कांदा या पिकावरून गेल्या पंचवीस-तीस वर्षांत सर्वच सरकारांनी हात पोळून घेतले आहेत. दुर्दैवाने, त्यातून कोणीही शहाणपण शिकले नाही. कांदा उत्पादन, साठवणुकीची सुविधा, दर व आयात-निर्यातीतला सरकारी धोरणातील धरसोडपणा हा या विषयाच्या मूळाशी आहे. या प्रश्नावर आजवरची सरकारे केवळ तात्कालिक उपायांवर समाधान मानत आली. ‘जखम मांडीला अन् मलम शेंडी’ला हा उफराटा न्याय जवळपास प्रत्येक निर्णयाप्रसंगी झाला. त्यावरून वारंवार धक्के खाऊनही सरकारी बाबू व धोरणकर्ते नेते यांच्यात सुधारणा होत नाही, हे संतापजनक आहे. ताजा विषय तर आणखी गुंता वाढविणारा आहे. यंदा विशेषत: महाराष्ट्रात पावसाच्या लहरीपणाचा फटका सर्वच पिकांना बसला असला तरी तो कांद्याला अंमळ अधिक बसला. चाळी वा गोदामात साठवलेला माल पावसाने लवकर खराब झाला. आणि या मोसमातील येऊ घातलेल्या कांद्यालाही त्यामुळे उशीर होतो आहे. निर्यातबंदीपूर्वी सरकारने आयातीचा निर्णय घेतला, त्यातही पाकचे नाव टाकून हाततोंड पोळून घेतले. आता पाक वगळून अफगाणी, इजिप्शियन कांदा येईल; पण तोदेखील ऑक्टोबरच्या अखेरीस. त्यानंतर लागलीच उशिराचा देशी कांदाही बाजारात येईल. म्हणजे आता कांदा आयात केला तरी बाजारातील दर किमान महिनाभर तरी त्रास देणारच आहेत. हातात फारसा व निर्यातक्षम कांदा नसताना निर्यातबंदीचा निर्णय घेऊन सरकारने नेमके काय साधले, हा प्रश्नच आहे. आता तर निर्यातबंदीने शेतकरी नाराज आणि दर परवडत नसल्याने शहरी मतदारही कावलेला, अशा कात्रीत सरकार सापडले आहे. मनमोहनसिंह यांच्यावर धोरण लकव्याबाबत आरोप करणारे भाजपचे नेते आता मात्र स्वपक्षाच्या धोरणहीनतेविषयी चकार शब्द बोलायला तयार नाहीत. एका साध्या पिकाबद्दल महिनाभरात धोरणांची एवढी अदलाबदल करणारे हे पहिलेच सरकार असावे. कोणत्याही प्रश्नाच्या गाभ्याशी न जाता वरवर मलमपट्टी करण्याची अशी वाढती मानसिकता अनेक नव्या प्रश्नांना जन्म देणारी ठरते आहे. या धोरणशून्यतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय पिकांची पतही आपण घालवून बसलो आहोत. ज्या पाकिस्तानच्या नावाने उठताबसता बोटे मोडली जातात, त्याच पाकिस्ताने अलीकडच्या काळात कांद्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ हिरावली आहे. बाजारपेठा या ग्राहकांच्या संवेदनशीलतेवर चालतात, हे खरे असले तरी धोरणकर्त्या सरकारने मात्र या संवेदनशीलतेचा अतिरेक करायचा नसतो हे सरकारांना कधी कळणार? याबाबत केवळ भाजपचे सरकार दोषी आहे असे नाही तर आजपर्यंतच्या सर्वच सरकारांनी, अगदी ‘जाणते राजे’ कृषिमंत्री असतानाही या प्रश्नावर रामबाण उपाय शोधता आलेला नाही. तो शोधण्याला अर्थातच दुसरा काही पर्याय नाही, हे निदान आता तरी कळावे.