Auto-Debit: RBI ने ऑटो-डेबिट नियमांमध्ये केले महत्त्वाचे बदल, आता 15 हजारांपर्यंतच्या पेमेंटसाठी ओटीपीची गरजच नाही, सुरक्षा आणि फायदे जाणून घ्या

lipped from: https://maharashtratimes.com/business/business-news/rbi-recurring-auto-payments-up-to-15000-without-otp-for-making-monthly-bills-faster/articleshow/130440016.cms

Banking News: एसआयपी, क्रेडिट कार्ड बिल यांसारख्या 15 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी आता ओटीपीची आवश्यकता भासणार नाही. यामुळे वापरकर्त्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय पेमेंट करणे शक्य होईल.

RBI ने ऑटो-डेबिट नियमांमध्ये केले महत्त्वाचे बदल, आता 15 हजारांपर्यंतच्या पेमेंटसाठी ओटीपीची गरजच नाही,(फोटो- महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

RBI Auto Debit New Rules : भारतीय रिझर्व्ह बँकेने आता ऑटो-डेबिटच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. 15 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी आता ‘ओटीपी’ची गरज भासणार नाही. या सुविधेमुळे वापरकर्त्यांची आर्थिक सुरक्षा धोक्यात येईल की व्यवहार अधिक सुलभ होतील? सोयीच्या या नव्या नियमांचेके धोके आणि फायदे नेमके काय आहेत, हे प्रत्येक बँक खातेदाराने समजून घेणे आवश्यक आहे.

या नवीन नियमाचे फायदे काय?

बऱ्याचदा ओटीपी उशीराने येतो, मोबाइलचे नेटवर्क कमकुवत असते किंवा पेमेंटच्या वेळी वापरकर्ता प्रवासात असतो या लहान लहान कारणांमुळे ऑटो-पेमेंट फेल होतो. यामुळे विम्याचा हप्ता चुकतो, एसआयपीची तारीख चुकते किंवा क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची ठराविक वेळ चुकते आणि अतिरिक्त दंड भरावा लागण्याची भीती असते. पण आरबीआयने केलेल्या या नियम बदलांमुळे आता 15 हजार रुपयांपर्यंतचे पेमेंट स्वयंमचलित कोणत्याही अडथळ्याशिवाय होतील. ज्यामुळे पेमेंट फेल होण्याची भीती नसेल.

वापरकर्त्यांची मंजूरी अनिवार्य असेल

कोणतीही कंपनी वापरकर्त्याच्या परवानगी शिवाय त्याच्या खात्यातून पैसे काढू शकत नाही. त्यामुळे आरबीआयने पेमेंट ऑटो-डेबिट केले असले तरी, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऑटो-पे चे सेटअप करत असाल तेव्हा वापरकर्त्यांना ओटीपीची पुष्टी करणे अनिवार्य असेल. त्यानंतर जर पेमेंटची रक्कम आरबीआयने ठरवलेल्या ठराविक रक्कमेइतकी असेल तर, वापरकर्त्याने निश्चित केलेल्या वेळेपर्यंत पेमेंट ऑटो-डेबिट होत राहील. त्यामुळे नियंत्रण वापरकर्त्यांच्या हातातच राहील.

मोठे पेमेंट करणे आता सोपे

तसेच जे वापरकर्ते नियमतपणे मोठी रक्कम भरावी लागते. आणि वारंवार ओटीपीची वाट पहावी लागते, ज्यामुळे पेमेंटसाठीही विलंब होतो. यासाठी आरबीआयने विमा हप्ते आणि क्रेडिट कार्ड बिल भरणे या विशिष्ट श्रेणींसाठी रक्कमेची सीमा वाढवत 1 लाख रुपयांपर्यंत केली आहे.

हे बदल सुरक्षेची खात्री देतात का?

तसेच स्वयंचलित पेमेंटचा अर्थ असा नाही की, वापरकर्त्यांना याबाबत माहिती मिळणार नाही. पैसे ऑटो-डेबिट होण्याआधी, बँकेकडून एक डेबिट अलर्टचा मेसेज पाठवला जाईल. ज्यामध्ये व्यापाऱ्याचे नाव आणि वेळेची माहिती दिलेली असेल. तसेच पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही वापरकर्त्यांकडून त्याबाबत पुष्टी केली जाईल. त्यामुळे हे पूर्णपणे सुरक्षित असेल.

वापरकर्त्यांनी काय खबरदारी घ्यावी?

दर महिन्याचे पेमेंट करणे सोपे झाले असले तरी, कधीकधी न वापरेल्या सेवांसाठीचे पैसेही खात्यातून वजा होत असतात. त्यामुळे वापरकर्त्यांनी त्यांच्या जुन्या सबस्क्रिप्शन किंवा सेवांना आधीच मंजूरी दिली आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे. सुरक्षा आणि वापरकर्त्याची संमती कायम ठेवत, खऱ्या पेमेंटची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी हे सुनिश्चित करणे, हे आरबीआयचे ध्येय आहे.

Leave a Reply