प्रवीण देशपांडे
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. यामध्ये सर्वात खर्चिक, जिव्हाळ्याची गरज म्हणजे निवारा. स्वतःचे घर असणे हे आपल्या मनातील सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक आहे. महानगरात घराच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत, त्यामुळे आपल्या आयुष्यातील कमाईचा मोठा हिस्सा घर मिळविण्यासाठी खर्च होतो. स्वतःच्या घराचे अनेक फायदे आहेत, दरमहा द्यावयाच्या भाड्यापासून सुटका होते, दीर्घमुदतीत घराच्या किमतीत वाढ होऊन संपत्तीत वाढ होते, घर ही एक मौल्यवान मालमत्ता असल्यामुळे तिचा वापर व्यवसाय, शिक्षण किंवा आपत्कालीन परिस्थितींसाठी कर्ज मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो. एक घर विकून दुसरे मोठे घर घेणे, एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा देशात स्थलांतरित होणे, आर्थिक समस्या, कौटुंबिक कलह, इत्यादी कारणामुळे करदात्याला आपले घर विकावे लागू शकते.
घराच्या विक्रीवर भांडवली नफा आणि कर आकारणी:
घर एक भांडवली संपत्ती असल्यामुळे त्याच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा हा करपात्र असतो. घराच्या धारणकाळानुसार ही संपत्ती अल्पमुदतीची आहे का दीर्घमुदतीची हे ठरते. घर खरेदी केल्याच्या तारखेपासून २४ महिन्यांच्या आत विकले तर ते अल्पमुदतीचे असते आणि त्याच्या विक्रीवर होणारा नफा किंवा तोटा अल्पमुदतीचा असतो. घर खरेदी केल्याच्या तारखेपासून २४ महिन्यानंतर विकले तर ते दीर्घमुदतीचे असते आणि त्याच्या विक्रीवर होणारा नफा किंवा तोटा दीर्घमुदतीचा असतो. असा भांडवली नफा गणतांना आणि त्यावरील कर भरतांना खालील मुद्दे विचारात घेतले पाहिजेत;
STORIES YOU MAY LIKE
- १. घर १ एप्रिल, २००१ पूर्वी खरेदी केले असल्यास १ एप्रिल, २००१ चे बाजारभाव मूल्य ही खरेदी किंमत समजली जाते, परंतु हे मूल्य मुद्रांक शुल्कानुसार असलेल्या मूल्यापेक्षा (जिथे उपलब्ध असेल तिथे) जास्त नसले पाहिजे. हाच नियम करदात्याला संपत्ती वारसाहक्काने, वगैरे मिळाली असेल तर त्याचे खरेदी मूल्य गणतांना लागू होतो आणि त्याचा धारणकाळ सुद्धा मूळ मालकाने घर खरेदी केलेल्या तारखेनुसार ठरतो,
- २. वैयक्तिक किंवा हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) यांनी घर विकले आणि ते २३ जुलै, २०२४ पूर्वी खरेदी केली असेल, तर ते भांडवली नफा गणतांना इंडेक्सेशनचा फायदा घेऊन खरेदी किंमत विचारात घेऊ शकतात. ही तरतूद अनिवासी भारतीय करदात्यांना लागू नाही.
- ३. सुधारणेचा खर्च (मोठ्या स्वरूपाचे संरचनात्मक नूतनीकरण) हा सुद्धा खरेदी किमतीत जोडला जातो,
- ४. घराची विक्री करतांना झालेला खर्च जसे दलाली, कायदेशीर खर्च याची वजावट करदाता भांडवली नफा गणतांना घेऊ शकतो.
- ५. अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावर करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो,
- ६. दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर १२.५ टक्के इतका कर भरावा लागतो. इंडेक्सेशनचा फायदा घेऊन गणलेल्या भांडवली नफ्यावर (करदात्याला फायदेशीर असल्यास), त्यावर २० टक्के कर भरू शकतात. कर भरतांना त्यावर अधिभार (लागू असल्यास) आणि ४ टक्के आरोग्य आणि शैक्षणिक कर भरावा.
- ७. तोटा झाल्यास तो इतर भांडवली नफ्यातून वजा करता येतो किंवा पुढील वर्षात कॅरी-फॉरवर्ड करता येतो.
घराच्या विक्रीवर कर कसा वाचवावा :
प्राप्तिकर कायद्यात भांडवली नफ्यावरील भराव्या लागणाऱ्या करासाठी काही सवलती दिलेल्या आहेत. अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावरील करबचतीसाठी गुंतवणुकीचे पर्याय नाहीत. दीर्घमुदतीच्या संपत्तीच्या भांडवली नफ्यावरील करबचतीसाठी घर, रोखे (बॉण्ड), वगैरेमध्ये गुंतवणुकीचे पर्याय आहेत. हे पर्याय निवडल्यास करदात्याचे करदायित्व कमी करता येते किंवा संपूर्ण वाचविता येते. यासाठी करदात्याला अटींची पूर्तता करावी लागते.
