महंगाई मार गयी! अग्रलेख -महाराष्ट्र टाइम्स –१५.०९.२०१७

देशात महागाईने गेल्या चार महिन्यांतील उच्चांक गाठल्याने इंधन दरवाढीच्या चटक्यातून वाचू पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आता खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी संघर्ष करावा लागत आहे. केंद्र सरकारने ग्राहकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील नीचांकी दरांचा लाभ न देता देशातील पेट्रोलचे भाव चढेच ठेवले आणि त्यात सतत वाढ करण्याचे धोरण ठेवले. त्यात एका बाजूला जनता होरपळत राहिली आणि दुसरीकडे कांदा, भाजीपाला आदींच्या उपलब्धतेवर परिणाम होऊन त्याचे दरही चढत राहिले. त्यामुळे जनता दोन्हीकडून चटके सोसत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढणे म्हणजे गाडी बाळगणाऱ्या श्रीमंत व मध्यमवर्गीयांनाच फटका बसतो, हा समज कधीच दूर झाला आहे आणि त्याचे विपरीत परिणाम खाद्यपदार्थांसारख्या जीवनावश्यक वस्तूंवर सर्वप्रथम व सर्वाधिक होतो. त्यात गरीबच अधिक भरडले जातात हे उघड दिसत आहे. केंद्रीय व्यापार खात्याने जाहीर केलेल्या माहितीनुसार, कांद्यासह अन्य भाजीपाला आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने ऑगस्टमध्ये घाऊक महागाई दर ३.२४ टक्के असा गेल्या चार महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. यापूर्वी, घाऊक महागाई दर जुलै मध्ये १.८८ टक्क्यांवर तर, २०१६च्या ऑगस्टमध्ये १.०९ टक्के होता. यंदा ऑगस्ट महिन्यात ही वाढ होण्याचे कारण भाज्यांच्या किमती जवळपास ५० टक्क्यांनी वाढल्या. याच दरम्यान कांद्याच्या किमती तर तब्बल ८८.४६ टक्के इतक्या वाढल्या. ऑगस्टमध्ये इंधन आणि विजेच्या दरांमध्ये जवळपास दहा टक्क्यांची वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याचे सांगत आधीच्या चढ्या भावात हेही भाव जोडले गेल्याने महागाईत पेट्रोल ओतले गेले. भाज्यांशिवाय डाळी, फळांच्या दरांमध्ये ७.३५ टक्क्यांची वाढ झाली. अंडी, मांस आणि माशांच्या दरांमध्ये ३.९३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. त्यात औद्योगिक उत्पादन दरात झालेल्या कपातीचीही भर पडली. कारण, जुलैमध्ये औद्योगिक उत्पादन दर अवघ्या १.२ टक्के वाढले. गेल्या वर्षी हा दर त्याच्या चौपट म्हणजे ४.५ टक्के होता. देशभरातील प्रमुख घाऊक बाजारपेठांत नित्याच्या फळभाज्या, फुले आणि फळे यांच्या किमती केवळ ऑगस्ट महिन्यात दुपटीहून अधिक वाढल्या, हेही या वाढत्या महागाईचे एक कारण आहे. राज्यात टोमॅटो, कांदा आणि भाज्यांचे दर वाढले तर अन्य राज्यात कांद्यासोबतच फळांच्याही किमती वाढल्या. या महागाईच्या मागे इंधनाच्या दरात झालेली वाढ कारणीभूत असून त्यामुळे मालवाहतूक महाग होऊन भाजीपाला आणि फळांसारख्या नित्याच्या वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात महागल्या. ही सध्या असह्य होत असलेल्या परिस्थितीत आधीच पेट्रोलदरवाढीमुळे वैतागलेल्या नागरिकांमध्ये अधिकच रोष वाढू शकतो. म्हणूनच आधीच्या सरकारच्या काळातील हीच कारणे सांगून सत्तेवर आलेल्या भाजपच्या निवडणूक जाहिरातींचे व्हिडिओ आणि नरेंद्र मोदी यांची प्रचारकाळातील भाषणे पुन्हा सोशल मिडियावर फिरू लागली आहेत. सर्वसामान्यांना तात्काळ दिलासा मिळायला हवा आणि त्यासाठी पहिल्यांदा इंधनावर वारेमाप लावण्यात आलेले कर कमी करून पेट्रोल, डिझेलचे भाव खाली आणायला हवेत, यात शंका नाही.

via inflation is killing – editorial in Marathi, Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s