गेले लिहायचे राहून.. : लाच | लोकसत्ता

Clipped from: https://www.loksatta.com/chaturang/gele-lihayche-rahun-author-mrudula-bhatkar-bribe-government-work-dishonesty-support-ysh-95-2917518/

‘‘हल्ली लाच कोण घेत नाही? असं आपण अगदी सहज बोलून जातो. सरकारी कामात लाच घेतच असणार आणि ती दिल्याशिवाय काहीही होणार नाही, हे तर गृहीतकच होऊन गेलं आहे.

मृदुला भाटकर

‘‘हल्ली लाच कोण घेत नाही? असं आपण अगदी सहज बोलून जातो. सरकारी कामात लाच घेतच असणार आणि ती दिल्याशिवाय काहीही होणार नाही, हे तर गृहीतकच होऊन गेलं आहे. कुठून रुजला इतका अप्रामाणिकपणा आपल्यात? लाच खाण्याचं समर्थन करणारेही भेटतातच की आपल्याला! लाच घेणं आणि देणं याचे अनेक पैलू मला माझ्या न्यायाधीशपदाच्या कारकीर्दीत बघायला मिळाले. त्यातले हे काही क्लिक्स्..’’

अभिषेक बच्चनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दसवीं’ चित्रपटातलं त्याच्या तोंडी असलेलं वाक्य मी अलीकडेच ऐकलं, ‘सरकारी नौकर एक जो हैं उसे काम न करनेका वेतन मिलता हैं और काम करनेकी रिश्वत!’ त्या संदर्भात मला आर्य चाणक्यांचं भ्रष्टाचारावरचं निरीक्षण आठवलं, ‘तळय़ातला मासा जसं पाणी किती आणि कधी पितो हे कळत नाही, तसंच सरकारी नोकर पैसा कधी आणि किती खातो हे लक्षात येत नाही.’  आणि मी एकाएकी चोवीस वर्ष मागे गेले.

१९९८च्या जून महिन्यात मी कामानिमित्तानं माझ्या नऊ सहकाऱ्यांबरोबर इंग्लंडमधल्या बर्मिगहॅम इथल्या काऊंटी कोर्टात गेले होते. ब्रिटिश न्यायाधीशांबरोबर दुपारचं जेवण होतं. अर्थात तो कामाचा दिवस असल्यामुळे सगळे एकत्र न येता आठ-नऊ ब्रिटिश न्यायाधीश  जेवणाच्या टेबलावर एक-एक करून आले. माझ्या शेजारची एक खुर्ची मात्र मोकळीच होती. पण तिथे काटे-चमचे मांडलेले होते. त्या न्यायाधीशांसाठी आम्ही थांबलो होतो. ‘त्यांना उशीर होत आहे, कारण त्यांच्याकडे भ्रष्टाचारविषयक खटला सुरू आहे. तेव्हा आपण सुरुवात करू,’ असं इतर न्यायाधीशांनी सांगितल्यामुळे आम्ही सूप घेऊन जेवणाला सुरुवात केली. तेवढय़ात ते आले. त्यांनी खुर्चीत बसल्याबसल्या सगळय़ांची क्षमा मागितली. मला म्हणाले, ‘‘लाच घेण्याचा एक दीर्घ खटला गेले सहा आठवडे सुरू आहे.’’ आतापर्यंत त्यांच्याकडे चाललेला हा सर्वात लांबलचक खटला! आम्ही दोघं त्यांच्या खटल्याबद्दल थोडं बोललो, तेवढय़ात त्यांनी मला प्रश्न विचारला, ‘‘This is a first corruption case in our court in last ten years.  Do you have corruption case in Mumbai?’’ मी माझा सूपचा ठसका कसातरी आवरला, ‘‘होय होय, आहेत ना!’’

  ‘‘Have you ever come across a corruption case?’’

‘‘होय, म्हणजे मी लाचलुचपत प्रतिबंधक कोर्टाची आता विशेष न्यायाधीश आहे आणि मी रोजच सहा तास हे खटले चालवते. माझ्या एकटीच्या कोर्टात लाच घेण्याचे फक्त मुंबईतले सुमारे २४२ खटले आहेत आणि अशी आणखी दोन विशेष कोर्ट मुंबईत आहेत.’’ ही सगळी माहिती मी एका फटक्यात दिली. आता सूपचा ठसका त्यांना आवरता आला नाही.    

