अग्रलेख : पतितपावन पुतिन! – Marathi News | Trump Successful Talks With Putin Over Ceasefire In Ukraine Zws 70 – Latest Editorial News at Loksatta.com

Clipped from: https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/trump-successful-talks-with-putin-over-ceasefire-in-ukraine-zws-70-5311667/

रशियाकडून युद्धविरामाचे आश्वासन घेण्यात ट्रम्प यांस यश आले असते तर त्यामुळे भारतावरील दबाव कमी होण्यास मदत झाली असती. तसे झाले नाही…

Trump successful talks with Putinरशियाकडून युद्धविरामाचे आश्वासन घेण्यात ट्रम्प यांस यश (Reuters)

प्रगत देश ज्यांना युद्धगुन्हेगार मानत होते असे पुतिन हेच अलास्कामध्ये ट्रम्प यांची ‘डीलमेकर’ ही प्रतिमा धुळीस मिळवून या चर्चेतील खरे व एकमेव लाभार्थी ठरले…

‘‘तुम्हाला काही भावभावना असतील असे तुमच्या डोळ्यात पाहून वाटत नाही’’, (आय डोंट थिंक यू हॅव अ सोल) असे थेट विधान व्लादिमिर पुतिन यांचा हात हातात घेऊन करण्याची हिंमत अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांनी दाखवली होती. त्यांचे ते विधान किती द्रष्टे होते याचा करुण साक्षात्कार मर्दुमकीचा आव आणणाऱ्या, स्वत:स ‘डीलमेकर’ म्हणवून घेणाऱ्या तोंडाळ डोनाल्ड ट्रम्प यांना पुतिन यांच्या बहुचर्चित अलास्का चर्चाभेटीनंतर निश्चित आला असणार. ‘मी पुतिन यांना सरळ करीन’, ‘त्यांना शांततेसाठी भाग पाडीन’ ‘त्यांच्यावर दणदणीत निर्बंध लादीन’ अशी एकापेक्षा एक वावदूक विधाने या वाजत्यागाजत्या चर्चेआधी करणाऱ्या ट्रम्प यांच्या हाती पुतिन यांनी या अलास्का चर्चेत शब्दश: धत्तुरा दिला आणि जगाने इतकी वर्षे युद्धखोरीसाठी बहिष्कृततेची शिक्षा दिलेले पुतिन पुन्हा पतितपावन होऊन मायदेशी रवाना झाले.

ट्रम्प यांच्यासारख्या हडेलहप्पी, आत्ममग्न आणि आढ्यताखोर नेत्यास कसे जमिनीवर आणता येते याचा उत्कृष्ट धडा म्हणजे ही अलास्का भेट. स्वत:स धुरंधर मानणारे, ट्रम्प यांच्याशी दोस्तीचा दावा करणारे अन्य काही ट्रम्प यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करत असताना पुतिन यांचा हा राजनैतिक विजय अनेकांसाठी मुत्सद्देगिरी म्हणजे काय हे शिकवून जाणारा ठरावा. भांडउभांड ट्रम्प यांना काहीही न बोलता असे सरळ करणारे पुतिन हे दुसरे. याआधी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी ट्रम्प आणि अमेरिका या दोहोंस खुंटीवर कसे टांगता येते हे दाखवून दिले. पण त्यांच्यामागे निदान सक्षम अर्थव्यवस्था तरी आहे. तथापि असा कोणता पाठिंबा नसतानाही पुतिन यांनी ट्रम्प यांस सहजी कोलवले.

