पण गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संस्थापक नारायणमूर्तींनी काही मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली. मंत्री जयंत सिन्हा ह्यांची पत्नी पुनिताकुमार ह्यांना संचालक केल्यावर, आम्ही आजवर एकाही राजकारणी कुटुंबातील व्यक्तीला संचालक म्हणून आणले नव्हते, मग ह्या तत्त्वाला का मुरड घातली, अशी नाराजी व्यक्त होऊ लागली. इन्फोसिसच्य तत्त्वाप्रमाणे कंपनीतल्या मध्यमान पगारापेक्षा प्रमुखाचा पगार हा ५० पटीपेक्षा जास्त असू शकत नव्हता (अर्थात ह्यात स्टॉक ऑप्शनचे मूल्यांकन धरले जात नव्हते). पण विशाल अमेरिकेत राहात असल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे रुपयांच्या मोजदादीत हा पगार ५० पटीपेक्षा जास्त गेला. नंदन नीलेकणी यांनी ह्या ठरावाच्या बाजूने मतदान केले पण मूर्तींना हे मान्य नव्हते. दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारीत इन्फोसिसने १३०० कोटींना एक इस्रायली कंपनी विकत घेतली. ह्या व्यवहारात सॅप कंपनीतील काही अधिकारी संबंधित होते व ह्या खरेदीत काही अपारदर्शी व्यवहार झाले, अशा संशयाचे निनावी पत्र कंपनीच्या संचालकांना मिळाले. त्यातच ऑक्टोबर २०१५ला राजीव बन्सल हा कंपनीचा मुख्य आर्थिक अधिकारी बाहेर पडला. कंपनी सोडताना त्याला मिळालेला मोबदला खूप जास्त आहे, अशी टीका मूर्तींनी पुन्हा केली. यंदा जानेवारीत कंपनीच्या मुख्य कायदा अधिकारी डेव्हिड केनडी बाहेर पडला व त्याच्या मोबदल्यावरूनही असाच वाद झाला.
ह्या मुद्द्यांवरून संचालकांना निनावी पत्रे पाठवून व काही दिवसांत मूर्तींनी जाहीर आरोप करीत भंडावून सोडले. कंपनी संचालकांनी ह्या मुद्द्यांची नोंद घेत बन्सलबाबत आमची चूक झाली असेल व ती आम्ही सुधारू असे जाहीर कबूल केले. पण बन्सलला कंपनींच्या अपारदर्शक व्यवहारांची माहिती असावी व त्याने वाच्यता करू नये म्हणूनच एवढा मोबदला दिला, असा खोडसाळ समज बाजारात पसरवण्यात आला. कंपनीने अशा अफवांचा इन्कार केला. पुनित सिन्हा ह्यांची नेमणूक त्यांच्या कर्तृत्वामुळे झाली असून त्या जयंत किंवा यशवंत सिन्हा ह्यांच्या नात्यात आहेत म्हणून केली नाही असा खुलासा कंपनीने करूनही, परंपरा तोडल्याचा आरोप कंपनी अध्यक्षांवर वारंवार झाला.
