टाटा एआयजीच्या उपाध्यक्ष रेणुका कनविंदे यांनी आरोग्य विम्याबाबतच्या महत्त्वाच्या शंकांचे निरसन केले आहे.

आरोग्य विमा घेतल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करणे भविष्यात महाग पडू शकते. वाढता वैद्यकीय खर्च, कुटुंबातील बदल आणि नोकरीतील अनिश्चितता यामुळे तुमच्याकडे असलेले विमा संरक्षण पुरेसे आहे की नाही, याचा वेळोवेळी आढावा घेणे अत्यंत गरजेचे आहे. टाटा एआयजीच्या उपाध्यक्ष रेणुका कनविंदे यांनी आरोग्य विम्याबाबतच्या महत्त्वाच्या शंकांचे निरसन केले आहे.

माझा आरोग्य विमा १० लाख रुपयांचा आहे; मात्र रुग्णालयातील उपचारांचा खर्च झपाट्याने वाढत आहे. माझ्या विमा संरक्षणाची रक्कम वाढवण्याची वेळ आली आहे हे मला कसे समजेल?

आरोग्य विमा घेतल्यानंतर त्याकडे कायमस्वरूपी लक्ष देण्याची गरज नाही असे समजणे योग्य ठरणार नाही. आरोग्यसेवेचा खर्च बदलत असताना आणि व्यक्तीच्या आयुष्यातील परिस्थिती बदलत असताना सध्याची विमा संरक्षित रक्कम पुरेशी आहे की नाही याचे वेळोवेळी मूल्यमापन करणे महत्त्वाचे आहे. १० लाख रु. इतके विमा संरक्षण एखाद्या व्यक्तीसाठी पुरेसे ठरू शकते; मात्र कुटुंबासाठी किंवा खर्चिक उपचारांसाठी तेवढेच आर्थिक संरक्षण पुरेसे होईलच असे नाही.

विवाह, अपत्याचा जन्म किंवा अवलंबून असलेल्या आई-वडिलांचा विमा संरक्षणात समावेश करणे अशा आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांनंतर ग्राहकांनी आपल्या विमा संरक्षणाचा आढावा घ्यावा. तसेच, ते राहत असलेल्या शहरातील आरोग्यसेवेचा खर्च आणि भविष्यात कोणत्या प्रकारच्या उपचारांची गरज भासू शकते याचाही विचार करावा. आपल्या गरजांनुसार मूळ विमा संरक्षणाची रक्कम वाढवणे किंवा टॉप-अप अथवा सुपर टॉप-अप विमा संरक्षणाचा विचार करणे, यामुळे विमा संरक्षणातील संभाव्य त्रुटी दूर करण्यास मदत होऊ शकते.

STORIES YOU MAY LIKE

मला रुग्णालयात दाखल होऊन रात्रभर राहावे लागले नाही तरी माझ्यावर उपचार झाले. अशा उपचारांचा खर्च मी माझ्या आरोग्य विम्याअंतर्गत दावा करून मिळवू शकतो का?

आरोग्य विम्याचे संरक्षण मिळण्यासाठी प्रत्येक उपचाराच्या वेळी रुग्णालयात २४ तास दाखल राहणे आवश्यक असतेच असे नाही. वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता अनेक उपचार काही तासांत पूर्ण करता येतात. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून, अशा उपचारांचा समावेश डे-केअर उपचार प्रक्रियांमध्ये केला जातो आणि त्यांना विमा संरक्षण मिळू शकते.

मात्र, ग्राहकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की डे-केअर प्रक्रिया आणि नियमित बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) वैद्यकीय सल्ला किंवा निदान चाचणी यांमध्ये फरक आहे. तसेच, कमी वेळात पूर्ण होणाऱ्या प्रत्येक उपचाराचा खर्च विम्याअंतर्गत मिळेलच असे नाही. उपचार घेण्यापूर्वी ग्राहकांनी विमा संरक्षणाखाली समाविष्ट असलेल्या डे-केअर प्रक्रियांची यादी आणि पॉलिसीच्या लागू अटी तपासून घ्याव्यात. रुग्णालयात किती वेळ थांबावे लागले, या एकाच निकषावर संबंधित खर्चाचा विमा दावा करता येईल की नाही, हे ठरवू नये.

