Clipped from: https://www.loksatta.com/explained/india-new-zealand-free-trade-agreement-visa-system-attract-indians-rac-97-5601633/
New Zealand Visa System Attract Indians भारत आणि न्यूझीलंडने मार्चपासून सुरू असलेल्या वाटाघाटीनंतर सोमवारी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात फोनवर झालेल्या चर्चेनंतर हा करार झाला आहे.
न्यूझीलंड विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे व्हिसा प्रदान करते आणि त्यामध्ये अभ्यासक्रम व पात्रतेनुसार पाच वर्षांपर्यंत राहण्याची मुभा मिळते. (छायाचित्र-एआय जनरेटेड)
India New Zealand Free Trade Agreement भारत आणि न्यूझीलंडने मार्चपासून सुरू असलेल्या वाटाघाटीनंतर सोमवारी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात फोनवर झालेल्या चर्चेनंतर हा करार झाला आहे. ही भारतीय नागरिकांसाठी खूप मोठी बातमी आहे. सध्या न्यूझीलंडमध्ये सुमारे तीन लाख भारतीय वंशाचे लोक राहतात, ज्यामध्ये १.५ लाखाहून अधिक परदेशस्थ भारतीयांचा (एनआरआय) समावेश आहे. न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल पाच टक्के भारतीय आहेत.
आज ऑकलंड, वेलिंग्टन ख्राइस्टचर्च यांसारख्या शहरांमध्ये राहणारे भारतीय हे न्यूझीलंडमधील सर्वांत मोठ्या स्थलांतरित समुदायांपैकी एक आहेत. परंतु, भारतीय विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक आणि कुशल कामगारांसाठी न्यूझीलंड हे आजही पसंतीचे ठिकाण ठरत आहे. त्यामागील कारण काय? भारत-न्यूझीलंडमधील ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराचा फायदा कोणाला? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
स्टुडंट व्हिसाचे नियम
न्यूझीलंड विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे व्हिसा प्रदान करते आणि त्यामध्ये अभ्यासक्रम व पात्रतेनुसार पाच वर्षांपर्यंत राहण्याची मुभा मिळते. भारतीय विद्यार्थ्यांसाठी अलीकडील धोरणात्मक बदलांमुळे न्यूझीलंडची निवड अधिक सुलभ झाली आहे. भारत आणि न्यूझीलंडमधील वाढत्या द्विपक्षीय संबंधांमुळे आता तिथे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही.
त्याव्यतिरिक्त भारतीय शैक्षणिक पदव्यांचा समावेश आता न्यूझीलंडच्या ‘List of Qualifications Exempt from International Qualification Assessment’ (IQA) मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे व्हिसा अर्जासाठी लागणारा वेळ आणि खर्च लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांना ‘स्टुडंट व्हिसा’वरून ‘वर्क व्हिसा’वर जाणे सोपे झाले आहे. या बदलांमुळे ओशनिया क्षेत्रातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून न्यूझीलंडचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.
वर्क व्हिसा मिळणेही सोपे
न्यूझीलंड अनेक वर्क व्हिसा पर्याय उपलब्ध करून देतो, ज्यामुळे परदेशी नागरिकांना तिथे नोकरी, औद्योगिक अनुभव व दीर्घकालीन करिअरची संधी मिळते. भारतीय विद्यार्थ्यांसाठी सर्वांत महत्त्वाचा मार्ग म्हणजे ‘पोस्ट स्टडी वर्क व्हिसा’. हा व्हिसा न्यूझीलंडमधील शैक्षणिक संस्थांमधून पदवी पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणानुसार तीन वर्षांपर्यंत तिथे राहून काम करण्याची परवानगी देतो. अनेक भारतीयांसाठी हा व्हिसा शिक्षण आणि रोजगार यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरतो.
दुसरा महत्त्वाचा पर्याय म्हणजे ‘ॲक्रिडिटेड एम्प्लॉयर वर्क व्हिसा’. हा व्हिसा मिळविण्यासाठी अधिकृत मालकाकडून नोकरीची ऑफर असणे आवश्यक आहे आणि त्याद्वारे साधारणपणे तीन ते पाच वर्षे राहण्याची परवानगी मिळते. मार्च २०२५ पासून कमी कौशल्य असलेल्या कामांसाठी तीन वर्षांची मर्यादा आहे; तर उच्च कौशल्य असलेल्या कामांसाठी ही मुदत जास्त असू शकते. कुशल भारतीय व्यावसायिकांना न्यूझीलंडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी ॲक्रिडिटेड एम्प्लॉयर वर्क व्हिसा अत्यंत मोलाचा ठरतो.
