आपण सर्वजण लवकरात लवकर आपापला व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्सुक असणार याची मला कल्पना आहे.
परंतु मला असे प्रामाणिकपणे वाटते की आपण कोणतेही पाऊल उचलण्याआधी सर्व बाबींचा समग्र विचार करावा. संकट येण्याआधी –व्यवसाय कसा करावा याचे नियम आपल्याला आखून दिले गेले होते. त्यामुळे त्या त्या प्रचलित पद्धतीप्रमाणे व्यवसाय करण्यावाचून आपल्याला पर्याय नव्हता. उदाहरणा द्यायचे झाले तर –माल उधारीवर विकण्याबाबत देता येईल. मार्केट जर क्रेडीट ६० दिवस देत असेल तर आपण ५५ दिवस देखील क्रेडीट देऊन चालत नव्हते. क्रेडीट डेज कमी करायचे असतील तर माल घेणारा एखादा टक्का तरी डिस्काउंट मागायचा –व त्यांचे नाही ऐकले तर आर्डर दुसऱ्याला दिली जाण्याची शक्यता निर्माण व्हायची.
पण आता हे थांबवणे आपल्या हातात आहे. अर्थात असे करत असताना आपले काही नुकसान होणारच आहे पण हे नुकसान सुरुवातीचे असेल. कायम स्वरूपी नसेल याची मला खात्री आहे. आपल्या मालाचा दर्जा चांगला असेल –किमत वाजवी असेल तर क्रेडीट डेज आपण कमी का करू शकत नाही ? असा विचार करून थोडा फार प्रयत्न करायला काय हरकत आहे ?
मी नुकतेच एक पुस्तक वाचले , त्या पुस्तकाचे नाव आहे ” Un Learn ” लेखक आहेत Humble The Poet — alias Kanwer Singh –या पुस्तकात भर दिला गेला आहे तो आपण शिकलेल्या गोष्टी विसरून जाण्यावर. कारण जोपर्यंत आपण जुन्या / शिकलेल्या गोष्टी विसरत नाही तोपर्यंत नवीन गोष्टी आपण सहजासहजी शिकणार नाही मग त्या आत्मसात करणे दूरच. आपण निर्णय कसे घेतो याचे आपण अवलोकन केले तर आपल्याला कळून येईल की आपल्याला सर्वप्रथम जी बाब माहित आहे , जो रस्ता चोखाळला गेला आहे तो जवळचा वाटतो. इतर कोणतेही मार्ग / विचार डोक्यातच येत नाहीत. मी एखादे उदाहरण देऊन हे सिद्ध करतो.
आपण ताळेबंद म्हणजे काय , नफा तोटा कशामुळे होतो –याबाबत कधीच फारसा विचार करत नाही. आपला सर्व भर– मालासाठी आर्डर मिळवणे , कच्चा माल मिळवणे , मालाचे उत्पादन करून असा तयार माल विकणे व मालाचे पैसे न आल्याने वसुली कारवाई करणे व अडचणीवर मात करण्यासाठी बँकेकडून ज्यादा वित्त पुरवठा व्हावा म्हणून प्रयत्न करतो. या सर्व प्रयत्नात लघु उद्योजक एवढा गुरफटून जातो की त्याला इतर तेवढ्याच महत्वाच्या बाबीवर विचार करायवयास वेळच मिळत नाही. नफ्याचा आढावा घेण्याचे ना त्याला सुचते ना समजते. यावर देखील तो त्याच्या सीए वर अवलंबून असतो. जोवर डेटा मिळत नाही तोपर्यंत सीए देखील काही करू शकत नाही. त्यामुळे वार्षिक नफा तोटा पत्रक वर्ष संपून गेल्यावर बऱ्याच महिन्यानी तयार होते. तोपर्यंत नवीन वर्षाचे ५/६ महिने निघून गेले असतात. काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करून नवीन प्लांनिंग करून त्यावर अंमलबजावणी करणे ही फारशी सुकर बाब राहत नाही. आपण ओनर आहोत त्यामुळे सर्व जबाबदारी आपल्यावरच आहे हे माहित असून सुद्धा लघु उद्योजक काही करू शकत नाही. लघु उद्योजक याबाबतीत हेल्पलेस असतो. लघु उद्योजकाचे एक टार्गेट हे देखील पाहिजे की त्याला वेळोवेळी योग्य तो डेटा मिळत गेला पाहिजे. त्यासाठी त्याला सक्षम यंत्रणा ऑफिस मध्ये तयार करावी लागेल. परंतु हे करण्याचे त्याच्या सध्याच्या ” प्राधान्य ” बाबी मध्ये बसू शकत नाही. हे कधी होईल जेंव्हा लघु उद्योजक असा विचार करेल की माल विकणे जेव्हढे महत्वाचे आहे तेव्हढेच महत्वाचे नफा तोटा लवकरात लवकर समजणे.
जर समजा लघु उद्योजकाने असे ठरवले की रोज काही ठराविक वेळ मी हिशोबा कडे [ नफा तोटा पत्रकाकडे ] लक्ष देईन–तर काय होईल ? उद्योजकास रोजच्या रोज माहिती मिळत जाईल व योग्य त्या सुधारणा वेळेवर करता येईल. म्हणजेच लघु उद्योजकास काही शिकलेल्या गोष्टी विसराव्या लागतील व नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. हे शक्य आहे का ?
उद्योजकाने –यापुढे — प्रवाहात वाहत जायचे की वेगळ्या दिशेने मार्गक्रमण करायचे हे ठरवायचे आहे. प्रयत्न तर करून बघायला काय हरकत आहे ?
मनास वेदना देणारी एक बातमी आजच वाचण्यात आली. ही बातमी वरील विषयासाठी संबधित नाही पण लघु उद्योगा शी संबधित आहे. म्हणून ही बातमी अवश्य वाचावी.