पनया ह्या कंपनीच्या खरेदीत सिक्कांनी प्रथम अपारदर्शी व्यवहार न झाल्याचा खुलासा केला. पण त्यानंतर बन्सल प्रकरणामुळे व तो आरोप वारंवार झाल्यामुळे कंपनीने चौकशी केली. सेबीकडे गेलेल्या तक्रारीप्रमाणे ह्या व्यवहारात कंपनीने २५ टक्के जास्त पैसे मोजले व त्याचा फायदा काही संबंधित व्यक्तींना झाला. ह्यावेळी हाच आरोप मूर्तीही करू लागले. राजीव बन्सलला १७-१८ कोटी रुपयांचे आमिष देऊन गप्प बसवून दूर केल्याचा आरोपही होताच. परंतु संचालक मंडळाने खुलासा केला की पनयाचा व्यवहार हा संचालकांनी सर्व बाबी तपासून झाला आणि तो फायद्याचा आहे. एवढे होऊनही मूर्तींचे जाहीर आरोप थांबेनात! शेवटी मंडळाने एका अमेरिकन कायदा कंपनी व एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून कोट्यावधी रुपये खर्च करत, ह्या व्यवहाराची परत संपूर्ण तपासणी करून घेतली. चौकशीचा गोषवारा प्रसिद्ध केला. तरीही आम्ही कंपनी चालवत असतो तर हा संपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला असता असा शेरा मारत मूर्तींनी टीकास्त्र सोडले व सिक्का हे मुख्य कार्यकारी पदाला लायक नसल्याची झोंबरी टीका केली. ह्या सगळ्याला कंटाळून शेवटी विशाल सिक्कांनी राजीनामा दिला.
ह्यात कोण चूक वा कोण बरोबर असे पाहणे योग्य नाही. पण हे सर्व औचित्याला धरून झाले नाही. कंपनीची कमावलेली जागतिक प्रतिमा संस्थापकांनीच मलिन करावी ह्याची खंत वाटते. इन्फोसिसबरोबर टाटा प्रकरणामुळे भारतीय उद्योगाच्या जागतिक प्रतिमेला धक्का बसला आहे. आज चिनी व भारतीय उद्योगांची तुलना करताना भारतीय कंपन्यांची प्रामाणिकता, कायद्याची चाड वगैरे गोष्टी जमेच्या ठरतात. पण आता या जागतिक प्रतिमेला तडा गेला आहे. गेल्या काही दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी ज्या तऱ्हेने इन्फोसिस शेअरची विक्री केली व कंपनीचे भांडवली मूल्य एका दिवसात २२,५०० कोटी रुपयांनी खाली गेले, ह्यावरून हे समजते. खासकरून इन्फोसिसचे ग्राहक अमेरिकेत आहेत. ह्या घसरणीचा परिणाम धंद्यावर होईलच.
‘इदं न मम’ असे म्हणून कंपनी सोडण्याचे धाडस जेआरडींसारख्या थोड्याच व्यक्तींकडे असते. मी गेलो तरी माझे ऐका, हा मूर्तींचा अट्टहास किंवा अहंकार असेल तर तो घातक असेल. एवढी वर्षे इन्फोसिस एका विशिष्ट विचारसरणीने चालवली गेली. पण जेव्हा तुम्ही जागतिक प्रतिमा असलेला, अमेरिकन विचारसरणीचा माणूस प्रमुख म्हणून निवडता तेव्हा त्याची कामाची पद्धत व विचारसरणी वेगळी असणारच. मग परंपरेचा अट्टहास का?
कंपनीचे सर्व प्रवर्तक मिळून जर १५ टक्के भांडवल तुमच्याकडे आहे तर त्यापैकी एकाचेच कंपनीने का ऐकावे? इतर ८५ टक्के भागभांडवलदारांशीही त्यांचे दायित्व व जबाबदारी आहे. नशिबाने संचालक मंडळ विशाल सिक्का यांच्या पाठीशी एकमताने आहे व आपले ते ऐकत नाही, हे मूर्तींचे दुःख आहे. वारंवार तेच तेच आरोप झाल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले. यात कंपनीचेच नाही तसं पूर्ण भारतीय उद्योगाचे नुकसान होत आहे. पण आज अमेरिकेत एक्शन क्लास सूटच्या छायेत उभ्या असलेल्या कंपनीचे सिक्का यांचा राजीनामा आणि शेअर पुर्नखरेदीचे टायमिंग मात्र नक्कीच चुकले आहे.
..
(लेखक ज्येष्ठ उद्योजक व अर्थतज्ज्ञ आहेत.)
..
दीपक घैसास
via infosys controvery and indian image – article in Marathi, Maharashtra Times