कोंडलेला श्वास; गोठलेली मने – महाराष्ट्र टाइम्स्

Clipped from: https://marathi.indiatimes.com/editorial/mumbai-air-quality-index-special-explainer-maharashtra-times/articleshow/116786293.cms

Mumbai AQI : मुंबईतला एक्यूआय (एअर क्वालिटी इंडेक्स) म्हणजेच हवा गुणवत्ता निर्देशांक झपाट्याने खाली गेला आहे. ही स्थिती मुंबईकरांच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असून शक्य त्यांनी बाहेर जाताना करोना काळात लावला होता; तसा मास्क लावणे श्रेयस्कर आहे.

mumbai aqi

महामुंबईचा श्वास कोंडला गेला आहे. पुण्याची अवस्था काही निराळी नाही. सोलापूर हे तर वातावरणाच्या प्रदूषणात राष्ट्रीय पातळीवर सतत चमकत असते. मुंबईतला एक्यूआय (एअर क्वालिटी इंडेक्स) म्हणजेच हवा गुणवत्ता निर्देशांक झपाट्याने खाली गेला आहे. ही स्थिती मुंबईकरांच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असून शक्य त्यांनी बाहेर जाताना करोना काळात लावला होता; तसा मास्क लावणे श्रेयस्कर आहे.

रविवारी दुपारी मुंबईतील बहुतेक उपनगरांमधील हवा कमालीची प्रदूषित होती आणि काही भागांमध्ये तर ती धोकादायक या पातळीवर जात होती. काही तज्ज्ञांच्या मते मुंबईतील आजच्या हवेत श्वसन करणे म्हणजे रोज सरासरी तीन सिगरेटी फुंकण्याइतकेच धोकादायक आहे. ज्यांची अद्याप शारीरिक वाढ होते आहे आणि जी अर्भके नुकतीच या जगात आली आहेत; त्यांच्यासाठी ही हवेची पातळी किती धोकादायक आहे; याची कल्पनाही करवत नाही. मुंबईला वरदान असलेल्या अरबी समुद्रात पूर्वेकडे वाहणारे जोरदार वारे वाहू लागतील आणि ते आपल्या जोमदार प्रवाहात मुंबईवरची सारी प्रदूषके वाहून नेतील, अशी केवळ आपण आशा करू शकतो. तसे जोवर होत नाही, तोवर मुंबईचा श्वास असाच अडकून पडणार.

मुंबईतील प्रचंड बांधकामे, रस्त्यांची कामे, लक्षावधी वाहनांचा धूर, धोकादायक पदार्थांचे ज्वलन करणारे असंख्य बेकायदा उद्योग, प्रदूषण करणारे कारखाने, जाळला जाणारा कचरा. अशी सारी कारणे एकवटून आली आहेत. त्यातच वारा पडलेला असल्याने हे प्रदूषण कमी होण्याची काही शक्यता किंवा चिन्हे नाहीत. दिल्लीच्या सीमेवर पराटी जाळल्याने प्रदूषण वाढल्याची चर्चा होते. मात्र, मुंबईत फेरफटका मारला तर असंख्य ठिकाणी कचरा, झाडांची पाने, लाकूड किंवा रासायनिक प्रदूषण करणाऱ्या चिजा पेटवून दिलेल्या दिसतील. हे सगळे मुंबईकरांच्या जिवावर उठते आहे; याचे कोणतेही गांभीर्य राज्य सरकार, महापालिका, समाज आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्था यांच्यामध्ये दिसत नाही.

मुंबईच्या क्षितिजावर किंवा हवेत दिसणारे धुके नसून ते धुरके म्हणजे धुके आणि धूर यांचे प्राणघातक संमिश्रण आहे. या धुरक्यात कार्बन मोनोक्साइड, सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजन डाय ऑक्साइड, ओझोन आणि वाहने, आगी, कारखाने यांच्यातून निघणारी पीएम २.५ व पीएम १० ही श्वासातून थेट प्रवेश करू शकणारी अत्यंत सूक्ष्म प्रदूषके असे सारेच आहे. आधीपासून त्रास असणाऱ्या नागरिकांचा दमा बळावा किंवा खोकलेकरी व सर्दीचे रुग्ण प्रचंड संख्येने वाढावेत, यात काहीच नवल नाही. मात्र, या लक्षणांपेक्षाही सतत प्रदूषित हवेत राहिल्यामुळे शरीरांवर होणारे कायमस्वरूपी घातक परिणाम किती तरी धोकादायक आहेत आणि लगेच मोठा विकार जडला नाही तरी ते भिनत जाणाऱ्या विषाप्रमाणे आयुर्मर्यादा घटवतच असतात. हवामान, हवेतील आर्द्रता, वाऱ्यांचा वेग आणि दिशा यांच्यात फरक पडला की मुंबईवरचे सध्याचे मळभ लगेच दूर होईल आणि निर्देशांक धोक्याच्या पातळीच्या खाली येईल. ते झाले की सारे आत्ताचे हे संकट विसरूनच जातील आणि पुन्हा कधी तरी मुंबईचा श्वास कोंडल्याशिवाय कुणाला जाग येणारच नाही.

अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री असताना त्यांनी खासगी वाहनांच्या बाबतीत सम-विषम अशी पद्धत आणली. याने तत्त्वत: रोजचा खासगी वाहनांचा वापर निम्म्यावर येऊ शकतो. हा प्रयोग मुंबईतही करून पाहायला हवा. त्याचप्रमाणे, वाहनांची कठोर तपासणी व्हायला हवी. मुंबईत सध्या बांधकामे तसेच रस्त्यांची कामे करताना प्रदूषण होऊ नये, हवेत सतत धूळ उडू नये, यासाठी आवश्यक ते इलाज केले जात नाहीत. चांगला प्रसार झालेल्या शहरी वनीकरणाचा एक परिणाम म्हणजे पाने, गवत, फांद्या यांचे कंपोस्ट करण्याऐवजी अनेकदा ते सारे जाळून टाकण्याकडे कल असतो. त्याने कर्बोत्सर्जन कमालीचे वाढते. भारताची क्षयरोगाच्या विरोधात मोठी लढाई चालू आहे. पण ती जिंकायची असेल तर मुंबईसारख्या महानगरात प्रदूषण आटोक्यात ठेवावेच लागेल. याचे कारण, प्रदूषित हवा पहिला हल्ला फुफ्फुसांवरच करते.

डोळे, हृदय हेही तिच्या तावडीत सापडतात. प्रदूषणामुळे फुफ्फुसांची ताकद कमी होणार असेल तर आधीच क्षय असणारे तसेच क्षयाची संभाव्यता असणारे नागरिक या विकाराशी कसा काय प्रभावी लढा देऊ शकणार? प्रदूषित हवा आणि फुफ्फुसांचा कर्करोग यांच्यातील संबंध तर आधीच शास्त्रज्ञांना ज्ञात झाला होता. आता मूत्राशयाचा कर्करोग आणि प्रदूषण यांचाही संबंध असतो; अशा निष्कर्षावर वैज्ञानिक आले आहेत. तेव्हा हवेचे प्रदूषण हे अत्यंत गंभीरपणे घ्यावयाचे आव्हान आहे; हे संवेदना गोठलेल्या यंत्रणांना आणि सरकारला जितक्या लवकर कळेल तितके बरे.

Leave a Reply