ्यांना आणि पाठिंबा देणाऱ्यांना धडा शिकवावा अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. परंतु कथित राष्ट्रभक्तांनी कितीही बढाया मारल्या तरी शांततेचा आग्रह धरणे आणि सरकारच्या पाठिशी एकमुखाने उभे राहणे हीच खरी देशभक्ती आहे.