पुतिन यांनी युक्रेन या शेजारी देशावर लादलेले युद्ध ही या चर्चेची पार्श्वभूमी. हे युद्ध आपण थांबवणार असा ठाम विश्वास ट्रम्प यांना होता. त्यासाठी सारे जग या बैठकीकडे डोळा लावून बसले होते. ट्रम्प यांचा हा आविर्भाव आणि आवेश पाहून युरोपीय देशांनीही बरीच पूर्वतयारी केली. खरोखरच या बैठकीत काही होईल अशी आशा त्यामुळे निर्माण झाली. बैठकीसाठी स्थळ निवडीने त्यात भर घातली. एकेकाळी सोव्हिएत रशियाच्या मालकीचे हे बेट अमेरिकेने दाम मोजून आपले केले. अशा ठिकाणच्या चर्चेसाठी ट्रम्प वेळेआधीच पोहोचले आणि मोठ्या लवाजम्यासह आलेल्या पुतिन यांच्यासाठी लाल गालिचा अंथरून बैठकीसाठी सज्ज झाले.

कॅमेराकेंद्री भरघोस हस्तांदोलने, एकमेकांचे स्मितहास्य प्रतिसाद आणि स्वत:च्या मोटारीतून न जाता ट्रम्प यांच्या समवेत त्यांच्या गाडीतून— तेही दुभाषा आणि राजनैतिक अधिकाऱ्याशिवाय— सभास्थळाकडे प्रयाण अशा सकारात्मकतेत सुरू झालेल्या या चर्चेचे फलितही तसेच असणार अशी हवा यातून तयार न होती तरच नवल. मोठ्या संख्येने जमलेले आंतरराष्ट्रीय माध्यमकर्मी या ऐतिहासिक बैठकीचा क्षण आणि क्षण कॅमेराबद्ध करून जगभरातील कोट्यवधी आतुरांपर्यंत पोहोचवत होते.

हे नेते अखेर कॅमेऱ्यांआड बंद खोलीत चर्चेसाठी गेल्यानंतर तर ही फलिताची उत्कंठा शिगेस पोहोचली. या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद झाली तर चर्चा सकारात्मक आणि तशी होणार नसेल तर ती निष्फळ अशी मांडणी खुद्द ट्रम्प आणि समर्थकांकडून केली गेल्याने चर्चेनंतरच्या पत्रकार परिषदेकडे खरोखरच सगळ्यांची नजर होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे सगळे होईपर्यंत शनिवारची पहाट उजाडली तरीही अनेकजण हे चर्चाफलित समजावून घेण्यासाठी तिष्ठत राहिले.

परंतु जवळपास चार तासांनतर हे सारे चित्र पालटले. गंभीर चेहऱ्याने हे उभयता पत्रकारांस सामोरे गेले आणि अवघ्या चार मिनिटांत ही कथित संयुक्त पत्रकार परिषद गुंडाळून मार्गस्थ झाले. काहीही झाले तरी तासतासभर पत्रकारांशी वार्तालाप करणे हा ट्रम्प यांचा अन्यदेशीय पत्रकारांस हेवा वाटावा असा गुण या प्रसंगी पूर्णपणे झाकोळला गेला आणि ‘‘चर्चेत बरेच काही हाती लागले… महत्त्वाचे काही सुटून गेले; परंतु आम्ही बरेच मार्गक्रमण केले’’ अशा जुजबी, दिखाऊ भाष्यावर ट्रम्प यांस पत्रकारांची बोळवण करावी लागली.

पत्रकारांच्या उलटतपासणीचा अजिबात अनुभव नसलेल्या पुतिन यांस त्याही अवस्थेत अमेरिकी माध्यमांनी काही अवघड प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण जणू ते काही ऐकलेच नाही असे दाखवत पुतिन यांनी त्या प्रश्नांकडे सरळ काणाडोळा केला. याचा अर्थ ही चर्चेची बहुप्रतीक्षित फेरी पूर्णत: वाया गेली असा रास्त अर्थ पत्रकारांनी लगेच काढला आणि ‘‘शस्त्रसंधीशिवाय ही चर्चा संपणे मला आवडणार नाही’’ अशी दर्पोक्ती चर्चेआधी करणारे ट्रम्प खाली मान घालून चर्चास्थळाहून प्रस्थान करते झाले.