आरोग्य विमा पॉलिसी घेतल्यानंतर मला एखादा गंभीर आजार झाला, तर माझ्या वैद्यकीय स्थितीबाबत आधीच्या काळातील एखादी माहिती मी उघड केली नव्हती, या कारणावरून विमा कंपनी माझा दावा नाकारू शकते का?

आरोग्य विमा पॉलिसी घेतल्यानंतर एखादा गंभीर आजार उद्भवला तर केवळ त्या कारणामुळे विमा दावा अपात्र ठरत नाही. पॉलिसी खरेदी करताना ग्राहकाने दिलेली वैद्यकीय माहिती आणि पॉलिसीच्या लागू अटी व शर्ती या बाबी यासंदर्भात महत्त्वाच्या ठरतात.

पॉलिसीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेदरम्यान वैद्यकीय इतिहासासंबंधी माहिती विचारली गेल्यास, ग्राहकांनी सध्याचे आजार, यापूर्वी घेतलेले उपचार आणि झालेल्या शस्त्रक्रिया यांसह सर्व संबंधित माहिती संपूर्ण आणि अचूकपणे द्यावी असे आम्ही सुचवतो. यामुळे जोखीम मूल्यांकन योग्य प्रकारे करता येते आणि लागू असलेला प्रतीक्षा कालावधी किंवा विमा संरक्षणातून वगळण्यात आलेल्या बाबी सुरुवातीलाच स्पष्ट होण्यास मदत होते.

पॉलिसी सुरू झाल्यानंतर उद्भवलेला आजार आणि पॉलिसी सुरू होण्यापूर्वीपासून अस्तित्वात असलेला आजार या दोन वेगळ्या बाबी आहेत. विमा दावा दाखल केल्यानंतर पॉलिसीच्या अटी, वैद्यकीय नोंदी आणि विमा कंपनीकडे उपलब्ध असलेली माहिती यांच्या आधारे संबंधित परिस्थितीचे मूल्यांकन केले जाते. विमा पॉलिसी घेताना सर्व माहिती पारदर्शकपणे उघड करणे, हे दावा दाखल करताना उद्भवू शकणारे संभाव्य वाद टाळण्यासाठी ग्राहकांनी उचलावयाच्या सर्वांत महत्त्वाच्या पावलांपैकी एक आहे.

मी काम करत असलेलीं कंपनी मला आरोग्य विमा देत आहे; पण मी नोकरी बदलली किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेतला तर माझ्या विमा संरक्षणाचे काय होईल? अशी परिस्थिती उद्भवण्यापूर्वी मी वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी घ्यावी का?

नियोक्त्यामार्फत मिळणारा आरोग्य विमा हा एक महत्त्वाचा लाभ आहे. मात्र, कर्मचाऱ्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की समूह आरोग्य विमा संरक्षण हे नियोक्ता आणि समूह विमा पॉलिसीच्या अटींशी संबंधित असते. त्यामुळे नोकरी बदलल्यास किंवा करिअरमध्ये काही काळाचा खंड पडल्यास या विमा संरक्षणाच्या सातत्यावर परिणाम होऊ शकतो.

आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने, व्यक्तींनी केवळ नियोक्त्यामार्फत मिळणाऱ्या विमा संरक्षणावर पूर्णपणे अवलंबून न राहता, स्वतःकडे पुरेसे वैयक्तिक आरोग्य विमा संरक्षण आहे की नाही, याचे मूल्यमापन करावे. आदर्श परिस्थितीत, हे मूल्यमापन समूह विमा पॉलिसीअंतर्गत विमा संरक्षण सुरू असतानाच करावे. नोकऱ्यांमधील बदलाच्या काळात किंवा वैद्यकीय उपचारांची गरज निर्माण झाल्यानंतर याचा विचार करण्यापेक्षा आधीच नियोजन करणे अधिक योग्य ठरते.

वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसीमुळे नोकरीशी संबंधित नसलेले अतिरिक्त आर्थिक संरक्षण मिळू शकते. नोकरीतील बदलामुळे आरोग्य विमा संरक्षणात अनवधानाने खंड पडणार नाही याची खात्री करणे हे यामागील व्यापक उद्दिष्ट असले पाहिजे.

(लिखिका रेणुका कनविंदे, टाटा एआयजी आरोग्य विमाच्या उपाध्यक्ष आहेत.)

Leave a Reply