प्रामाणिकपणात इंग्रज माणूस फार वरच्या दर्जाचा! त्यामुळे लाच खाण्याचं प्रकरण हा तिथे कमी घडणारा गुन्हा. त्यांच्याकडे लाच घेण्याविरुद्धचा कायदा १९०९ मध्ये केला गेला, तर आपल्याकडे स्वतंत्र भारतात १९४७ मध्ये. नंतर १९८८ मध्ये ‘लाचलुचपत प्रतिबंधक कायदा’ अस्तित्वात आला. खासगी कामाच्या ठिकाणी पैसे मागणं- खाणं ही बाब नैतिकतेच्या दृष्टीनं गर्हणीय असली, तरी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यासाठी तो गुन्हा नसतो. मात्र कोणत्याही माणसानं ‘पब्लिक सव्‍‌र्हन्ट’ला-सरकारी कर्मचाऱ्याला लाच देणं हा मात्र गुन्हा आहे. हा फक्त सरकारी नोकरांविरुद्धचा गुन्हा आहे. त्यात लोकसेवकही आले. मला नेहमी इतिहासाचं आश्चर्य वाटतं, की मूठभर इंग्रजांनी त्यांच्या देशापेक्षा कितीतरी पट मोठय़ा असलेल्या ‘इंडिया’वर, इथल्या समाजावर कसं बरं १५० वर्ष राज्य केलं. आजही मला त्यांच्यातला प्रामाणिकपणा अंतर्मुख करतो. असं काय वेगळं आहे त्यांच्यात आणि आपल्यात, की आपण इतके अप्रामाणिक आहोत, हा प्रश्न मला त्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखालच्या मुंबई न्यायालयात सतत छळत राहिला.  सुमारे अडीच वर्ष लाचलुचपतविरोधी न्यायालयात आणि एक वर्ष केंद्रीय गुन्हे अन्वेषण (‘सीबीआय’) कोर्टात मी न्यायाधीश म्हणून मुंबईला काम केलं. त्या कोर्टात बसल्यावर मला सर्वात आधी लक्षात आला तो लिंगभेद! त्या सगळय़ा काळात न्यायालयात फक्त मी आणि माझी जलजा ही शिरस्तेदार अशा दोघीच बायका असू. सगळे तपास अधिकारी, आरोपी, तक्रारदार, पंच, साक्षीदार हे सर्व पुरुष! एकही स्त्री फिर्यादी म्हणून माझ्यासमोर आली नाही. म्हणजे स्त्रियांना लाच देण्याचा प्रश्नच येत नाही का? आणि आला तरी फिर्याद करावी असं वाटतच नाही का? वाटलं तर तेवढं अंगात बळ नाही का? एकदाच एका स्त्री नगरसेविकेविरुद्ध खटला दाखल झाला होता. बाकी या कोर्टात स्त्रियांचा सहभाग शून्य. म्हणजे स्त्री सरकारी कर्मचारी, अधिकारी यांचं लाच खाण्याचं प्रमाण नाही का? असे अनेक प्रश्न आपल्यापुढे उपस्थित होतात. आपल्या समाजात कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती, कुटुंबाच्या गरजा, कमी पगार, आणि लाच यांची नेहमी सांगड घालून लाच घेण्याचं सरसकट समर्थन केलं जातं.

