आयआयटी’तील विद्याथ्र्याच्या आत्महत्येस जातीय वळण मिळणे हे समस्येचे सुलभीकरण होय. सर्व गंभीर समस्या जात, धर्म आदी चौकटीत डकवायच्या सध्याच्या प्रथेनुसार हे असले तरी त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे साफ दुर्लक्ष होते. तो मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांवर असलेला असह्य दबाव. तो निर्माण होण्यात विद्यार्थ्यांचा हात नसतो पण त्यात विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक आणि अध्यापकही होरपळून निघत असतात. या दबावाचे अस्तित्व ना पालकांस मान्य असते, ना अध्यापकांस, ना सरकारी धुरीणांस. त्यामुळे मूळ समस्येस हातच घातला जात नाही. ती सोडवली जात नसल्याने, तसे प्रयत्नही होत नसल्याने विद्यार्थी हकनाक बळी पडत राहतात आणि असे काही दुर्दैवी घडल्यावर प्रकरणास भलतेच वळण लागते. ‘आयआयटी’तील ताज्या घटनेत याच इतिहासाची पुनरावृत्ती दिसून येते.
याचा अर्थ या प्रकरणास जातीय अंग नाही; असा अजिबात नाही. ते असेल. वा नसेल. त्याची शहानिशा करण्याने काहीच साध्य होणारे नाही. तशी शहानिशा करताही येणार नाही. कारण यात ज्या विद्याथ्र्यास या कथित जातिवाचक छळास तोंड द्यावे लागले तो आपल्यात नाही. त्याच्या अभागी पालकांच्या आणि काही विद्यार्थी संघटनांच्या वतीने असा जातीय छळाचा आरोप करण्यात येतो. तथापि सदर विद्याथ्र्याच्या काही जवळच्या मित्रांनी माध्यमांशी बोलताना यामागे जातीय छळ हे कारण असल्याचे साफ नाकारले. हे अगदी उलट. सदर विद्यार्थी बुद्धिमान गणला जात होता. त्यामुळे त्याने परीक्षेत ‘कॉपी’ केल्याचा आरोप अनेकांस मान्य नाही. ते ठीक. पण या विद्याथ्र्यावरील कथित आक्षेप हा कॉपी केल्याचा नाही. परीक्षेत त्याने कृत्रिम प्रज्ञेचे (आर्टिफिशल इंटलिजन्स, एआय) साहाय्य घेतले ही सदर विद्याथ्र्याच्या अध्यापकांची तक्रार. यात दोन मुद्दे. पहिला सदर विद्याथ्र्याच्या बुद्धिमत्तेचा. त्याबाबत कोणीही कसलाही आक्षेप घेतलेला नाही. दुसरा ‘‘तो बुद्धिमान होता म्हणून नियमबाह्य वर्तन करणार नाही’’, हा. त्याबाबत मतभेद असू शकतात. तसेच या मुद्द्याचा प्रतिवाद ज्या अध्यापकावर कारवाई झाली त्यांच्याही लौकिकाचा दाखला देऊन करता येईल. सदरहू अध्यापकही पुरस्कारप्राप्त असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याच्याही इतिहासाचा दाखला देऊन ‘‘इतका चांगला प्राध्यापक ‘असे’ करणार नाही’’, असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. सबब वर्तमानातील कथित प्रमादासाठी उभय बाजूंनी इतिहासाचे दाखले देण्याने फारसे काही हाती लागत नाही. तेव्हा या आहे तशा वर्तमानास समोरून भिडायला हवे.
तसे करू गेल्यास विद्यार्थ्यांवरील अतोनात ताण आणि दबाव हा मुद्दा प्रमुख. एरवी अगदी शालेय वा सर्वसाधारण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेडसावणार्या तणावापेक्षा ‘आयआयटी’, वैद्यकीय आदी क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना कित्येक पट अधिक सामोरे जावे लागते. त्यामागील कारण आयआयटी वा वैद्यकीय शाखांतील विद्यार्थी अधिक गुणवान असतात आणि मानव्य शाखांतील विद्यार्थी कमअस्सल असतात असा समज. मुदलात ही अशी वर्गवारीच अशास्त्रीय आणि पूर्णपणे असमंजसपणाची. कोणत्याही समाजासाठी जसे कुशल अभियंते, व्यवस्थापक, वैद्यक महत्त्वाचे असतात तितकेच किंवा अधिकच महत्त्वाचे गायक, अभिनेते आणि चित्रकार असतात. आपल्याकडे दुर्दैवाने असे मानले जात नाही त्यामुळे काही शाखांतील विद्यार्थ्यांवरील दबावाचा गुणाकार होत जातो. ‘आयआयटी’तील विद्यार्थी हे अशा दबावांचे केंद्रस्थान. मुळात पहिल्या… आणि दुसर्याही… स्वातंत्र्यास इतकी वर्षे उलटली तरी ‘आयआयटी’, काही ‘आयआयएम्स’ इतक्या गुणवत्तेच्या आणखी काही संस्था आपणास उभ्या करता आलेल्या नाहीत. गेल्या काही वर्षांत काही नव्या ‘आयआयटी’ आपण सुरू केल्या खर्या. पण तरीही मोठेपण आहे ते आद्य संस्थांनाच. त्यामुळे अशा संस्थांत प्रवेश मिळवणे ही हमखास सुखी आणि संपन्न भविष्याची हमी मानली जाते. ‘आयआयटी’तील अर्धा कोट वा अधिक वार्षिक तनख्यावर सुरू होणार्या ‘कॅम्पस प्लेसमेंट्स’ हे अनेकांचे स्वप्न असते. त्यात गैर काही नाही.
