देशात केंद्र सरकारकडून २५ मार्चपासून राबवण्यात येत असलेले २१ दिवसांचे लॉकडाऊन आज, मंगळवारी संपत आहे. या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था पार खिळखिळी झाली असून विश्लेषकांच्या मते, अर्थव्यवस्थेला सात ते आठ लाख कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
कोविड-१९ (करोना) विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च पासून २१ दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले होते, ज्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. या लॉकडाऊन काळात कारखाने व व्यवसाय बंद आहेत. रेल्वेसेवा, नागरी विमानसेवाही बंद आहेत. तसेच खासगी वाहनांच्या वाहतुकीवरही निर्बंध घातले गेले आहेत. या काळात ७० टक्के आर्थिक व्यवहार, गुंतवणुका, निर्यात बंद असून बाजारात वस्तूंच्या मागणीवरही परिणाम झाला आहे. केवळ कृषी, खाणकाम, ग्राहकोपयोगी सेवा, बँकांसारखे काही आर्थिक व्यवहार, आयटी सेवा आणि काही सरकारी सेवा यांचेच व्यवहार सुरू आहेत.
चुकीच्या वेळी लॉकडाऊन
देशाची अर्थव्यवस्था मंदीसदृश वातावरणातून बाहेर येऊ पहात असताना, तसेच आर्थिक वातावरण सकारात्मक होत असताना करोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. यामुळे लॉकडाऊन ही काळाची गरज असली तरी, मंदीतून बाहेर येऊ पाहणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी चुकीच्या वेळी लॉकडाऊन झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा २०२०-२१ साठी आर्थिक विकास कमी होणार आहे. या लॉकडाऊनमुळे दरदिवशी देशाचे ३५ हजार कोटींचे (४.६४ अब्ज डॉलर) नुकसान होत असल्याचा अंदाज अॅक्युआइट रेटिंग्जने वर्तवला आहे. आता २१ दिवसांनंतर जीडीपीचे ९८ अब्ज डॉलरने किंवा सुमारे ७.५ लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.
अनेक क्षेत्रांचे नुकसान
वाहतूक, हॉटेल, रेस्तराँ व बांधकाम या क्षेत्रांचे लॉकडाऊनमुळे अतोनात नुकसान झाले आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सरचिटणीस नवीन गुप्ता यांच्या मते, लॉकडाऊनच्या पहिल्या १५ दिवसांत ट्रकचालक-मालकांचे नुकसान ३५,२०० कोटी रुपये झाले असून दरदिवशी २,२०० रुपयांचा तोटा झाला आहे. देशात मालवाहतूक करणाऱ्या एक कोटी ट्रकपैकी ९० टक्के ट्रक या काळात रस्त्यांवर उतरलेले नाहीत. लॉकडाऊन संपल्यानंतर मालवाहतूक पूर्ववत होण्यासाठी पुढील दोन ते तीन महिने लागणार आहेत.
असा झाला तोटा –
– स्थावर मालमत्ता क्षेत्राचा एक लाख कोटींचा तोटा झाल्याचा राष्ट्रीय रिअल इस्टेट विकास परिषदेचा अंदाज
– रिटेल क्षेत्राचा ३० अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचा अखिल भारतीय व्यापारी महासंघाचा दावा
– जीडीपी २ ते ३ टक्क्यांमध्ये राहणार
– मालवाहतुकीचे दरदिवशी २,२०० रुपये नुकसान
via business news News: सात लाख कोटींचा फटका! – seven million crores hit! | Maharashtra Times