सहमतीचा शिल्पकार- अमिताभ कांत – Maharashtra Times

https://maharashtratimes.com/editorial/manasa/g20-summit-2023-who-is-indias-sherpa-amitabh-kant/articleshow/103594635.cms

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/manasa/g20-summit-2023-who-is-indias-sherpa-amitabh-kant/articleshow/103594635.cms

Amitabh Kant G20 Sherpa : जी ट्वेंटी’ राष्ट्रप्रमुखांच्या यशाचा परमोच्च बिंदू ठरला, तो दिल्ली जाहीरनामा; आणि तो तयार करण्यात सर्वाधिक वाटा उचलणारे या परिषदेतील भारताचे शेर्पा अमिताभ कांत. जाणून घ्या कोण आहेत अमिताभ कांत?

Amitabh kant.सहमतीचा शिल्पकार- अमिताभ कांत

नुकत्याच पार पडलेल्या ‘जी ट्वेंटी’ राष्ट्रप्रमुखांच्या यशाचा परमोच्च बिंदू ठरला, तो दिल्ली जाहीरनामा; आणि तो तयार करण्यात सर्वाधिक वाटा उचलणारे या परिषदेतील भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी या यशाचे श्रेय कांत आणि त्यांच्या चमूला दिलेच; त्यासह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुत्सद्दी आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही ‘कांत यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) निवडल्यामुळे देश एका मुत्सद्द्याला मुकला,’ या शब्दांत त्यांचे मनापासून कौतुक केले. कांत, त्यांचे सहसचिव इनाम गंभीर आणि नागराज नायडू यांच्या पथकाची कामगिरी त्या कौतुकाला साजेशीच आहे. सध्या साऱ्या जगावर रशिया-युक्रेन युद्धाचे सावट आहे. गेल्या ‘जी ट्वेंटी’ परिषदेत या विषयावरील ठरावात रशियावर टीका केल्याने रशिया व चीन नाराज होते. त्या पार्श्वभूमीवर यंदा हा ठराव, हे साऱ्या परिषदेपुढील आव्हान ठरले होते. मात्र, कांत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या विषयावर एकमत घडवून आणण्यासाठी तब्बल तीनशे द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि ठरावाचे १५ मसुदे तयार केले. अखेर त्यांच्या कष्टाला यश आले.

परिषदेच्या पहिल्याच दिवशी हा ठराव एकमताने मंजूर झाला. त्याामध्ये रशियाच्या नावाचा थेट उल्लेख न करता युक्रेन आणि मानवाधिकाराच्या मुद्द्याला कौशल्याने स्पर्श करण्यात आला आहे. त्यामध्ये ८१ परिच्छेद असून, प्रत्येकावर सर्व राष्ट्रांची सहमती मिळविण्यात भारताला यश आले. या ठरावाचे शिल्पकार कांत हे या सहमतीमागील राजनीतीचे नायक ठरले आहेत. दिल्लीत शालेय-महाविद्यालयीन शिक्षण घेऊन जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळविली. भारतीय प्रशासकीय सेवेतील १९८०च्या तुकडीत केरळ केडरमध्ये ते दाखल झाले. विविध पदांवर कामे केल्यानंतर नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणून त्यांच्यावर जबाबदार सोपविण्यात आली. ‘जी ट्वेंटी’साठी भारताचे शेर्पा म्हणून झालेली निवड अमिताभ कांत यांनी त्यांच्या कर्तबगारीने सार्थ ठरविली आहे.

Leave a Reply