Society Rules : छोटं शहर असो किंवा मोठं महानगर असो… कुठेही घर खरेदी करणे प्रत्येकाच्या आयुष्यातील मोठा निर्णय असतो, ज्यासाठी सर्वसामान्य लोक आपल्या आयुष्यभराची बचत पणाला लावतात. बऱ्याचवेळी लोकांना पैसा खर्च करूनही घरातील काही गोष्टी, जसे की बाल्कनी, आवडत नाही आणि त्यात बदल करण्याची मागणी करतात. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की सोसायटी फ्लॅटमधील बाल्कनीची बनावट आवडली नाही तर, आवडीनुसार त्यात बदल करता येतात का?
अशा परिस्थितीत, लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या बाल्कनीची रचना आवडत नसेल, तर सोसायटीचे नियम तपासल्याशिवाय आणि आवश्यक परवानग्या घेतल्याशिवाय तुम्ही त्यात कोणताही बदल करू नका.
घरातील बदल करण्यासाठी आवश्यक परवानगी घ्या

आपल्याला सोसायटीत फ्लॅट किंवा अपार्टमेंट खरेदी करून मालकी मिळते, पण प्रत्येक गोष्टीत मनमानी बदल करू शकत नाही. घराच्या बाल्कनीत बदल करणे सोपं नसते कारण, त्या बदलांचा परिणाम इमारतीची डिझाइन, सिक्युरिटी, रचना किंवा मंजूर डिझाईनवर होऊ शकतो.
तुम्हाला बाल्कनीमध्ये कोणते बदल करायचे आहेत, जागा तुमच्या वापरासाठी आहे की नाही आणि सोसायटीचे नियम काय सांगतात या गोष्टींवरही बदल करणे अवलंबून असते. तसेच नगरपालिकेने मंजूर बांधकाम आराखडा आणि स्थानिक प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करणे देखील महत्त्वाचे आहे, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता.
तुम्ही तुमच्या घरच्या बाल्कनीत बदल करू शकता का?

घरमालक आपल्या घराच्या बाल्कनीत किरकोळ बदल करू शकतो पण, मोठ्या किंवा बाह्य बदलांसाठी सोसायटी किंवा स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेणे अनिवार्य असू शकते. छोट-छोट्या बदलांमध्ये फरशी बदलणे किंवा थोडी सजावट करण्यासारखी कामे करू शकता. पण भिंत काढणे, बाल्कनीचा विस्तार करणे, पूर्णपणे झाकणे किंवा इमारतीच्या बाह्य स्वरूपात बदल करणे यांसारख्या मोठ्या बदलांसाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागू शकते.
फक्त बाल्कनीचे सौंदर्य वाढवायचे असेल तर?

कधीकधी खरेदीदारांना बाल्कनीचे सौंदर्य वाढवण्यासाठी काही बदल करायचे असतात, पण सजावट आणि बदल यांमधील फरक समजून घेतले पाहिजे. तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये फर्निचर, एखादी झाडे किंवा रोपटे किंवा इतर तात्पुरत्या वस्तू ठेवायच्या असतील आणि त्यामुळे इमारतीच्या डिझाइन किंवा बाह्य स्वरूपावर परिणाम होत नसल्यास असे बदल मान्य केले जाऊ शकतात.
मात्र, तुम्हाला काच लावायची असेल, कठडा बदलायचा असेल, बाल्कनीला पॅराफीट घालायचे असेल, भिंत काढायची असेल किंवा बाल्कनीचा विस्तार करायचा असेल, तर आधी नियमांची माहिती घेतली पाहिजे.
बाल्कनी झाकू किंवा बंद करता येते का?

हा प्रश्न बहुतेक घरमालकांना पडतो. बाल्कनी तुमच्या फ्लॅटला जोडलेली आहे म्हणून तुम्ही मर्जीने खोलीत बदलू शकत नाही. बाल्कनी झाकल्याने किंवा बंद केल्याने फ्लॅटचे क्षेत्रफळ, हवा खेळती राहण्याची सोय, इमारतीचे स्वरूप आणि मंजूर नकाशावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, अशा कामासाठी परवानगी घेणे गरजेचे आहे. तसेच कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी, सोसायटी किंवा प्राधिकरणाकडून लेखी परवानगी मिळवा.
बाल्कनीची भिंत किंवा रेलिंग काढता येते का?

हे फरशी बदलणे किंवा फर्निचर हलवण्यापेक्षा अधिक गंभीर असू शकते. बाल्कनीच्या भिंती, रेलिंग, पॅरापेट किंवा इतर घटक इमारतीच्या सुरक्षितता आणि स्ट्रक्चरसाठी महत्त्वपूर्ण असू शकतात. त्यामुळे योग्य तपासणीशिवाय भिंत काढू नका किंवा छिद्र पाडू नका. यामुळे कायदेशीर समस्या आणि सुरक्षेच्या चिंता निर्माण होऊ शकतात.
RERA अंतर्गत भिंत, कॉलम, बीम, फरशी किंवा इतर संरचनात्मक घटक काढणे किंवा कापणे सामान्य अंतर्गत बदल मानले जात नाही. अशा कामासाठी नियमांचे पालन आणि आवश्यक परवानग्या घ्यायच्या असतात. त्यामुळे, तुम्हाला बाल्कनीची रचना आवडत नसेल, तर कॉन्ट्रॅक्टरकडून भिंत किंवा स्ट्रक्चर बदल करून घेऊ नका.
सोसायटी बाल्कनीतील कामांवर आक्षेप घेऊ शकते का?

हो, बदलांमुळे इमारतीचे बाह्य स्वरूप, रचना, सुरक्षितता किंवा इतरांच्या हक्कांवर परिणाम होत असल्यास सोसायटीला आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. इमारतीचे कॉमन एरिया आणि सुविधांच्या देखभालीची जबाबदारी सोसायटी किंवा RWA ची असते. यासाठी, सोसायटी स्वतःचे नियम आणि उपविधी बनवू शकते. म्हणजे फक्त फ्लॅटची मालकी आहे म्हणून तुम्हाला इमारतीच्या बाह्य स्वरूपात मनमानी बदल करण्याचा अधिकार मिळत नाही. त्यामुळे बाल्कनीमध्ये कोणतेही कायमस्वरूपी बदल करण्यापूर्वी सोसायटी तुमच्याकडून अर्ज, आराखडा किंवा आवश्यक कागदपत्रे मागू शकते.

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे. मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला. पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव 2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या. 2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले. शैक्षणिक पात्रताप्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा