ठाणे महापालिकेची नवी नियमावली; उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
ठाणे महापालिकेची नवी नियमावली; उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
ठाणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई आहे. असे असले तरी ठाणे महापालिका क्षेत्रातील गृहसंकुलांच्या गच्चीवर खेळण्यासाठी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रहिवासी गर्दी करत असल्याची बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली असून ही गर्दी रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने गृहसंकुलांसाठी आता नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमांनुसार गृहसंकुलांच्या गच्चीवर, मोकळ्या जागेत आणि वाहनतळांच्या ठिकाणी रहिवाशांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असून या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास गृहसंकुलाचे अध्यक्ष आणि सचिवांवर महापालिकेतर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
करोना विषाणूचा फैलाव राज्यभर वाढत असून ठाणे शहरात रविवार सायंकाळपर्यंत २२६ जणांना करोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील विविध भागांत असणाऱ्या गृहसंकुलांमध्ये टाळेबंदीच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याने महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. शहरातील विविध गृहसंकुलांमध्ये रहिवाशीगच्चीवर खेळण्यासाठी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन होत असून करोना विषाणू संसर्ग पसरण्याचा धोका वाढला आहे. गृहसंकुलांमधील ही गर्दी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार गृहसंकुलांच्या गच्चीवर, मोकळ्या जागा, बगिचा तसेच वाहनतळाच्या ठिकाणी रहिवाशांना एकत्र जमण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. कोणत्याही सबळ कारणाशिवाय नागरिक गच्चीवर, तसेच मोकळ्या जागेत फिरणार नाही यासाठी गृहसंकुलांच्या नियमांमध्ये तरतूद करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने गृहसंकुलांच्या सचिव आणि अध्यक्षांना दिले आहेत.
गृहसंस्थेचे अध्यक्ष, सचिवांना सूचना
’ गृहसंकुलातील कोणताही रहिवासी मास्कशिवाय घराबाहेर पडणार नाही याकडे लक्ष देणे.
’ गृहसंकुलांच्या आवारातील नर्सिग होम, दवाखाने, औषधांची दुकाने यांबाबत आवश्यक ते सामाजिक अंतराचे नियम पाळून त्यांना कामकाज सुरू करण्यास परवानगी द्यावी.
’ गृहसंकुलातील एखाद्या रहिवाशाला करोनाची लागण झाल्यास त्याच्या कुटुंबाला असामाजिक वागणूक दिली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
’ नियमांची अंमलबजावणी गृहसंकुलांनी करायची असून रहिवाशांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास सर्वप्रथम दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
’ दुसऱ्यांदा या नियमांचे उल्लंघन त्या रहिवाशाने केल्यास सदर रहिवाशाविरोधात अध्यक्ष किंवा सचिवांनी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असेही महापालिका प्रशासनाकडून या आदेशात नमूद करण्यात आले आहे.