न्यूयॉर्कमध्ये वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट क्रूडचा मे डिलिव्हरीचा भाव उणे ४०.३२ डॉलर पर्यंत खाली आला. यापूर्वी १९४६ मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर खनिज तेलाच्या भावात इतकी मोठी घसरण झाली होती. तेलाच्या किमती शुन्याच्या खाली गेल्याने खनिज तेलावर अवलंबून असलेल्या बड्या अर्थव्यवस्था कोसळण्याचे संकट गडद बनले आहे.
मंगळवारी वेस्ट टेक्सास क्रूडचा भाव मंगळवारी उणे ३७.६३ डॉलर प्रती बॅरल इतका खाली कोसळला. याचा अर्थ खनिज तेलाची साठवणूक करणे जिकरीचे बनल्याने विक्रेत्यांनी खरेदीदारांना प्रती बॅरल ३७.६३ डॉलर दिले. करोना रोखण्यासाठी जवळपास निम्मे देशांत अघोषित टाळेबंदी आहे. अशा स्थितीत वाहतूक व्यवस्था, उद्योग धंदे ठप्प आहेत. परिणामी खनिज तेलाच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे.
खनिज तेल स्वस्त : २२ वर्षांतील नीचांकी स्तर
दरम्यान तेलाच्या किमतींनी प्रत्यक्षात तळ गाठल्याने खनिज तेल उत्पादक देशांची अक्षरश: गाळण उडाली आहे. तेलाच्या किमती शून्याखाली कशा गेल्या याबाबत तेल उत्पादक देशांची संघटना ओपेककडून माहिती घेण्यात येणार आहे. अमेरिकी बाजारपेठे खनिज तेलाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला आहे. त्यामुळे तेलाची साठवण करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.
भारतासाठी कसोटीचा काळ; स्पर्धकांनी आव्हान वाढवलं
सोमवारी, ब्रेंट क्रूडचा भाव १.६२ डॉलरने कमी होऊन तो २६.४६ डॉलर प्रती बॅरल झाला. तर मे महिन्यातील खनिज तेलाचे कॉन्ट्रॅक्ट ६.२२ डॉलरने घसरून ते १२.०५ डॉलर प्रती बॅरलपर्यंत खाली आले आहेत. दिवसभरात तेलाचा भाव ११.०४ डॉलर प्रती बॅरल इतका खाली घसरला होता. जाणकारांच्या मते गुंतवणूकदारांनी खनिज तेलाच्या कॉन्ट्रॅक्टची विक्री करून पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे तेलाच्या दरात घसरण होत आहे. पुढील महिना आणि दुसऱ्या महिन्यातील कॉन्ट्रॅक्ट यांच्यातील खनिज तेलाच्या किमतीतील तफावत पहिल्यांदाच १० डॉलरहून अधिक झाली आहे. जूनमधील कॉन्ट्रॅक्टचा दर प्रती बॅरल २.६३ डॉलरने कमी होऊन २२.४० डॉलर झाला आहे.