उद्योगांपुढे खरे आव्हान टाळेबंदीनंतरच! | लोकसत्ता

करोनामुळे ओढवलेल्या टाळेबंदीची टांगती तलवार नाहीशी होण्याबाबतची चर्चा सुरू झाली असतानाच उद्योगांना मात्र प्रत्यक्षात टाळेबंदीनंतर सुरळीत उद्योग व्यवस्था ठेवण्याचे आव्हान अधिक मोठे वाटत आहे. उत्पादन निर्मितीसह त्याच्या वितरणाबरोबरच आवश्यक अशा मनुष्यबळाची उपलब्धता तसेच सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्यविषयक सुविधा कायम राखण्याची चिंता भेडसावत आहे.

करोनाच्या वाढत्या प्रसारानंतर असलेल्या टाळेबंदीमुळे उद्योगाचे कंबरडे मोडले असून हा कालावधी अधिक वाढू नये अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. टाळेबंदीच्या कालावधीतील उद्योग क्षेत्राकडून केले जाणाऱ्या उपाययोजनांबरोबरच उद्योग क्षेत्र पूर्वपदावर आल्यानंतर उचलावयाच्या पावलांची तयारीही सुरू झाली आहे. ‘सीआयआय महाराष्ट्र’चे अरविंद गोयल यांनी याबाबत ‘लोकसत्ता’ला सांगितले की, करोना आणि टाळेबंदीचा निश्तिच परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर, उद्योगावर होत आहे. अनेक क्षेत्र यापूर्वीच संथ अर्थव्यवस्थेच्या गर्तेत अडकली होती. मात्र आता जवळपास सर्वच क्षेत्राच्या प्रगतीचे चाक रुतले आहे.

सीआयआय महाराष्ट्रच्या उपाययोजना :

* रुग्णालय तसेच वसाहतींमध्ये आरोग्यनिगा विषयक साहित्य पुरवठा

* सीआयआय फाऊंडेशनमार्फत गरजूंना वित्तीय सहकार्य

* मुंबई, ठाणे व पुणे परिसरात २२,१५० वैद्यकीय साहित्य वितरण

* बीडमधील ५,४५० कुटुंबियांना महिन्याभराचा अन्न पुरवठा

* मराठवाडय़ातील दोन जिल्ह्य़ांमध्ये अन्नधान्याचा पुरवठा

* नागपूरमधील ७५,००० झोपडीवासीयांना वस्तू पुरवठा

उद्योग समस्या निराकरणासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

उद्योगांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांच्या निराकरणासाठी महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

यामध्ये राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांचा समावेश आहे. उद्योजकांच्या सूचना व समस्या सोडवण्यासाठी हा गट राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याबरोबर कार्यरत राहणार आहे.

टाळेबंदी कालावधीत उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर मार्ग काढण्यासाठी देसाई यांच्याबरोबर ‘सीआयआय’ (कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज) च्या पुढाकाराने महाराष्ट्रातील निवडक उद्योजकांनी दृकश्राव्य माध्यमातून चर्चा केली.

‘सीआयआय’च्या वतीने आयोजित या चर्चासत्रात वेणुगोपाल रेड्डी, डॉ. हर्षदीप कांबळे तसेच डॉ. पी. अन्बलगन यांच्यासह उद्योग संघटनेच्या महाराष्ट्र विभागाचे संचालक अरविंद गोयल तसेच गोदरेज, एल अँड टी, केईसी पॉलीकॅब, सॅमी हेवी इंडस्ट्रीज, जॉन्सन कंट्रोल, स्कोडा, फोक्सवॅगन व महिंद्रा आदी नामांकित कंपन्यासह इतर कंपन्यांचे १७० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.

टाळेबंदी कालावधीत राज्य शासन उद्योजकांसोबत असल्याचे देसाई यांनी सांगितले.

उद्योगांच्या मागण्या :

– शेती अवजारे, कीटकनाशके, खते, कृषीपंपांचा पुरवठा करू देणे

– संरक्षण दलास लागणाऱ्या साधानांच्या उत्पादनासाठी परवानगी द्यावी

– निर्यातीचे व्यवहार सुरू करण्यास परवानगी मिळायला हवी

– माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रवासाला परवानगी द्यावी

via real challenge for the industry right after the lockdown abn 97 | उद्योगांपुढे खरे आव्हान टाळेबंदीनंतरच! | Loksatta

Leave a Reply