China Gold-Silver Record Imports; चीनकडून मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी, जगात युद्ध सुरू ड्रॅगनची नवी खेळी! कुणाला फायदा, कुणाचे नुकसान? | Maharashtra Times

Clipped from: https://maharashtratimes.com/business/business-news/china-gold-silver-demand-surges-as-imports-hit-record-highs-in-march-what-should-investors-do/articleshow/130437739.cms

Gold-Silver Import Record High: अमेरिका-इराण आणि रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाच्या चक्रव्यूहात जग अडकला असताना चीनने मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीच्या खरेदीचा सपाटा लावला आहे. मध्यवर्ती बँकांकडून होणाऱ्या मोठ्या खरेदीमुळे सोन्याची आयातही वाढत असून किमतींमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत.

China Gold-Silver Reserve in March 2026चीनकडून मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी(फोटो- महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

Gold-Silver Imports: चीन, जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था, जगाच्या उलट वाटचाल करत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगाच्या जीवाला घोर लागला असताना चीनमध्ये असं काहीतरी घडत होतं जे सुरुवातीला कोणाच्या लक्षात आले नाही. मार्च 2026 चा महिना जागतिक बाजारांसाठी सामान्य वाटत होता. सोने सतत चर्चेत होतं, भाव वाढले होते, गुंतवणूकदार सावध होते आणि प्रत्येकजण सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात होता. त्याचवेळी, चिनी बाजारांमध्ये चांदीच्या लहान बार्सची विक्री होऊ लागली.

बाजारातील सराफ, व्यापारी आणि गुंतवणूक मंचांमध्ये चांदीची मागणी वाढू लागली. लोकांना वाटतं होतं की सोन्याची किंमत खूप महाग आहे, त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार आता अशा धातूच्या शोधात होते जो परवडणारा आणि किफायतशीर असेल. अशातच चांदीने त्यांचे लक्ष वेधले.

चीनकडून सोने-चांदीची विक्रमी आयात

हळूहळू मागणी इतकी वाढली की मार्च महिन्याच्या आकडेवारीने जगाला आश्चर्याचा धक्का दिला. चीनने मार्चमध्ये अंदाजे 836 टन चांदी आयात केली, म्हणजेच परदेशातून खरेदी केली. चीनने इतिहासात कधीही मार्च महिन्यात इतकी चांदी खरेदी केली नव्हती. फेब्रुवारीच्या तुलनेत चांदीच्या खरेदीत अंदाजे 78% जास्त वाढ झाली, म्हणजे केवळ एका महिन्यात मागणीत प्रचंड मोठी वाढ पाहायला मिळाली.

चीनला इतक्या चांदीची गरज काय?
सौर उद्योगात जगाच्या वार्षिक चांदी पुरवठ्यापैकी सुमारे 20% वाटा आहे आणि यातील बहुतांश वापर चीनमध्ये होतो. सौर पॅनेलसाठी चांदी अत्यंत महत्त्वाची असते, कारण तिची electrical conductivity खूप उच्च असते. चीनमध्ये चांदीची मागणी इतकी प्रचंड आहे की, तेथील स्थानिक चांदीचे दर जागतिक दरांपेक्षाही अधिक आहेत. या दरांमधील तफावतीचा फायदा घेऊन नफा कमावण्यासाठी व्यापारी इतर देशांतून चांदीची आयात करत असून व्यापाराच्या उद्देशाने चांदीचा मोठा साठा हाँगकाँग मार्गे चीनमध्ये पाठवला जात आहे.

चीनकडून सोन्याची विक्रमी आयात

चीनचा एकूण सुवर्णसाठा सुमारे 2,262 ते 2,313 टन असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी, चीनमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये जोरदार वाढ झाली असून ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात शांघायमधील सोन्याची किंमत 10 टक्क्यांनी वाढली आणि जागतिक स्तरावरही सोन्याच्या किमती वाढल्या. मात्र जागतिक तणाव आणि महागाईच्या भीतीमुळे चांदी व सोन्याच्या किमती नंतर आधीच्या उच्चांकावरून घसरल्या.

चांदीची मागणी प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्राकडून (सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहने) आणि तसेच गुंतवणूकदारांच्या मोठ्या प्रमाणावरील सट्टेबाजीमुळे वाढत असल्याचं तज्ञांचे म्हणणे असून चांदीच्या दरात प्रचंड अस्थिरता होऊ शकते आणि सोन्याच्या तुलनेत यामध्ये जोखीम अधिक असतो.

सोने-चांदीच्या दरांमधील चढउतारांमुळे काही गुंतवणूकदार किमती घसरल्या की चांदी खरेदी करतात आणि वाढल्या असताना विक्री करण्याचा सल्ला देत आहेत. अशा परिस्थितीत, चीनकडून चांदी आणि सोने या दोन्हीची जोरदार खरेदी अजूनही सुरू असून अल्पकालीन किमतींमधील चढ-उतार होऊनही दीर्घकाळ मागणी असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

Leave a Reply