सत्तांधांविरुद्ध ‘सत्याग्रह’ | लोकसत्ता

हुमायून मुरसल

तुर्कस्तानी रॉक बँडमधील हेलिन बोलेक या लोकप्रिय गायिकेसह तिच्या सहकाऱ्यांना तेथील सरकारने ‘दहशतवादी’ ठरवले. या दडपशाहीविरुद्ध सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारून हेलिनने प्राण सोडले. या बलिदानाची चर्चा अन्य देशांतही होत राहिली आणि प्रश्न उरला : डावे सत्तांध जाऊन उजवे आले, इतकाच फरक जगात पडला का?

करोनापासून आपापला जीव वाचवण्यात सारेजण व्यग्र असताना, जगातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि दु:खद घटनेकडे दुर्लक्ष झाले आहे. ‘योरूम’ या रॉक संगीत बँडमध्ये गाणाऱ्या हेलिन बोलेक या निव्वळ २८ वर्षे वयाच्या तरुणीने २८८ दिवसांच्या अन्नत्याग सत्याग्रहानंतर, ४ एप्रिलच्या शनिवारी प्राण सोडले. दडपशाही राजवटीने, ‘स्टेट टेररिझम’ने हा बळी घेतला आहे. हे बलिदान दुर्लक्षित राहू देता येणार नाही. गांधींच्या देशाने याची दखल घेणे आवश्यक आहे. तुर्कस्तानच्या एदरेगन सरकारने ‘योरूम’ या रॉक बँडवर ‘अतिरेकी संघटना’ असल्याचा आरोप करून गेल्या वर्षी बंदी घातली. या बँडच्या रियाज केंद्रावर छापे घातले. त्यांनी कष्टाने विकसित केलेली पारंपरिक वाद्ये तोडून टाकली. ‘योरूम’शी संबंधित ३० जणांना कोठडीत डांबले. यापैकी ११ जण आजही तुरुंगात आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील या हल्ल्याचा निषेध म्हणून हेलिन बोलेक आणि बँडमधील गिटारिस्ट सहकारी इब्राहिम गोक्सेक, बारीस युक्सेल, बहर कर्ट, अली आरसी या पाच सहकाऱ्यांनी तुरुंगातच अन्न सत्याग्रह सुरू केला. संगीताच्या बँडवरील अन्यायकारक बंदी उठवावी, सहकाऱ्यांना सोडावे अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या. पण सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हेलिनला प्राण गमवावे लागले. ३० वर्षीय इब्राहिम गोक्सेकचा अन्न सत्याग्रह २९२ दिवस चालला. दोघांचे  वजन अत्यंत घटल्यामुळे न्यायालयाने त्यांना कोठडीतून बाहेर-  घरी नजरकैदेत-  ठेवण्याची परवानगी दिली होती.

‘योरूम’ हा पारंपरिक वाद्ये,  लोकसंगीत यांचा वापर करणारा रॉक बँड आहे. ‘योरूम’चा अर्थच ‘भाष्य’ किंवा ‘टिप्पणी’. तरुण मुलामुलींचा, डाव्या विचारांनी प्रेरित असलेला हा रॉक बँड एकाधिकारशाही, साम्राज्यवाद, भांडवलशाही आणि कष्टकऱ्यांच्या शोषणाविरोधात संगीताच्या माध्यमातून भाष्य करतो. हे संगीतपथक तुर्कस्तानच्या एका क्रांतिकारी सशस्त्र गटाचे सहानुभूतीदार आहे. ते आपल्या कार्यक्रमात क्रांतिकारी नेत्यांचे फोटो लावतात. शिवाय तुर्कस्तानात स्वायत्तता मागणाऱ्या अल्पसंख्य कुर्द गटाचे समर्थन करतात. मात्र हे सारे कलेच्या क्षमतेतून होत असते, म्हणूनच त्यांची गाणी तरुणाईत अत्यंत लोकप्रिय आहेत. एदरेगन यांच्या युरोप-अमेरिकेकडे झुकलेल्या जनविरोधी धोरणांना विरोध करणाऱ्या ‘योरूम’च्या गाण्यांकडे तुर्की तरुण मोठय़ा प्रमाणात आकर्षित होत होते. ‘योरूम’च्या कॉन्सर्टना हजारो तरुण उपस्थित राहात. इतर युरोपीय देशांतसुद्धा ‘योरूम’ला प्रचंड समर्थन मिळू लागले, आजही मिळते आहे. एदरेगन सरकारला हे सहन होणे कसे शक्य आहे? या बँडने आपली राजकीय भूमिका लपवून ठेवली नव्हती. बँडच्या विरोधात हिंसेत सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नव्हता. मात्र, कट्टर इस्लामी सरकारला त्यांचे विचार मानवणारे नव्हते.. हाच त्यांचा गुन्हा होता.

