https://www.loksatta.com/lifestyle/dont-like-to-eat-cluster-beans-after-reading-these-seven-amazing-benefits-sap-20-4405419/ Shared by Loksatta android app click here to download https://loksatta.page.link/LS_app
Clipped from: https://www.loksatta.com/lifestyle/dont-like-to-eat-cluster-beans-after-reading-these-seven-amazing-benefits-sap-20-4405419/
Cluster Beans Benefits: गवारीची भाजी हा फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. तसेच ही भाजी ए, बी, सी व के ही जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात प्रदान करते.
गवारीच्या भाजीचे सात जबरदस्त फायदे (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
Cluster Beans Benefits: आपले शरीर नेहमी सुदृढ ठेवण्यासाठी डॉक्टर आहारात जास्तीत जास्त हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. हिरव्या भाज्या केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर अनेक गंभीर आजारांशी लढण्यासाठीही मदत करतात. भारतीय आहारात अनेक विविध प्रकारच्या हिरव्या भाज्यांचाही समावेश केला जातो. त्यामध्ये विविध चवीच्या भाज्या आहेत. गवार ही त्यातलीच एक भाजी आहे. गवारीच्या भाजीचं नाव जरी ऐकलं तरी अनेक जण नाक-तोंड मुरडतात. पण, तुम्हाला ठाऊक आहे का गवारीची भाजी खाण्याचे खूप चमत्कारी फायदे आहेत.
गवारीची भाजी हा फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. तसेच ही भाजी ए, बी, सी व के ही जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात प्रदान करते. त्यात कॅल्शियम, आयर्न व पोटॅशियम हे उपयुक्त घटकदेखील आढळतात.
गवारीच्या भाजीचे फायदे
मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर
गवारीची भाजी आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. गवार भाजीच्या सेवनानं रक्तातील साखरेच्या पातळीत झपाट्यानं चढ-उतार होत नाही. त्यामुळे मधुमेहींसाठी गवारीची भाजी खाणं फायदेशीर आहे.
हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त
गवारीच्या भाजीमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. तसेच या भाजीच्या सेवनानं हाडांचं नुकसान होण्यापासून संरक्षण होतं. या भाजीमध्ये फॉस्फरस असल्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत मिळते.
पचनास फायदेशीर
गवारीची भाजी पचनासाठी खूप फायदेशीर आहे. या भाजीच्या सेवनानं आतड्यांच्या हालचालींना चालना मिळते; ज्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. तसेच ही भाजी पोटातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि पचनासंबंधित समस्या दूर करण्यास मदत करते.
हृदयासाठी फायदेशीर
गवारीची भाजी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयाला निरोगी ठेवते. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम असल्यामुळे हृदयाच्या अनेक समस्यांपासून बचाव होतो.
रक्तदाबावर नियंत्रण
गवारीच्या भाजीमध्ये हायपोग्लायसेमिक आणि हायपोलिपिडेमिक हे गुणधर्म असतात; जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी गुणकारी आहे. मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या लोकांना उच्च रक्तदाबाचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत गवारीच्या भाजीचे सेवन त्यांना फायदेशीर ठरू शकते.
हेही वाचा: आयुर्वेदानुसार चिकन, मटण खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ पदार्थ; कारण…
मासिक पाळीसाठी फायदेशीर
गवारीच्या भाजीचे सेवन मासिक पाळीमध्ये खूप फायदेशीर आहे. मासिक पाळीमध्ये होणारा त्रास यामुळे काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
मानसिक शांतीचा लाभ
गवारीच्या भाजीमुळे हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात; जे चिंता आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. गवारीच्या भाजीमुळे व्यक्तीला मानसिक शांती मिळण्यास मदत होते.