उलटा चष्मा : रुपयाची वणवण… – Marathi News | Loksatta Ulta Chashma Article On Falling Rupee Economic Satire Vsd 99 – Latest Columns News at Loksatta.com

Clipped from: https://www.loksatta.com/sampadkiya/columns/loksatta-ulta-chashma-article-on-falling-rupee-economic-satire-vsd-99-5559898/

रोज ढासळत चाललेली त्याची प्रकृती बघून एकेदिवशी डॉलरलाच त्याची दया आली. देशातल्या संधिसाधू राजकारण्यांनी याची अवस्था पार दयनीय केली.

loksatta ulta chashma article on  falling rupee economic satireउलटा चष्मा : रुपयाची वणवण…  (प्रातिनिधीक छायाचित्र)

रोज ढासळत चाललेली त्याची प्रकृती बघून एकेदिवशी डॉलरलाच त्याची दया आली. देशातल्या संधिसाधू राजकारण्यांनी याची अवस्था पार दयनीय केली. त्यात निर्मलाकाकूंचे ते वक्तव्य. ‘रुपया आपला मार्ग स्वत:च तयार करेल.’ आता बोलायलाच हवे म्हणत डॉलर त्याच्या जवळ गेला. ‘पत कमी झाली म्हणून असे रडत बसू नको. तू इथून बाहेर पडून प्रत्येकाला जाब विचारायला हवा.’ हे ऐकून त्याच्यात थोडी धुगधुगी आली व मोठी हिंमत करून तो शेअर बाजारातून दुडुदुडु चालत बाहेर पडला.

सर्वात आधी कुणाकडे जावे? विश्वगुरू की काकू? यावर तो थबकला. अखेर मनाचा हिय्या करून सेवातीर्थावर गेला. तिथे ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देत मोठा जमाव जमलेला. त्यातून वाट काढत पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण राष्ट्रभक्तीच्या आवेशात असलेल्या कुणीही त्याला पुढे जाऊ दिले नाही. साऱ्यांनीच बाजूला ढकलले. एकदोघांना त्याने ओळख पटवून दिली पण तुच्छतेने त्याच्याकडे बघत ‘इथे धर्म धोक्यात असताना कशाला तुझे टुमणे? तुझी काळजी करूच नंतर’ असे म्हणत त्याला हाकलले गेले. एकेकाळी माझा संबंध सत्ताधाऱ्यांच्या पौरुषत्वाशी जोडणारे हेच. आता बघा कसे दूर ढकलतात असा विचार करत तो निराशेने काकूंच्या घराकडे वळला. आपल्या रक्षणाची जबाबदारी त्यांचीच.

त्यांनाच काय ते विचारावे म्हणून तो आत शिरला. त्याला बघूनच काकूंच्या कपाळावर आठ्या चढल्या. तरीही धाडसाने विचारलेच. ‘आधी तुम्ही म्हणालात, मी कमकुवत झालो नाही तर डॉलर सशक्त झालाय. आता म्हणता तुझा मार्ग तू निवड. मला असे वाऱ्यावर का सोडता?’ त्यावर त्या म्हणाल्या. ‘हे बघ, तू आलाच आहेस तर पहिले आणि शेवटचे सांगते. विरोधात असताना आम्ही तुझा आधार घेतला हे खरे पण आता राष्ट्र सशक्त आहे हे जनतेवर ठसवण्याचे अन्य मार्ग आम्ही शोधलेत. त्यामुळे तू पड की वधार- आम्हाला काही फरक पडत नाही. तेव्हा तू तुझे बघून घ्यावेस. उगीच आमच्याकडे चकरा मारून अशक्त नको होऊ.’ हे ऐकून त्याला रडूच कोसळले. ‘चोच देतो तो चाराही देईल’ ही म्हण त्याला आठवली. सरकारने तर आता हात वर केले. आपल्या गडगडण्यावर २०१४ पूर्वी चिंता व्यक्त करणाऱ्या ‘सेलेब्रिटीं’कडे तरी जाऊ असे म्हणत तो मुंबईत ‘जलसा’ बंगल्यावर गेला.

बच्चनजी म्हणाले, ‘हे बघ, तेव्हा तुझी काळजी वाहिली ती कुणाच्या तरी सांगण्यावरून. आमचे कामच तसे. सांगितले तेवढे बोलायचे. सत्ताधाऱ्यांच्या दयेमुळे आमच्या तिजोऱ्या सध्या भरून वाहताहेत. उगीच तुझ्यावर बोलून त्यांची खप्पीमर्जी कशाला ओढवू?’ हे ऐकल्यावर तो आणखीच खचला. मग तो प्रीती झिंटाकडे गेला पण त्या परदेशी असून डॉलर्सचा उपयोग करण्यात व्यग्र आहेत असे रखवालदाराने सांगितले. शेवटचा उपाय म्हणून तो रामदेवबाबांकडे गेला. तिथली योगसाधना बघून त्याला बरे वाटले. ती संपल्यावर त्यांना भेटला. आधीच्या वक्तव्याची आठवण करून दिली पण ते साधी ओळखही दाखवेनात! ‘२०१४ पूर्वी आम्ही दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याच्या धुंदीत होतो. त्यामुळे तेव्हा मी काय बोललो हे आता मला आठवत नाही. मुझे माफ कीजिए.’ हे ऐकून तो पार गळाठलाच व जड पावलांनी शेअर बाजाराकडे चालू लागला.

Leave a Reply