२०१६ ला एदरेगन यांच्या विरोधात लष्कराने अयशस्वी उठाव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर  सरकार कोणत्याही टीकेबाबत असहिष्णू झाले. विरोधकांना संपवण्याचाच प्रयत्न करू लागले. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर बंदी आली. सरकारने सुरू केलेल्या दडपशाहीचे ‘योरूम’ बळी ठरले. सरकारने योरूमला दहशतवादी संघटना घोषित केले. पाठोपाठ युरोपातील काही देश आणि अमेरिकेनेसुद्धा यांना अतिरेकी संघटना जाहीर केले. देशात आणि परदेशात यांच्या कॅन्सर्टना बंदी आली. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी अनेक अल्बम गायले, बनवले. एक चित्रपटसुद्धा बनवला.

सरकारविरुद्ध झालेल्या लष्करी उठावानंतर, एदरेगन सरकारने न्यायव्यवस्थेची ‘साफसफाई’ केली. या कारवाईत ४२५०हून अधिक न्यायाधीश आणि वकिलांची हकालपट्टी झाली, त्यापैकी दोन हजार जणांना कैद झाली. अशा परिस्थितीत ‘योरूम’ला न्याय मिळण्याची कोणतीच शक्यता नव्हती. तुरुंगात सडण्याशिवाय मार्ग नव्हता. त्यामुळे आपल्या हक्कासाठी प्राणांची बाजी लावून त्यानी तुरुंगात अन्न सत्याग्रहाचे अहिंसक आंदोलन सुरू केले. हा लढा दीर्घ करण्यासाठी त्यांनी केवळ द्रव पदार्थ घेतले. हेलिनच्या आईने केलेल्या वर्णनानुसार, अंतिम दिवसांत तिचे जीवन फार वेदनामय होते. पण निर्धार तितकाच पक्का होता. शरीर अत्यंत कृश आणि आवाज  क्षीण झाला असतानाही हेलिनने दिलेल्या मुलाखतीत आपल्या भूमिकेवर ती ठाम दिसते. हेलिनने पुन्हा गाणे म्हणावे ही आईची इच्छा मात्र अपूर्ण राहिली.

एकविसाव्या शतकात निदान लोकशाही मार्गाने निवडून येणारी सरकारे मानवी हक्कांची कदर करतील आणि  नागरिकांना मुक्तपणे अभिव्यक्तिस्वातंत्र्य उपभोगता येईल, असा विश्वास बाळगणे कठीण दिसते. डाव्यांच्या – कम्युनिस्ट राजवटींच्या- युगात मानवी हक्कांची पायमल्ली झाली,  हा इतिहास आहे. पण जगभरात आता उजव्या विचारांची एक लहर दिसते. अत्यंत अहंकारी नेत्यांची  मजबूत सरकारे अस्तित्वात आहेत. ‘राष्ट्रवाद’ शिखरावर आहे. जनता नेत्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवते आहे आणि सारी अधिकारशक्ती एका नेत्याच्या हाती केंद्रित होते आहे. त्याची इच्छा हाच कायदा आहे. कायदेसुद्धा या नेत्याला हवे तसे करण्यात येत आहेत. वेगळा आणि विरोधी विचार मांडणारे ‘देशाचे शत्रू’ असे मानून, या ‘देशद्रोह्यं’ना दडपून आणि प्रसंगी ठार मारून टाकण्यात येत आहे. भक्त जनता अशा दडपशाहीचेसुद्धा बेधुंदपणे स्वागतच करते आहे. विरोधी पक्ष आणि सनदशीर विरोधी आवाज जणू अस्तित्वात नाही अशी परिस्थिती आहे. कोणाला या वर्णनात भारतीय संदर्भ दिसले तर तो योगायोग मानावा. मी प्रिन्स सलमान, नेतान्याहू, पुतिन किंवा एदरेगन.. अशा जागतिक नेत्यांबद्दल बोलतो आहे.

