Clipped from: https://www.loksatta.com/lokrang/indira-gandhi-emergency-50-years-and-vinoba-bhave-css-98-5175144/
‘‘असहकार म्हणजे कर देऊ नका, सरकारचे आदेश पाळू नका, या सरकारला नैतिक, कायदेशीर व घटनात्मक अधिकार नाही, तसेच पोलीस व सैन्याने सरकारचे अनैतिक आदेश पाळू नये!’’
आणीबाणी आणि विनोबा (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
विजय प्र. दिवाण
६ मार्च १९७५ रोजी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांनी संसद भवनावर प्रचंड मोर्चा काढला. तेथे देशव्यापी असहकाराची चळवळ उभारण्याची घोषणा करण्यात आली. जयप्रकाशजींनी जनतेला आदेश दिला की, ‘‘असहकार म्हणजे कर देऊ नका, सरकारचे आदेश पाळू नका, या सरकारला नैतिक, कायदेशीर व घटनात्मक अधिकार नाही, तसेच पोलीस व सैन्याने सरकारचे अनैतिक आदेश पाळू नये!’’ या पार्श्वभूमीवर मार्च १९७५ रोजी जयप्रकाश यांच्या उपस्थितीत वर्धा येथे ‘सर्व सेवा संघ’चे अधिवेशन झाले. अधिवेशनानंतर १४ मार्च १९७५ रोजी जयप्रकाशजी विनोबांना वर्धा येथे पवनार आश्रमात भेटले. यावेळी विनोबांचे वर्षभराचे मौन सुरू होते. तरीही मौन तोडून विनोबा जयप्रकाशजींना म्हणाले- ‘‘एका बाजूला चीन पाकिस्तानला मदत करतो आहे. दुसऱ्या बाजूने अमेरिका पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवीत आहे. आपण जागतिक परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. या दृष्टीने देश दुर्बळ न होवो म्हणून देशाच्या हितासाठी राजसत्तेच्या विरोधात चाललेले आंदोलन बंद केले पाहिजे. असे केले तर बाबाची (विनोबांची) पूर्ण सहानुभूती व मदत तुम्हाला मिळेल. यात बाबाची जागतिक दृष्टी आहे. बाबा भारताच्या राजनीतीविषयी फार विचार करीत नाही. जागतिक राजनीतीविषयी विचार करतो.’’ यावर जयप्रकाशजींनी विनोबांना लिहून सांगितले, ‘‘मला असे वाटत नाही की, भारताच्या अंतर्गत प्रश्नांना घेऊन शांतिमय संघर्ष केल्याने देश दुर्बल बनेल. देशाची अंतर्गत स्थिती भयंकर आहे. मला भय आहे की जर अशा परिस्थितीत जनतेने प्रश्न सोडविण्यासाठी जर काही शांतिमय आंदोलन केले नाही तर देशात हिंसा उसळेल व जागतिक दृष्टीने तो दुर्बळ बनेल.’’१९७४-७५ च्या भारताच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीकडे पाहण्याचा विनोबा जयप्रकाशजींचा असा भिन्न दृष्टिकोन होता. विनोबा व इंदिराजीही ज्या देशांतर्गत व जागतिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर भूमिका घेत होते ती १९६६ ते १९७५ पर्यंतची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे.