👍👍👍👍👍👍👍आरोग्याचे डोही : सज्जन ‘सुधाकर’.. | Doctor depression Solution of health brain behavior disorder | Loksatta

Clipped from: https://www.loksatta.com/sampadkiya/columns/doctor-depression-solution-of-health-brain-behavior-disorder-ysh-95-3641682/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1

याला व्यसन म्हणायचं की ‘वर्तणूक-विकार’ हे डॉक्टर ठरवतीलच, पण त्याआधी आपल्यातल्या दोषांची स्वत:शीच कबुली देणं जमायला हवं..

lekh brain tumer

याला व्यसन म्हणायचं की ‘वर्तणूक-विकार’ हे डॉक्टर ठरवतीलच, पण त्याआधी आपल्यातल्या दोषांची स्वत:शीच कबुली देणं जमायला हवं..

डॉ. उज्ज्वला दळवी

‘‘शिवांशला, नवऱ्या मुलाला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही. अत्यंत सुस्वभावी, परोपकारी, संतसत्पुरुष म्हणून त्याचं कौतुकच ऐकलं प्रत्येकाकडून. आपली निधी भाग्यवान आहे,’’  अशी माहिती अधिकृत गोटातून मिळाल्यावर लवकरच सुमुहूर्ती शुभमंगल सोहळा पार पडला. मधुचंद्राच्या मध्यावर फोन आला, ‘‘तू आहेस त्याच गावातल्या एका गरीब, हुशार विद्यार्थ्यांची फी थकली आहे. काही करशील का?’’ शिवांश ती फी भरून मोकळा झाला.

नववधू त्या औदार्याने प्रभावित झाली. तीही कमावती होती. तेवढं दातृत्व त्यांना परवडणार होतं. मधुचंद्राहून परतल्याबरोबर एका धर्मादाय शिबिरासाठी शिवांश सलग आठवडाभर परगावी जाऊन राहिला. ते निधीला खटकलं. पण घरातल्यांना त्याचंही कौतुकच वाटलं. ओळखीपाळखीत कुणालाही पैशांची गरज असली की शिवांशमधला कर्णावतार जागा होई. निधी सावध झाली. आपल्या खिशातून पैसे न देता गरजूंना मदत पोहोचवण्याचे राजमान्य मार्ग तिने शोधून काढले आणि सुचवले. शिवांशला ते रुचलं नाही.

 ‘एकच प्याला’ नाटकातल्या सुधाकराच्या व्यसनासारखा त्याचा दानशूरपणा हळूहळू वाढत गेला. ‘तुझा पगार आपल्या संसारासाठी पुरेसा आहेच की!’ असं तो सहज म्हणाला. त्यानंतर त्याच्या पगारातून बँकेत पोहोचणारा हिस्सा आटत गेला. अलीकडे तर त्याच्या पगारातली रक्कम स्वत:च्या संसारासाठी खर्च झाली तर ती वाया गेली असंच त्याला वाटू लागलं. त्याला सेवाभावी संस्थेतच रुजू व्हायचं होतं. पण मोठय़ा रकमेचं दान करता यावं म्हणूनच तो नोकरीत टिकून राहिला. परोपकारासाठीच तो नेमाने रक्तदान करू लागला. निधीला न विचारताच त्याने मूत्रिपड दान करण्याचा अर्जही भरला.

 निधीने त्याला समजवायचा प्रयत्न केला. पण परोपकाराची कुठलीही संधी हातून निसटली की शिवांशची तगमग, चिडचिड होई. सभोवतालच्या लोकांना तत्परतेने मदत केली की त्याचं कौतुक, सन्मान होई. परोपकाराच्या आनंदाचा त्याला कैफ चढे. तो कैफ ओसरतानाच त्याला परोपकाराची नवी संधी पुन्हा हवीहवीशी वाटे. तशी संधी बराच काळ आलीच नाही तरी तो कमालीचा बेचैन होई, त्याला नैराश्य येई. त्यावर उपाय म्हणून तो इतरांवर झालेल्या अन्यायांचा मागोवा घेत, परोपकाराची संधी शोधत राही. परोपकाराच्या आनंदापुढे त्याला स्वत:च्या आर्थिक सुरक्षिततेची, आरोग्याची, वैवाहिक सुखाची, कशाचीही तमा नसे.  त्याला परोपकाराचं ‘व्यसन’ होतं!

एरीन ब्रोकोविच नावाच्या एका सामाजिक कार्यकर्तीने कॅलिफोर्नियातल्या एका गावातल्या प्रदूषणाविरुद्ध मोठा लढा दिला. तिने त्या गावकऱ्यांना फार मोठी भरपाई मिळवून दिली. तिला आंतरराष्ट्रीय नावलौकिक मिळाला. तिच्यावर बेतलेला सिनेमा गाजला. त्या परोपकाराच्या  ‘एकच प्याल्या’ची तिला नशा चढली. जगाचं भलं करायच्या धुंदीत ती सतत नव्या लढय़ांसाठी, आंदोलनांसाठी कारणं शोधत राहिली. दुसराही एक मोठा लढा ती जिंकली. नंतर मात्र अपेक्षित यश मिळालं नाही. काही ठिकाणी हसं झालं. सतत प्रदूषणग्रस्त भागात राहिल्यामुळे प्रकृतीवर, वैयक्तिक आयुष्यावर दुष्परिणाम झाले. 

रवांडात जनसंहार सुरू असताना पाश्चात्त्य स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून रवांडाकरांचे प्राण वाचवले. त्या थरारक कृतार्थतेची त्या देवमाणसांना चटक लागली. नंतर हत्याकांड थांबलं. ते त्यांना आवडलं नाही! ‘मरणोन्मुख लोकच नाहीत तर त्यांना वाचवायचं महत्कार्य आमच्या हातून कसं होणार?’ अशी भीषण हळहळ त्यांनी उघड बोलून दाखवली! परोपकाराचं व्यसन लागलं की तारतम्य हरपतं. कृतार्थतेच्या आनंदासाठी तन-मन-धन उधळलं जातं. ज्याच्यावर उपकार होतात त्याने चारचौघांत कृतज्ञता व्यक्त करावी, उपकाराची ऋणीभावाने परतफेड करावी अशी अपेक्षा वाढत जाते. तो उपकृत त्या मदतीवर अवलंबून राहायला शिकतो, तिच्यावाचून असाहाय्य होतो. त्याच वेळी त्या सततच्या उपकारांनी, अपेक्षांनी तो गुदमरतो. दोघांचाही आनंद निखळ राहात नाही. कुठल्याही कारणाने झालेल्या निखळ आनंदामुळे मेंदूच्या एका विशिष्ट भागात डोपामीन नावाच्या आनंदरसायनाचं प्रमाण वाढतं. मेंदूतलं दुसरं केंद्र तो आनंद-कारण-संबंध नोंदून ठेवतं. तिसरं केंद्र, ‘त्या कारणाने आनंद लाभतो,’ हा धडा घेतं, शिकतं. माणूसजात टिकवायला लागणाऱ्या अन्नसेवन आणि प्रजनन या मूलभूत कामांनी तसा आनंद होतो. म्हणून ते शिक्षण ही मेंदूतली महत्त्वाची वाटचाल आहे.

 व्यसनाधीनतेचा मेंदूतला मार्गही तोच आहे. पण व्यसनवाटेवर आनंदरसायनाला  प्रमाणाबाहेर उधाण येतं. दारू, तंबाखू, गांजा वगैरे अमली पदार्थ तशी भरती घडवून  आणतात. त्या तुफान भरतीनंतरची ओहोटी, ते आनंद-उधाणाचं रोलरकोस्टरी ओसरणं मनाला कासावीस करतं. पुन्हा भरतीच्या लाटेवर आरूढ व्हायची ओढ अनावर होते. शिकाऊ केंद्रांनाही चुकीचे धडे मिळतात, ‘एक अफूची गोळी घेऊन तोच आनंद मिळत असला तर खाणंपिणं, प्रजनन, मानवजात टिकवायची उठाठेव हवी कुणाला?’ – हे वाईटच. पण व्यसन केवळ अमली पदार्थाचंच लागत नाही. अतिरेकी वर्तनाचंही लागतं. काही लोक भूक नसतानाही बकाबका खात राहतात. काही लोकांना अविश्रांत काम करायची तर काहींना अतोनात व्यायामाची नशा चढते. काहींना विनाकारण बेसुमार महागडी खरेदी करून झिंग येते. संगणकी, आभासी खेळ, समाजमाध्यमांवरची निरर्थक देवाणघेवाण यांचाही कैफ चढतो. पुस्तकामागून पुस्तक वाचायचं आणि रात्रंदिवस रंगून गाणी ऐकायचंही व्यसन लागतं. शिवांशच्या, दुसऱ्यांना मदत करायच्या कैफात तर मेंदूमधली तीन-तीन रसायनं हातभार लावतात!