आपल्या देशातील संदर्भ आहेत; पण ते निराळे. एल्गार परिषद आणि त्यानंतर झालेल्या भीमा कोरेगाव दंगलीच्या निमित्ताने ‘अर्बन नक्षली’ पकडण्यात आले. आता दंगल कुणी घडवली, सूट कोणाला मिळाली आणि अटका कोणाच्या झाल्या याची सगळ्यांना माहिती आहे. पण ‘कबीर कला मंच’ रडारवर आला. सुधा भारद्वाज, वरवारा राव, अरुण फरेरा, गौतम नवलखा, शोमा सेन, सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन हे तुरुंगामध्ये आहेत. आनंद तेलतुंबडे यांनाही ‘आत्मसमर्पण’ करण्यास भाग पाडले गेले. हे सारे दलित व कष्टकरी वर्गास केंद्रस्थानी ठेवून विचार करणारे, काही डाव्या विचारधारेला मानणारे. बरे आरोप काय?  तर ‘पंतप्रधान मोदींच्या हत्येचा आणि लोकशाही अस्थिर करण्याचा कट करणे’! आरोप अत्यंत गंभीर आहे. यूएपीए कायद्याखाली जवळपास दोन वर्षे अटकेत आहेत. अगदी सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळालेला नाही. आता न्यायपालिका काय निर्णय करेल याची वाट पाहण्याशिवाय इलाज नाही. या अटकांचा तपशील बाजूला ठेवला तरी, आपल्या देशात ‘राजद्रोहा’च्या कलमाखाली अटक होण्याचे प्रमाण वाढले आहे.  निरुपद्रवी भाषण, नेत्याची खिल्ली उडविणे, राजकीय कृती किंवा पुरोगामी पुस्तके बाळगली अशा कारणांखाली राजद्रोहाचे कलम लावून ‘देशद्रोहा’ची हाकाटी केली जाते, अशी उदाहरणे आहेत. वास्तविक सरकार किंवा देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, प्रत्यक्ष हिंसा घडणे किंवा तशी शक्यता दर्शवणारा पुरावा असणे हे कायद्याने आवश्यक आहे. पण दहशतवादाचा धोका दाखवून यूएपीए, एनआयए किंवा एनएसआयसारखे राक्षसी कायदे करण्यात आले आहेत. हे कायदे राज्ययंत्रणेला- सत्ताधाऱ्यांना मुक्त अधिकार देतात. न्यायालयात दोन-दोन वर्षे जामीन मिळत नाही.

वैचारिक शत्रूला नेस्तनाबूत करण्यात सत्ताधाऱ्यांना विलक्षण समाधान मिळते. त्यासाठी नेहमीच ‘देशाला धोका’ अशी ओरड केली जाते.. स्टालिनपासून एदरेगनपर्यंत!  सत्तांध होण्यात डावा- उजवा असा  फरक नसतो. शासन आणि धर्म दोघांना अंधभक्ती आणि एकाधिकार हवा आहे. माणसे याच संस्थांवर अत्यंत विश्वासाने विसंबून आहेत. अशा निराशाजनक परिस्थितीत हेलिन बोलेक आणि इब्राहिम गोक्सेकसारख्या वीरांचे बलिदान मानवी विवेक, बुद्धिवाद आणि संवेदनशीलतेला जागे करण्याचा प्रयत्न करते. कोरोना संकटात हिंदू-मुस्लीम करणाऱ्यांना हुकूमशाहीच्या संकटाचे भान नाही. या बलिदानाच्या निमित्ताने याचे भान येवो ही अपेक्षा!

लेखक कोल्हापूर येथील ‘सेंटर फॉर रेनेसाँ’ या संस्थेचे कार्यवाह आहेत. ईमेल : humayunmursal@gmail.com

via article on Turkish singer Helin Bolek abn 97 | सत्तांधांविरुद्ध ‘सत्याग्रह’ | Loksatta

Leave a Reply