 वास्तविक सगळेच कर्मचारी पैसे खात नाहीत. प्रामाणिकपणे काम करणारे खूप आहेत, पण मूठभर गुंडांपुढे हातभर चांगले लोक  गप्प बसतात ना, तसंच. ही खरंतर आपल्या समाजानं बहुमतानं मान्य केलेली वस्तुस्थिती. त्या संदर्भातली माझ्या मनातली ही दोन कायम असलेली क्लिक्स-

 जळगावला इयत्ता चौथीत असताना माझी मैत्रीण मंदा लहान मुलांसाठीच्या तीन चाकांच्या स्कूटरवरून माझ्याकडे येत असे. एका पायानं रस्त्यावरून स्कूटर ढकलत चालवणारी मंदा मला मोठी ‘ग्लॅमरस’ वाटे! मी आपल्यालाही अशी स्कूटर मिळाली आहे आणि फ्रॉक-पॉनीटेलमधली मी अशीच रस्त्यावरून एका पायानं ढकलत वेगात ती स्कूटर चालवत जातेय, असं स्वप्न पाहात असे. मग मी हुशारीनं मंदाकडून त्या स्कूटरची किंमत काढली. ती होती ४० रुपये. मंदाचे बाबा पोलीस निरीक्षक होते. त्या तीनही भावंडांकडे वेगवेगळय़ा स्कूटर्स आणि आधुनिक खेळणी होती. माझा वाढदिवस ही मला काकांकडे (वडील) स्कूटर मागण्याची योग्य संधी वाटली, पण मागितल्यावर मिळाला चक्क नकार!  ‘‘फक्त चाळीस रुपये तर किंमत आहे. द्या ना घेऊन,’’ मी हट्ट केला.

‘‘हे पहा मृदुला, मला पगार मिळतो ५०० रुपये. त्यात भाडय़ाचे ८० रुपये जातात. ४२० रुपयांत आपल्या पाच जणांचा खर्च- शाळेची फी, कपडे सगळं भागवावं लागतं. त्यातही मी तुला स्कूटर दिली की नंदिनीलाही (बहीण) चाळीस रुपयांचंच काही घ्यावं लागेल. तेवढे ८० रुपये खर्च करणं मला शक्य नाही.’’ झालं! माझं स्वप्न पार तुटलं. काकांचा भयानक राग आला. ते पोलीस इन्स्पेक्टर का नाहीत? न्यायाधीश का झाले? याचं अतीव दु:ख मला तीन महिने पुरलं. ते थोडं कमी झालं, ते काकांनी आम्हा दोघींना मिळून ३५ रुपयांचा कॅरम आणल्यावर! यात काकांनी नकळतपणे शिकवलेलं अर्थकारण मात्र माझ्या मनात पक्कं रुजलं.

दुसरं क्लिक पंधराएक वर्षांपूर्वीचं. रमेशला (भाटकर) सकाळी शूटिंगला सोडून मी गाडीनं तशीच पुण्याला जाणार होते. रमेश उतरताना म्हणाला, ‘‘येतेस आत? लावणी नृत्यांगना सुरेखा पुणेकर आहेत आज शूटिंगला.’’ मला त्यांची लावणी आवडायची. कलाकाराला भेटणं केव्हाही आनंददायी, म्हणून आत गेले. सुरेखाबाई सकाळी बिर्याणीचा नाश्ता करत होत्या. रमेशनं ओळख करून दिली. मी त्यांचं कौतुक केलं आणि निघाले. रात्री घरी आल्यावर रमेश हसत हसत म्हणाला, ‘‘तू गेल्यावर सुरेखाबाई थोडय़ा वेळानं माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, ‘‘दादा, वहिनी जज्ज आहेत हे का नाही सांगितलं? बक्कळ पैसा कमावत असतील ना त्या!’’  सर्वसामान्यांच्या मनातही लाचविषयक गृहीतकं कशी ठाण मांडून बसलेली असतात ते लक्षात आलं.

दरमहा पगार मिळत असूनही लाच मागण्याच्या वृत्तीमुळे  काही सरकारी कर्मचाऱ्यांमुळे ते ते खातं बदनाम होतं. पैसा आणि प्रतिष्ठा या दोन वेगळय़ा गोष्टी आहेत. आज पैशानं प्रतिष्ठा विकत घेणारे बरेच आहेत, पण सिंहाचं कातडं घातलेल्या कोल्ह्यासारखी ती बेगडी आहे. माझी एक इच्छा मात्र आजवर कायमच अपूर्ण राहिली, की लाच घेणारा माणूस पैसे घेण्याच्या वेळी नेमका कसा दिसतो, काय भाव असतात त्याच्या चेहऱ्यावर, डोळय़ात, त्याचं ‘क्लिक’ काढायचं राहिलं!

