प्रौढ साक्षरतेच्या मेरुमणी-कार्तियानी अम्मा – tribute to karthyayani amma who became hero of literacy campaign – Maharashtra Times

https://maharashtratimes.com/editorial/manasa/tribute-to-karthyayani-amma-who-became-hero-of-literacy-campaign/articleshow/104389103.cms

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/manasa/tribute-to-karthyayani-amma-who-became-hero-of-literacy-campaign/articleshow/104389103.cms

Karthyayani Amma Passes Away: केरळच्या प्रौढ शिक्षण अभियानातील सर्वाधिक वयाच्या विद्यार्थिनी ठरलेल्या अम्मांनी वयाच्या १०१ व्या वर्षी अंतिम इच्छेप्रमाणे राहत्या घरातच अखेरचा श्वास घेतला. जाणून घ्या त्याच्यांबद्दल…

kartiyana ammaप्रौढ साक्षरतेच्या मेरुमणी-कार्तियानी अम्मा

देशभरात ‘पोस्टर गर्ल’ म्हणून प्रसिद्धी पावलेल्या कार्तियानी अम्मा यांच्या निधनाने केरळच नव्हे, तर जगभरातील साक्षरता मोहिमेची हानी झाली, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. केरळच्या प्रौढ शिक्षण अभियानातील सर्वाधिक वयाच्या विद्यार्थिनी ठरलेल्या अम्मांनी वयाच्या १०१ व्या वर्षी अंतिम इच्छेप्रमाणे राहत्या घरातच अखेरचा श्वास घेतला. अक्षरलक्ष्यम् साक्षरता अभियानात कार्तियानी वयाच्या ९६ व्या वर्षी राज्यात पहिल्या आल्या अन् भारतासह साऱ्या जगाला त्यांची दखल घेणे भाग पडले.

चौथीच्या समकक्ष असलेल्या परीक्षेत ४३,३३० प्रौढ विद्यार्थ्यांमध्ये त्या सर्वाधिक गुण मिळवित उतीर्ण झाल्या. वाचन आणि गणितात पैकीच्या पैकी गुण मिळाले, तर लेखन परीक्षेत चाळीसपैकी ३८ गुण. ‘मी विनाकारण खूप अभ्यास केला. परीक्षा तर खूपच सोपी होती. मी शिकलेले बरेचसे प्रश्न परीक्षेत विचारलेच गेले नाहीत,’ अशी प्रतिक्रिया अम्मांनी या निकालानंतर दिली. त्यांना प्रेरणास्रोत मानून गावागावांमध्ये सायंकाळच्या सुमारास प्रौढ मंडळी वर्गात जमू लागली. शिक्षणावर बोलू लागली, बाराखडी गिरवू लागली आणि केरळची साक्षरता मोहीम यशस्वितेची पुढची पायरी चढली. कार्तियानी या मोहिमेच्या सर्वेसर्वा ठरल्या, सोबतच त्यांच्यापासून प्रेरणा घेत असंख्य अशिक्षित व कधी शाळाही न पाहिलेले प्रौढ साक्षरतेच्या प्रवाहात येऊ शकले. पहाटे चार वाजता दिनचर्या सुरू करणाऱ्या आणि आयुष्यभर शाकाहाराचे व्रत जोपासलेल्या अम्मा कधी आजारी पडल्या नाहीत, की त्यांना रुग्णालयातही दाखल व्हावे लागले नाही.

आलपुझ्झा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अम्मा अठरा विश्वे दारिद्र्यामुळे बालपणी शाळेत जाऊ शकल्या नव्हत्या. पतीच्या निधनानंतर हाती झाडू घेऊन, गल्लोगल्ली स्वच्छता करीत अन् प्रसंगी मिळेल ते काम करून त्यांनी सहा मुलांचे संगोपन केले. मोठी मुलगी वयाच्या साठाव्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि तिच्या यशापासूनच अम्मांना शिक्षणाची वाट गवसली. पुढे त्या शिक्षणदूतच बनल्या. प्रौढ शिक्षणातील कार्यामुळे सन २०२० मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. साक्षरता मोहिमेच्या मेरुमणी ठरलेल्या अम्मांना श्रद्धांजली!

Leave a Reply