कलम ८२ नुसार घरात गुंतवणूक :
एक घर (मूळ संपत्ती) विकून नवीन घरात गुंतवणूक केल्यास प्राप्तिकर कायदा, २०२५ कलम ८२ नुसार वजावट घेता येते. घर विकून झालेला भांडवली नफा करपात्र आहे, या कलमानुसार दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्याएवढी रक्कम नवीन घरात गुंतविल्यास त्यावर संपूर्ण वजावट मिळून कर भरावा लागत नाही. भांडवली नफ्यापेक्षा कमी गुंतवणूक नवीन घरात केल्यास नवीन घरातील गुंतवणुकीएवढीच वजावट मिळून बाकी रक्कम करपात्र असते. या कलमानुसार वजावट घेतांना खलील अटींची पूर्तता करावी लागते.
- १. ही गुंतवणूक मूळ संपत्ती विक्री केल्या तारखेपूर्वी एका वर्षाच्या आत किंवा विक्री केल्या तारखेपासून २ वर्षात (खरेदी केल्यास) किंवा ३ वर्षात (बांधल्यास) करणे बंधनकारक आहे.
- २. या कलमानुसार मिळणारी सवलत फक्त वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) करदात्यांनाच मिळते.
- ३. ज्या आर्थिक वर्षात मूळ संपत्ती विकली त्या वर्षीचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी नवीन घरात गुंतवणूक न केल्यास, भांडवली नफ्याएवढी रक्कम भांडवली कर नफा अर्थात कॅपिटल गेन स्कीमच्याअंतर्गत बँकेत जमा करावी लागते. या खात्यात पैसे मुदतीत जमा न केल्यास वजावट मिळत नाही. या खात्यातील पैसे नवीन घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठीच वापरता येतात. करदाता मुदतीत घर विकत घेऊ शकला नाही किंवा बांधू शकला नाही तर तीन वर्षानंतर ती रक्कम करपात्र उत्पन्नात गणली जाते.
- ४. या कलमानुसार फक्त एकाच नवीन घरात आणि भारतातच गुंतवणूक करता येते. याला एक अपवाद आहे, मूळ संपत्तीच्या विक्रीवरचा भांडवली नफा जर २ कोटी रुपयांपेक्षा कमी असेल तर करदात्याने एकाऐवजी दोन घरात गुंतवणूक केल्यास ती ग्राह्य धरली जाते. ही सवलत करदात्याने एकदा घेतल्यास पुन्हा त्याच्या जीवनकाळात परत घेता येत नाही.
- ५. या कलमानुसार खरेदी केलेले किंवा बांधलेले नवीन घर तीन वर्षात न विकण्याची अट आहे. काही कारणाने हे नवीन घर खरेदी केल्यापासून किंवा बांधल्यापासून तीन वर्षांच्या आत विकल्यास पूर्वी (मूळ संपत्ती विकतांना) घेतलेली वजावट रद्द होते. नवीन घराच्या विक्रीवरील भांडवली नफा गणतांना पूर्वी घेतलेली भांडवली नफ्याची वजावट (मूळ संपत्तीच्या विक्रीवर) खरेदी किमतीतून वजा होते आणि त्यानुसार गणलेल्या दीर्घ किंवा अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागतो. आर्थिक नियोजन करतांना या तरतुदीचा विचार न केल्यास जास्त कर भरावा लागू शकतो.
- ६. या कलमानुसार मिळणारी सवलत फक्त घर किंवा त्याला सलग्न जमीन विक्रीच्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यासाठी आहे. नुसती जमीन किंवा प्लॉट, दुकान किंवा व्यावसायिक जागेच्या विक्रीतून झालेल्या भांडवली नफ्यासाठी नाही.
- ७. या कलमानुसार कमाल १० कोटी रुपयांपर्यंतचीच वजावट मिळते.
कलम ८५ नुसार रोख्यांमध्ये गुंतवणूक :
ज्या करदात्यांनी जमीन किंवा इमारतीची (मूळ संपत्ती) विक्री केली आहे, अशांनी प्राप्तिकर कायदा, २०२५ मधील कलम ८५ नुसार ठराविक रोख्यांमध्ये गुंतवणूक करून त्याची वजावट घेतल्यास कर वाचू शकतो. ही वजावट सुद्धा दीर्घमुदतीच्या भांडवली संपत्तीसाठी आहे. या कलमानुसार मूळ संपत्तीची विक्री केल्याच्या तारखेपासून ६ महिन्यात ठराविक रोख्यांमध्ये दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्याची गुंतवणूक केल्यास त्याची वजावट घेता येते. या ठराविक रोख्यांमध्ये गुंतवणुकीला ५० लाख रुपये इतकी मर्यादा आहे. ही रोख्यांमधील गुंतवणूक ५ वर्षांसाठी आहे. या ५ वर्षांच्या काळात ही गुंतवणूक रोख रकमेत परावर्तित केल्यास, ज्यावर्षी ती रोख रकमेत परावर्तित केली त्या वर्षीचा भांडवली नफा म्हणून ती करपात्र होईल. या रोख्यांवर दरवर्षी ५.२५ टक्के दराने व्याज मिळते. हे व्याज करपात्र आहे. या कलमांतर्गत रुरल इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन, हुडको, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, इंडिअन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या संस्थांनी रोखे जारी केले आहेत.
First published on: 07-09-2026 at 13:37 IST | © IE Online Media Services (P) Ltd
Web Title: House sale capital gains tax saving guide marathi aam