STORIES YOU MAY LIKE
हेही वाचा
गैर आहे ते अशा इतक्या यशाची हमी देणार्या संस्था उभारणीतील आपले देदीप्यमान अपयश. या डोळ्यात भरणार्या अपयशाचा तितकाच दृश्य परिणाम म्हणजे ‘आयआयटी’तील विद्यार्थ्यांवर असलेला प्रचंड तणाव. त्यातही हा तणाव कथित ‘उच्च’वर्णेतर विद्यार्थ्यांसाठी अधिक जीवघेणा असतो. याचे कारण त्यांच्याठायी गुणवत्तेचा अभाव असतो हे अजिबातच नाही. अशा विद्यार्थ्यांची कौटुंबिक, आर्थिक पार्श्वभूमी हे यामागील खरे कारण. सुस्थितीतील आणि सामाजिकदृष्ट्या प्रस्थापित कौटुंबिक वातावरणातील विद्यार्थी हे असा तणाव सहन करण्यास अधिक सज्ज असतात. काही अपयशाचा सामना करावा लागलाच तर या सवर्ण घरांतील विद्यार्थी/ विद्यार्थ्यांस पुरेशी आर्थिक आणि अन्य उसंत असते. ही चैन तुलनेने आव्हानात्मक परिस्थितीतून येणार्या विद्यार्थ्यांस नसते. अपयश आले, एखादे वर्ष गमावण्याची वेळ आली तर पोटास चिमटा काढून शिकवणार्या आपल्या पालकांस सामोरे जायचे कसे हा प्रश्न अशा विद्यार्थ्यांसाठी जीवनमरणाचा असतो. तो सोडवायचा असेल तर ‘आयआयटी’ वा तत्सम संस्थांत प्रतिकूल परिस्थितीतून सामील होणार्या विद्यार्थ्यांच्या मानसिक पाठिंब्यासाठी काही एक संस्थात्मक व्यवस्था हवीच हवी. सध्याची व्यवस्था प्रतिबंधात्मक नाही. मानसिक तणाव, नैराश्य आदी आव्हाने भेडसावणार्या विद्यार्थ्यांस तेथे सध्या मदत आहे. पण हे आजारी पडल्यानंतर मिळणार्या उपचारांसारखे. आजारी पडावे लागणार नाही, यासाठी साह्य नाही. ते पुरवावे लागेल.
ते नसणे हे दुर्बल घटकांतून या संस्थांत येणार्या विद्यार्थ्यांस अधिक दुर्बल करणारे असते. हे दौर्बल्य दिसू लागले की जाती-वाद फोफावण्यास मदत मिळते. अलीकडे हिंदू-मुसलमानांत ज्याप्रमाणे ‘आपण’ आणि ‘ते’ असे सर्रास होऊ लागले आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांतही ‘राखीव जागावाले ते’ आणि ‘आपण’ असा दुभंग आहे. वास्तव तपासल्यास तो गैरलागू आहे आणि त्यात सवर्णांच्या ‘आम्ही श्रेष्ठ’ गंडाचा मोठा वाटा आहे. ‘आयआयटी’ वा तत्सम संस्थांत खुल्या प्रवर्गातील आणि राखीव जागांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत मोठा फरक असतो असे नाही. तरीही खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी स्वत:स श्रेष्ठ मानतात. पण त्यांचे इतरांस कनिष्ठ मानणे जास्त हानीकारक असते. गुणवत्तेचा मक्ता जणू आपल्याकडेच आहे असे मानणारे हे उच्चवर्णीय ‘आर्थिकदृष्ट्या मागास’ प्रवर्गातील आणि त्याहीपेक्षा सरळ पैसे देऊन उच्च विद्याशाखांत प्रवेश घेणार्या धनदांडग्यांच्या मुलाबाळांविषयी मात्र सोयीस्कर मौन बाळगतात. इतकेच नव्हे; तर यातीलच काही आर्थिकदृष्ट्या समर्थ लुच्चे स्वत:ही या अशा ‘पैसे मोजा, पदव्या घ्या’ या वर्गात कसे शिरता येईल या प्रयत्नात असतात. तेव्हा गुणवत्ता ही काही आपलीच मक्तेदारी आहे असे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी मानण्याचे कारण नाही आणि इतरांनी कानकोंडे होण्याची गरज नाही. तसे झाल्याने खरे नुकसान त्या संस्थेचे होते. आताच्या प्रकरणातही तोच धोका आहे.
‘आयआयटी’त विद्यार्थ्यांची जात अध्यापक आणि अन्यांस सांगितली जात नाही. आपल्या देशातील वास्तव लक्षात घेता तसे केलेले उलट बरे. कारण त्यामुळे कोणाशी किती संवेदनशीलतेने वागायचे हे संबंधितांस आधीच कळू शकेल. शिक्षकाने कशासाठी तरी आक्षेप घेतल्यावर जातीचे कारण पुढे करण्यापेक्षा पूर्वकल्पना असणे अगदीच वाईट नाही. त्याचेही दुष्परिणाम आहेतच. परंतु यानिमित्ताने जात हे आपले वास्तव आहे, कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी ते झाकले जाणारे नाही, हे सत्यही अंगीकारण्याची सवय सर्वांस होईल. प्रतिकूल परिस्थितीतून सामील होणार्या विद्यार्थ्यांच्या मानसिक पाठिंब्यासाठी सध्याची संस्थात्मक व्यवस्था प्रतिबंधात्मक नाही.