तुम्ही अशी नोकरी करण्यास तयार आहात की, जेथे तासनतास काम करावे लागेल, कोणतीही साप्ताहिक सुट्टी नसेल आणि पदोन्नतीची संधीही नसेल? कोणताही वीकेंड नाही की वेतनाचा दिवस निश्चित नाही…कारण, या कामाचे तुम्हाला कोणतेही वेतन दिले जाणार नाही…
आश्चर्यचकीत झालात ना…कारण, जगभरात प्रत्येकाची आई अशाचप्रकारे कोणतीही कटकट न करता कार्यरत असते. आईच्या प्रेमाची कोणतीही किंमत लावली जाऊ शकत नाही किंवा तिच्या कामाची अन्य कोणत्याही नोकरीशी तुलना केली जाऊ शकत नाही, याच्याशी आपण सहमत असालच…जरी आईचे वेतन निश्चित करायची वेळ आली तर, ते किती असेल यावर सहमती होणे कठीणच आहे…नुकत्याच मिस वर्ल्ड बनलेल्या मानुषी छिल्लरनेही सर्वाधिक वेतनाचा अधिकार आईलाच असल्याचे बाणेदार उत्तर दिले होते. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री कृष्णा तीरथ यांनी गृहिणींचे काम नोकरी मानली जाऊन पतींनी त्यांचे वेतन द्यावे, असा प्रस्ताव मांडला होता. त्यांनी २०१२मध्ये मांडलेला हा प्रस्ताव काळाच्या ओघात गायब झाला. मात्र, मानुषीच्या उत्तरामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने केलेल्या अभ्यासाअंती शहरात राहणाऱ्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलेला दरमहा ४५,००० रुपये वेतन मिळाले पाहिजे.