त्याशिवाय न्यूझीलंडकडून कलाकार, खेळाडू, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती आणि इतर विशेष प्रतिभा असलेल्या लोकांसाठी ‘स्पेशल पर्पज वर्क व्हिसा’देखील देण्यात येतो. ही प्रणाली सर्जनशील व विशेष कौशल्यांच्या योगदानाची दखल घेते आणि भारतीय नागरिकांसाठी रोजगाराची व्याप्ती वाढवते.
मुक्त व्यापार कराराचा फायदा
पंतप्रधान मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात फोनवर झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांत हा करार झाला आहे. व्यापारापलीकडे हा करार भारतीय कुशल व्यावसायिक, विद्यार्थी आणि कामगारांसाठी नवीन संधी प्रदान करतो. न्यूझीलंडने पहिल्यांदाच कोणत्याही देशाबरोबर ‘विद्यार्थी गतिशीलता आणि पोस्ट स्टडी वर्क व्हिसा’संबंधित आराखड्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे भविष्यातील इमिग्रेशन बदलांमध्येही भारतीय विद्यार्थ्यांना धोरणात्मक स्थिरता मिळेल.
या आराखड्यांतर्गत, भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणादरम्यान दर आठवड्याला २० तासांपर्यंत काम करण्याचा अधिकार निश्चित करण्यात आला आहे. शिक्षणांनंतरच्या कामाचा कालावधीदेखील वाढवण्यात आला आहे. हा कालावधी STEM विषयातील पदवीसाठी तीन वर्षे, पदव्युत्तर पदवीसाठी तीन वर्षे आणि डॉक्टरेट (PhD) करणाऱ्यांसाठी चार वर्षे, अशा स्वरूपाचा आहे. या करारामुळे व्यावसायिकांसाठी विशेष संधीदेखील उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामध्ये दरवर्षी ५,००० कुशल भारतीय व्यावसायिकांना तीन वर्षांपर्यंत देशात राहण्याची संधी मिळणार आहे.
त्यामध्ये आयटी, अभियांत्रिकी, आरोग्य सेवा, शिक्षण व बांधकाम यांसारख्या भारत व न्यूझीलंडसाठी महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या करारामध्ये योग प्रशिक्षक, भारतीय शेफ व संगीत शिक्षक यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण भारतीय व्यवसायांना मान्यता देण्यात आली आहे आणि सांस्कृतिक व व्यावसायिक देवाणघेवाणीला अधिकृत स्वरूप दिले आहे. याव्यतिरिक्त, दरवर्षी १,००० तरुण भारतीयांना न्यूझीलंडचा ‘वर्किंग हॉलिडे व्हिसा’ मिळू शकेल, ज्यामुळे त्यांना १२ महिन्यांपर्यंत राहण्याची आणि आंतरराष्ट्रीय अनुभव घेण्याची संधी मिळेल.
न्यूझीलंडला भारतीयांची पसंती का?
न्यूझीलंडमध्ये राहणारे बहुतेक भारतीय नागरिक हे शिक्षण, काम किंवा रेसिडेंट व्हिसावर असतानाही आपले भारतीय नागरिकत्व कायम ठेवतात. ‘रेसिडेन्सी’ म्हणजे देशात अनिश्चित काळासाठी राहण्याचा आणि काम करण्याचा अधिकार. हा अधिकार नागरिकत्वापेक्षा वेगळा असतो आणि त्यामुळे राष्ट्रीयत्व बदलत नाही. एकूणच न्यूझीलंडची स्थलांतर (इमिग्रेशन) प्रणाली एका पद्धतशीर प्रवासासारखी आहे. ही प्रणाली भारतीयांना शिक्षण घेण्यास, काम करण्यास, अनुभव मिळविण्यास आणि शेवटी तिथे कायमस्वरूपी स्थायिक व्हायचे असल्यास वास्तव्यासाठी सक्षम करते.