निर्भय ‘कॉम्रेड’ – former kerala cm vs achuthanandan passes away at 101 – Maharashtra Times

Clipped from: https://marathi.indiatimes.com/editorial/manasa/former-kerala-cm-vs-achuthanandan-passes-away-at-101/articleshow/122855872.cms

​​VS Achuthanandan: केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी १९९१-९६, २००१-०६ आणि २०११ ते २०१६ असे तीनदा काम केले. तिरुअनंतपुरम येथील खासगी रुग्णालयात सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, तेव्हा त्यांचे वय १०१ वर्षे होते.

VS Achuthanandan (फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

वेलिक्ककातू शंकरन तथा व्ही. एस. अच्युतानंदन यांच्या निधनामुळे सर्वसामान्य, गरीब व वंचित केरळी नागरिकांसाठी लढणारा एक निर्भय ‘कॉम्रेड’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. तब्बल आठ दशकांची राजकीय कारकीर्द असलेले अच्युतानंदन यांनी केरळचे मुख्यमंत्री म्हणून २००६ ते २०११ अशी पाच वर्षे काम पाहिले.

केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी १९९१-९६, २००१-०६ आणि २०११ ते २०१६ असे तीनदा काम केले. तिरुअनंतपुरम येथील खासगी रुग्णालयात सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, तेव्हा त्यांचे वय १०१ वर्षे होते. कम्युनिस्ट पक्षाचे एक सच्चे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातील. भारतात १९६४ मध्ये कम्युनिस्ट पक्षात मोठी फूट पडली, तेव्हा ज्या ३२ प्रमुख नेत्यांनी बाहेर पडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली, त्यात अच्युतानंदन एक होते. अळपुळा जिल्ह्यात पुन्नाप्रा नावाच्या खेड्यात २० ऑक्टोबर १९२३ रोजी अच्युतानंदन यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण गरिबीत गेले. लहानपणीच माथ्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले. सातवीत त्यांनी शाळा सोडली. त्यांचे भाऊ गंगाधरन यांच्या शिवणकामाच्या दुकानात ते काम करू लागले. तेथील ग्राहकांच्या राजकीय चर्चा त्यांच्या कानी पडू लागल्या. पुढे काथ्या वळण्याचे काम करताना तेथील मजुरांशी, श्रमिकांशी त्यांचा जवळून संपर्क आला. या वर्गाच्या सुख-दु:खाशी ते समरस झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि वयाच्या सतराव्या वर्षी ते तत्कालीन अविभाजित कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले.

काथ्या वळणाऱ्या कामगारांची एकजूट करून त्यांना आपल्या हक्कासाठी संघर्ष करायला लावण्यात त्यांनी पुढाकार घेतला. तत्कालीन त्रावणकोर संस्थानच्या दिवाणाविरुद्ध त्यांनी मोठा संघर्ष उभारला. त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला. त्यांचे नेतृत्व असे तावून-सुलाखून निघाले होते. भविष्यातही अनेक मोठमोठी पदे भूषविताना त्यांचे पाय जमिनीवरच राहिले. देवभूमीतील या सच्च्या ‘कॉम्रेड’ला अखेरचा लाल सलाम!

Leave a Reply