*जागतिक स्तरावर भारतीय करदाते सर्वाधिक प्रामाणिक; देशाच्या कर यंत्रणेची विश्वासार्हताही सर्वात जास्त – सौजन्य लोकसत्ता

Clipped from: https://www.loksatta.com/business/finance/indian-taxpayers-among-most-honest-globally-finds-international-survey-amy-95-5619043/

भारतातील करदाते हे कर भरण्यात सर्वाधिक प्रामाणिक असून, त्यांचा देशातील कर यंत्रणेवरील विश्वासही जास्त आहे. कर भरण्याकडे एक नागरी जबाबदारी म्हणून ते पाहतात, असा निष्कर्ष एका जागतिक सर्वेक्षणातून समोर आला आहे.

नवी दिल्ली: भारतातील करदाते हे कर भरण्यात सर्वाधिक प्रामाणिक असून, त्यांचा देशातील कर यंत्रणेवरील विश्वासही जास्त आहे. कर भरण्याकडे एक नागरी जबाबदारी म्हणून ते पाहतात, असा निष्कर्ष एका जागतिक सर्वेक्षणातून समोर आला आहे.

आशियातील कर यंत्रणांवरील जनतेचा विश्वास हे सर्वेक्षण एसीसीए, आयएफएसी, चार्टर्ड अकाउंटंट्स ऑस्ट्रेलिया अँड न्यूझिलंड आणि ओईसीडी यांनी केले आहे. यात २९ देशांतील १२ हजारहून अधिक जणांची मते जाणून घेण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने आशियातील देशांचा समावेश आहे. निष्पक्ष कर प्रणालीवरील आत्मविश्वास हा जगात आशियामध्ये सर्वाधिक दिसून आला असून, त्यातही प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारतात तो जास्त असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

भारतातून सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४५ टक्के जणांनी कर महसूल जनतेच्या कल्याणासाठी वापरला जात असल्याचे मत नोंदविले आहे. याचवेळी ४१ टक्के जणांनी कर भरणे हे वित्तीय ओझे नसून, समाजाप्रती दायित्व असल्याचे म्हटले आहे. भारतातील करदात्यांचा कर भरण्याबाबत अधिक नितीमान आहेत. भारतातील सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ६८ टक्के जणांनी कर चुकविणे योग्य नसून, संधी मिळाली तरी त्याकडे वळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारतातील कर प्रणाली आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे यांचा सुयोग्य संबंध असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. भारतातील ८० टक्के जणांनी शाश्वत विकासात योगदान देण्यासाठी अतिरिक्त कर देण्याची तयारी दर्शविली आहे. यातून देशातील वित्तीय धोरणाचा व्यापक स्वीकार, दीर्घकालीन सामाजिक आणि पर्यावरणीय प्रगतीवर विश्वास दर्शविण्यात आल्याचे दिसते.

आशियातील कर व्यवस्था ही युरोप आणि दक्षिण अमेरिकेएवढी समान आणि पारदर्शी असल्याचे करदात्यांचे म्हणणे आहे. याचवेळी डिजिटल कर सेवा हा कर प्रशासनातील सर्वाधिक प्रभावी पैलू आहे. त्यामुळे कर यंत्रणांकडून सहजपणे संपर्क साधला जात असून, विश्वासवृद्धी होत असल्याचे करदात्यांना वाटते, असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. या अहवालावर इंडोनेशियातील जकार्तामध्ये होणाऱ्या आयएफएसी कनेक्ट एशियापीएसी २०२५ परिषदेत चर्चा झाली होती.

अधिक कर भरण्याचीही तयारी

भारतीय करदात्यांनी शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांसाठी अधिक कर देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यातून वित्तीय धोरण आणि दीर्घकालीन समाजिक उद्दिष्टे यांच्यातील वाढता सुयोग्य संबंध समोर आला आहे. आपण दिलेला कर हा कशाप्रकारे वापरला जातो, हे नागरिकांना स्पष्टपणे समजल्यानंतर त्यांचा या व्यवस्थेवरील विश्वास अधिक वाढतो, असे एसीसीएचे संचालक (भारत), मोहम्मद साजिद खान यांनी नमूद केले.

Leave a Reply