भारतीय सत्ताधीशांस ज्याप्रमाणे ‘रिपब्लिक टीव्ही’ वाहिनी घरची त्याप्रमाणे ट्रम्प यांस ‘फॉक्स वाहिनी’चा आधार. या वाहिनीस पुतिन भेटीआधी ट्रम्प यांनी विस्तृत मुलाखत देऊन आपल्या चर्चाविजयाची पूर्वपीठिका तयार केली होती. त्यामुळे या चर्चेविषयी अनेकांच्या अपेक्षा वाढल्या. परंतु हे सारे अखेर हवा भरलेल्या फुग्यासारखेच ठरले. पुतिन यांनी आपल्या विख्यात थंड कोरडेपणाने ट्रम्प यांचा ‘डीलमेकर’ फुगा सहज फोडला. अवघ्या काही महिन्यांपूर्वी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावर ‘व्हाइट हाऊस’मधील थेट प्रक्षेपणात डाफरणाऱ्या ट्रम्प यांची पुतिन यांनी केलेली ही अवस्था सर्वार्थाने केविलवाणी म्हणावी अशी ठरली. या जखमेवर जणू मीठ चोळावे अशा पद्धतीने कधी नव्हे ते इंग्रजीत बोलून पुतिन यांनी ट्रम्प यांस चर्चेच्या पुढील फेरीसाठी मॉस्कोत येण्याचे निमंत्रण दिले.

जे झाले ते सगळ्यांसाठी एकाअर्थी धक्कादायक म्हणावे असे. या भेटीकडे इतरांप्रमाणे भारताचेही विशेष लक्ष होते. कारण रशियाकडून युद्धविरामाचे आश्वासन घेण्यात ट्रम्प यांस यश आले असते तर त्यामुळे भारतावरील दबाव कमी होण्यास मदत झाली असती. तसे झाले नाही. परंतु नंतर भारतावर जाहीर केलेले अतिरिक्त ५० टक्के आयात शुल्क आपण अमलात आणूच असे नाही, अशा अर्थाचे दिलासादायी विधान ट्रम्प यांनी केल्याने आपणास परिस्थिती हाताळण्यासाठी अधिक उसंत मिळू शकेल.

हे विधान करताना ट्रम्प हे चीनबाबतही असाच सहनशील दृष्टिकोन ठेवतील अशीही शक्यता दिसून आली. हे काही आपल्यासाठी तितके सकारात्मक म्हणता येणार नाही. म्हणजे वाटेल तसे वागणारे पुतिन आणि पूर्णपणे झिडकारणारे चीनचे क्षी जिनपिंग या दोहोंबाबत काहीसा मवाळ दृष्टिकोन अंगीकारणारे ट्रम्प भारतावर मात्र सतत डाफरणार, असा अर्थ त्यातून निघतो. तो आपणास सुखावह खचितच नाही. म्हणून ही ट्रम्प-पुतिन चर्चा आपल्यासाठी परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवते. या चर्चेचे खरे आणि एकमेव लाभार्थी ठरतात ते पुतिन आणि फक्त पुतिन.

जो गृहस्थ उत्तर कोरिया वा बेलारूस या दोन देशांखेरीज अन्यत्र कोठे पाऊल ठेवू शकत नव्हता, युरोप ज्यास उभेही करत नाही, अमेरिका ज्यास धडा शिकवू पाहते, जुन्या मित्रत्वाचा दावा करणाऱ्या भारतासारख्या देशाकडे जो पाकिस्तान संघर्षात दुर्लक्ष करतो, साऱ्या जगाशी ज्याचा एकतर वैरभाव किंवा कपटभाव त्या चीनशी जो उघड संधान बांधतो त्या व्लादिमिर पुतिन यांची सर्व पापे या चर्चेच्या निमित्ताने ट्रम्प यांच्याकडून धुतली गेली. हजारो परदेशी, शेकडो स्वदेशींच्या हत्येने ज्याचे हात रंगलेले आहेत त्या पुतिन यांस पतितपावन करण्याखेरीज या चर्चेत काहीही साध्य झाले नाही. बोलघेवड्या आत्मप्रौढांचे असेच होते हे यातून पुन्हा सिद्ध झाले, इतकेच.

Leave a Reply