तर त्या साडेतीन वर्षांत लाच घेण्याचे अनेक खटले चालले, पण लाच देण्याचा गुन्हा केला म्हणून माझ्यासमोर एकुलता एक खटला चालला. एका ‘एम.एस.ई.बी.’च्या अभियंत्यानं एका दुकानदाराविरुद्ध तक्रार केली होती. इलेक्ट्रिकचं त्याचं काम गैरमार्गानं करून देण्याबद्दल त्यानं पाच हजार रुपये लाच म्हणून देऊ केले. त्या वेळी त्या अभियंत्यानं लाचलुचपत विरोधी पथकाला बोलावून त्याच्यावर कारवाई करून त्याला रंगेहाथ पकडलं. तो खटला आरोपीविरुद्ध लाच दिली म्हणून चालवला गेला. ख्यातनाम वकील अधिक शिरोडकर यांनी आरोपीचं वकीलपत्र घेतलं होतं. त्यांनी त्या फिर्यादी अभियंत्याला तो कसा भांडकुदळ आहे, त्याची सोसायटीमध्ये, तसंच कामाच्या ठिकाणी किती जणांशी भांडाभांडी झाली आहे, असे प्रश्न विचारले. बहुतेक प्रश्नांची उत्तरं फिर्यादीनं ‘हो’ म्हणून दिली. अ‍ॅडव्होकेट शिरोडकरांनी मग त्या आधारे फिर्यादीचं वागणं कसं कांगावखोर आहे, त्याचा तक्रारी करण्याचा स्वभाव आहे म्हणून अविश्वासार्ह आहे, असा युक्तिवाद केला.  मी त्यांचा मुद्दा, ‘तो भांडतो,’ यावर पूर्ण सहमती दर्शवून, म्हणूनच तो ‘लाच दिली’ याखाली गुन्हा नोंदवू शकतो, हे मान्य करून तक्रारदाराची साक्ष पूर्णपणे ग्राह्य ठरवली. ‘लाच देणे’ या गुन्ह्याखाली एकुलत्या एक खटल्यात सहा महिन्यांची मी शिक्षा ठोठावली.

त्यानंतर एकदा माझ्याकडे १०० रुपये लाच स्वीकारली म्हणून उच्च न्यायालयातल्या एका कर्मचाऱ्याविरुद्धचा खटला आला. त्यात सर्व साक्षीपुरावे अगदी चपखल, गुन्हा सिद्ध करणारे होते. त्यामुळे गुन्हा तर सिद्ध झाला. त्या वेळेस आरोपीच्या वकिलांनी ही १०० रुपये लाच घेतल्याबद्दल जर या माणसाला दोषी ठरवून शिक्षा झाली तर त्याची नोकरी जाईल, तेव्हा सरकारी पक्षाची बाजू अमान्य करावी असाही युक्तिवाद केला. अशा काही वेळा येतात, तेव्हा खूप वाईट वाटत असलं तरी कठोरपणे निर्णय घ्यावाच लागतो.

कधी जिथे मुंगी शिरत नाही, तिथे हत्ती शिरतो. भरमसाठ कोटीच्या कोटी रुपयांची लाच घेणारे मोठे मासे तळय़ात राहतात आणि छोटे मासे जाळय़ात येतात. यासाठी आपण आपल्याला दोष द्यायला हवा. जेव्हा गप्पा मारताना सहज आपण म्हणतो, ‘आजकाल कोण पैसे खात नाही?’ जर तुम्ही खात नसाल, तर चटकन म्हणा, की ‘मी खात नाही आणि मी देत नाही.’ म्हणजे असे कितीतरी अपवाद सापडतील.

तर थोडक्यात आपण भांडतो का? का भांडत नाही? की भांडायला विसरलो आहोत? याचं परीक्षण ज्यानं त्यानं करावं. प्रत्येक दिल्या घेतल्या लाचेच्या कृत्यानं समाजात एक एक विषारी बीज आपणच पेरतो अन् वाऱ्याला मात्र जबाबदार ठरवतो..

chaturang@expressindia.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s