दारूसारखाच, वर्तन-व्यसनांनीही रोजच्या कामकाजाचा बट्टय़ाबोळ होतो. जबाबदाऱ्या, जिवलगांच्या भावना, समाजातले हितसंबंध सारं काही धाब्यावर बसवलं जातं. पैसे कमावणं, प्रकृतीची काळजी घेणं खिजगणतीतही रहात नाही. आयुष्याचा ‘एकच प्याला’ होतो.  म्हणूनच व्यसनमुक्तीसाठी उपाय योजणं आवश्यक असतं. पण ते सुरू करण्यापूर्वी आपल्यातल्या दोषांची स्वत:शीच प्रामाणिक कबुली देणं जमायला हवं. आपल्याला उपचारांची गरज आहे असं मनापासून वाटायला हवं.  आपल्याला खरंच वर्तणूक-व्यसन आहे का हे स्वत:च समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ते समजण्यासाठी स्वत:ला काही प्रश्न विचारायचे असतात.  ‘लोकांना मदत केली नाही तर मी उदास, कासावीस होतो का?’, ‘मी लोकांना ऊठसूट अनाहूत सल्ला देतो का?’, ‘लोकांनी मला डावलून दुसऱ्या कुणाचा सल्ला घेतला की ते मला जाचतं का? त्याने मी दुखावतो का?’,  ‘लोकांनी माझा सल्ला मागितला नाही तर माझा अपमान होतो का?’,  ‘केवळ माझ्या सल्ल्यामुळेच दुसऱ्याच्या आयुष्याचं भलं होईल, अशी मला खात्री वाटते का?’, ‘माझ्या सल्ल्याची सतत स्तुती व्हावी ही माझी नितांत गरज आहे का?’, ‘मदतीसाठी कष्ट घेतल्यावर मी स्वार्थत्याग केला किंवा माझा अवाजवी फायदा घेतला गेला असं मला वाटतं का?’ यांच्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असली तर उपचारांची गरज लागणार हे नक्की.

उपचार आहेत. मानसोपचारतज्ज्ञ संवादांतून कित्येक गैरसमज, नकारात्मक विचार दूर करतात, नवे दृष्टिकोन देतात, दुष्टचक्रातून बाहेर पडायची वाट दाखवतात. वर्तनाचं व्यसन टाळणं महाकठीण असतं. परोपकाराची ऊर्मी मनात असतेच. पण गरजू माणसांची कुणकुण लागली नाही तर त्या ऊर्मीला वावच मिळणार नाही. त्या ऊर्मीला वाव देणारी नेमकी परिस्थिती कशी दूर ठेवायची ते मानसोपचारतज्ज्ञ कुटुंबीयांना, आप्तेष्टांनाही समजावून सांगतात. आनंद-उधाण ओसरल्यावर जे नैराश्य येतं त्याच्यातून पुढच्या आनंदशोधाचं आणि पर्यायाने व्यसनाचं दुष्टचक्र सुरू होतं. त्या नैराश्यावरची औषधं वेळीच घेतली तर दुष्टचक्र थांबवणं जमू शकतं. त्या उपचारांनी परोपकाराचं व्यसन कायमचं सुटत नाही पण आटोक्यात ठेवता येतं. परोपकारी प्रवृत्तीला समानुभूतीचा लगाम लावला, गरजूंची गरजच सरावी, त्यांनी स्वावलंबी बनावं म्हणून प्रयत्न केले तर कित्येक समस्या कायमच्याच सुटतील. सज्जन-सुधाकरांच्या प्याल्यात तृप्तीचे घोट उरतील.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s