भावांनो! तुम्हालाही वडीलोपार्जित मालमत्ता मिळाली आहे? Inherited प्रॉपर्टीमधून पैसे कमवल्यास… |​​सौजन्य महाराष्ट्र टाइम्स  ​

Clipped from: https://marathi.indiatimes.com/business/real-estate-news/income-tax-rules-for-ancestral-property-and-inheritance-legal-rules-in-india-should-know/articleshow/122827956.cms

Income Tax on Ancestral Property Rule : आयकर विभागाने करदात्याला वारसा किंवा मृत्युपत्राद्वारे मिळालेल्या जंगम किंवा स्थावर मालमत्तेबद्दल कधीही प्रश्न विचारला तर करदात्याला पैसे किंवा मालमत्ता इत्यादी पालक किंवा मृत्युपत्र किंवा वडिलोपार्जित मालमत्ता किंवा वारसा म्हणून मिळाली असल्याचे सिद्ध करावे लागेल.

वडिल किंवा आजोबांकडून वारशाने मिळालेल्या मालमत्तेवर सरकार कर आकारत नाही का? (फोटो- ET Online)

मुंबई : आपल्या देशात स्पष्ट मालमत्ता कायदे असूनही वडिलोपार्जित किंवा वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीबाबत लोकांमध्ये गोंधळ उडतो. यामागेचे कारण म्हणजे की लोकांना याबाबत केलेल्या कायद्यांची माहिती नसते. अशा प्रकरणातील खटले इतके गुंतागुंतीचे असतात की वर्षानुवर्षे न्यायालयात चालतात. जेव्हा एखाद्याला पालक, आजी-आजोबा किंवा कोणत्याही नातेवाईकाकडून मालमत्ता वारसाहक्काने मिळते किंवा मृत्युपत्राद्वारे घर किंवा जमीन मिळते तेव्हा तिला वडिलोपार्जित किंवा कौटुंबिक मालमत्ता म्हणतात. पण मोठा प्रश्न असा आहे की अशा मालमत्तेवर कर भरावा लागतो का?

भारतात वारसा कायदा काय सांगतो
भारतात काही वर्षांआधीपर्यंत वारसा कराचा कायदा लागू व्हायचा पण सरकारने 1985 मध्ये हा कायदा रद्द केला आहे. म्हणजे तुम्हाला पालक किंवा आजी-आजोबा किंवा कोणाच्या मृत्युपत्राद्वारे मालमत्ता मिळाली तर तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. याआधी मृत व्यक्तीच्या मालमत्तेवर 85% पर्यंत कर आकारला जात असे, पण आता तसं घडत नाही.

1961 आयकर कायदा नुसार मृत व्यक्तीकडून वारशाने मिळालेली मालमत्ता उत्पन्न म्हणून गणली जात नाही. म्हणून जेव्हा तुम्हाला एखादी संपत्ती किंवा प्रॉपर्टी वारसा हक्काने मिळाली तर तुम्हाला त्यावेळी कोणताही कर भरावा लागत नाही. एवढंच नाही तर यामध्ये पेच असा आहे की तुम्ही त्या मालमत्तेतून कोणतेही उत्पन्न मिळवले, जसे की भाड्याने देणे, विकणे किंवा बँकेत ठेवणे आणि त्यावर व्याज मिळवणे, तर तुम्हाला त्या उत्पन्नावर कर भरावा लागेल.भाडे किंवा व्याजावर भरावा लागतो टॅक्स
उदाहरणार्थ, तुम्हाला आजोबांचे जुने घर वारसाहक्काने मिळाले आणि तुम्ही भाड्याने दिले तर तुम्हाला मिळणाऱ्या भाड्यावर टॅक्स आकारला जाईल. त्याचप्रमाणे, तुमच्याकडे मालमत्ता बँक खात्यासह असेल आणि तुम्हाला त्यावर व्याज मिळत असेल, तर त्या व्याजावर देखील कर आकारला जाईल.

मालमत्तेच्या विक्रीवर LTCG टॅक्स लागणार
त्याचवेळी, तुम्हाला वारसा हक्काने मिळालेली जमीन किंवा घर विकायचे असेल तर तुम्हाला त्यावर भांडवली नफा कर भरावा लागेल, जो मूलतः मूळ मालकाने मालमत्ता कधी खरेदी केली या आधारावर निश्चित केला जातो – तुम्ही ती कधी विकली या आधारावर नाही.

समजा तुम्ही मालमत्ता दोन वर्षांपेक्षा जास्त काळ धारण केली असेल तर त्यावर होणार नफा दीर्घकालीन भांडवली मानला जाईल आणि त्यावर 20% कर (काही विशेष सूटांसह) आकारला जाईल.

याशिवाय, तुम्ही दोन वर्षांपेक्षा कमी काळासाठी मालमत्ता धारण केली आणि नंतर विकली तर त्यावरील नफा अल्पकालीन मानला जाईल. अशा परिस्थितीत, तुमच्या उत्पन्नानुसार त्यावर कर आकारला जाईल – म्हणजेच, तुमचा सामान्य कर स्लॅब काहीही असो, तुम्हाला त्यानुसार कर भरावा लागेल.

वडिलोपार्जित संपत्ती टॅक्स-फ्री पण कमाईवर लागेल कर
एकूणच तुम्हाला वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता किंवा प्रॉपर्टी पूर्णपणे करमुक्त आहे पण तुम्हाला त्या मालमत्तेतून कोणतेही उत्पन्न मिळाले, मग भाडे असो, व्याज असो किंवा विक्रीतून नफा असो – तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल. म्हणून, जेव्हा तुम्हाला मालमत्ता मिळेल तेव्हा तुम्हाला कायदेशीर वापर, उत्पन्न आणि विक्री याबाबतचे कर नियम माहित असले पाहिजेत. यामुळे तुम्हाला भविष्यात कोणत्याही कायदेशीर अडचणी टाळण्यास मदत होईल.

Leave a Reply