भाड्याचं घर सोडताना मालकाने अवाजवी दुरुस्ती खर्च मागितल्यास काय कराल, कायद्यातील तरतुदी येतील कामाला
Tenant and Landlord Rights in India; भाड्याचं घर सोडताना मालकाने अवाजवी दुरुस्ती खर्च मागितल्यास काय कराल, समजून घ्या नाहीतर पश्चाताप कराल! | Maharashtra Times
भाडेकरूनं घर रिकामं केल्यावर किंवा सोडून गेल्यावर घरमालक दुरुस्तीचा खर्च मागू शकतो का? भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांना अनेकदा प्रश्न पडतो. भाड्याचे घर रिकामे करताना दुरुस्तीच्या खर्चावरून अनेकदा वाद निर्माण होतो, पण या बाबतीत कायदा काय आहे हे जाणून घेणं सर्वात महत्त्वाचे आहे.
एखादा भाडेकरू जेव्हा रेंटवर घेतलेलं घर खाली करतो किंवा सोडून जातो तेव्हा घरमालक आणि भाडेकरू यांच्यात दुरुस्तीच्या खर्चावरून अनेकदा वाद निर्माण होतात. भितींना रंग देणे असो किंवा नळाची दुरुस्ती करणे असो, याचा खर्च कोण देणार यावर दोन्ही पक्षात वाद होणं सामान्य बाब आहे. कधीकधी घरमालक सुरक्षा ठेवीपेक्षा जास्त रक्कम कापून घेतो. त्यामुळे, भाडेकरूचे हक्क आणि भारतीय भाडेविषयक कायदे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
घराच्या दुरुस्तीचा खर्च कोणी करायचा?
जेव्हा एखादी व्यक्ती किंवा कुटुंब खोली रिकामी करते तेव्हा दुरुस्तीची बिले आणि अनामत रकमेवरून अनेकदा वाद निर्माण होतात. घरमालक अनेकदा भाडेकरूंवर घराचे नुकसान केल्याचा आरोप करून दुरुस्तीची मागणी करतात. पण, सामान्य वापरामुळे होणाऱ्या किरकोळ नुकसानीसाठी (जसे की भिंतीचा हलका रंग बदलणे, एखादा लहान डाग किंवा रोजच्या वापरामुळे होणारी झीज) भाडेकरू जबाबदार नसतो, तर हा खर्च घरमालकानेच उचलला पाहिजे असे कायद्यात स्पष्ट नमूद केलेले आहे.
पुराव्याशिवाय सिक्युरिटी डिपॉझिट कापणं चुकीचं
भाडेकरू केवळ स्वतःच्या निष्काळजीपणा किंवा चुकीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीसाठी, जसे की भिंती तोडणे, फिटिंग्ज तोडणे, दरवाजे आणि खिडक्यांचे नुकसान करणे किंवा घराच्या रचनेला नुकसान पोहचवण्यास जबाबदार असतो. घरभाडे करार करताना अन्यथा नमूद केले नसल्यास, घराच्या सर्वसाधारण देखभालीची, जसे की रंगकाम, भिंतींचा रंग फिका पडणे किंवा दैनंदिन वापरामुळे उद्भवणारी किरकोळ दुरुस्तीची जबाबदारी घरमालकाची असते.
घरमालक दुरुस्तीचा खर्च कधी मागू शकतो?
देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाड्याचे कायदे वेगवेगळे आहेत.आदर्श भाडेकरू कायदा, 2021, भाडेकरू आणि खोली मालक यांच्यातील आदर्श परिस्थितीचे स्पष्ट करतो. पण, मालमत्तेची स्थिती खालावल्यास काय परिस्थिती असेल याबाबत केवळ न्यायालयच निर्णय घेऊ शकते. मालमत्ता ज्या स्थितीत घेतली होती, त्याच स्थितीत परत करणे ही भाडेकरूची जबाबदारी असते पण यामध्ये सामान्य झीज आणि वापराचा समावेश नाही. मात्र, भाडेकरूने इमारतीच्या रचनेला मोठे नुकसान पोहोचवले असेल, भिंती किंवा फिटिंग्जला नुकसान पोहोचवले असेल, तर घरमालक त्यांच्याकडून दुरुस्तीची मागणी करू शकतो.
एकूणच भाडेकरू आणि घर मालकाला आपले हक्क आणि जबाबदारांची जाणीव असली पाहिजे. भाडेकरार काळजीपूर्वक वाचा, घर ताब्यात घेताना कराराच्या स्थितीची नोंद ठेवा आणि घर सोडताना योग्य कागदपत्रे सोबत ठेवा. कायद्यानुसार, घरमालक विनाकारण संपूर्ण अनामत रक्कम रोखून ठेवू शकत नाही आणि वाद टाळण्यासाठी भाडेकरूने देखील घराचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.