Silicon Valley Bank in America, आजचा अग्रलेख : बुडितांचे तिमिर जावो! – silicon valley bank in america – Maharashtra Times

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/silicon-valley-bank-in-america/articleshow/98594482.cms

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बॅंक बंद झाल्याने जागतिक बॅंक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

silicon vallyआजचा अग्रलेख : बुडितांचे तिमिर जावो!

अमेरिकी अर्थकारण आणि बँकिंग व्यवस्थेमधील दोष, कमतरता आणि छुप्या पद्धतीने चालणारी आर्थिक गुन्हेगारी यांच्याकडे अमेरिकी सरकार वारंवार डोळेझाक करीत आले आहे. अमेरिकेची रिझर्व्ह बँक मानली जाणारी ‘द फेडरल रिझर्व्ह’ म्हणजे ‘फेड’ची भूमिकाही अनेकदा निष्पक्ष नसते. मुळात देशाची सेंट्रल बँक म्हणवली जाणारी फेड ही सरकारी नसून खासगी असावी, इथपासूनच अमेरिकी बँकिंग व्यवस्थेतील त्रुटी लक्षात येतात. तशी ती खासगी राहण्यातच अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. ‘सिलिकॉन व्हॅली बँक’ घनघोर संकटात सापडल्यानंतर जगभरातील आर्थिक बाजारांमध्ये जो गहजब उडाला आहे; तो स्वाभाविक असला तरी यावर अमेरिकी सरकार काही मुळातून उपाययोजना करील, अशी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. याचा एक दाखला म्हणजे, २००८ मध्ये अमेरिकी बँकिंगवर मोठे संकट कोसळले होते. तेव्हा अमेरिकी सरकार धावून गेले. त्यानंतर, देशातील बँकांवर अनेक निर्बंध लावण्यात आले. मध्यम आणि छोट्या आकाराच्या बँकांवरचे हे निर्बंध काढावेत, असे प्रयत्न लगेचच सुरू झाले. अदूरदृष्टीचे आणि तद्दन भांडवलखोर डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष झाल्यावर खरोखरच हे निर्बंध काढून टाकले. त्यातून सुटका झालेल्या बँकांमध्ये एसव्हीबी देखील होती. आणि निर्बंध जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये या बँकेचे कर्तेधर्ते आघाडीवर होते. एसव्हीबीवर आज जे संकट कोसळले आहे; ते अर्थबाजारात किती पसरते आणि इतरही बँका संकटात सापडतात का, हे नवीन आठवडा सुरू झाल्यावर समजेल. न्यूयॉर्क तसेच इतर शेअर बाजारांवरही याचा काही परिणाम होतो का, हेही या आठवड्यात कळेल.

सिलिकॉन व्हॅली बँक संकटात सापडण्याचा भारताशी जवळचा संबंध आहे. याचे कारण, ही बँक प्रामुख्याने नवोद्योग म्हणजे स्टार्ट अप्सना अर्थसाह्य, कर्जे देते. हे नवोद्योग आपले इतर आर्थिक व्यवहारही या बँकेमार्फत करतात. साहस भांडवल निधी म्हणजे व्हेंचर कॅपिटल फंड्स नवोद्योगांच्या पाठिशी उभे राहतात. नवोद्योगांना साह्य देण्याचे विविध स्तर असतात. हे उद्योजक एकेक टप्पा यशस्वी करत पुढे गेले तर त्यांना अधिकाधिक साह्य मिळत जाते. आयटी क्षेत्रात अशा नवोद्योगांची संख्या खूप आहे आणि त्यात भारतीय तरुणांची संख्या लक्षणीय आहे. अशा अनेक भारतीय उद्योगांनी एसव्हीबीच्या मार्फत असे साहस भांडवल मिळवले आहे. मात्र, त्यांना गेल्या काही आठवड्यांमध्ये बँकेवरील संकटाची कुणकूण लागली. त्यांच्यापैकी अनेकांनी आपले बँकिंग इतरत्र वळवले. एसव्हीबीवरचे संकट हे प्रामुख्याने अमेरिकेतील वाढत्या व्याजदरामुळे निर्माण झाले आहे. अमेरिकेत विक्रमी व्याजदर झाले आहेत. मूडीज या पतमापन संस्थेने या परिस्थितीत गेल्या आठवड्यात एक धोक्याची घंटा वाजवली होती. एसव्हीबी ज्या उद्योग समूहाची आहे, त्या एसव्हीबी फायनान्शियल ग्रूपला मूडीजने बँकेचे पतमापन कमी होऊ शकते, याची जाणीव दिली. हे पतमापन कमी होणे, याचा साधा अर्थ बँकेची विश्वासार्हता कमी होणे. ही विश्वासार्हता कमी होण्याचे मुख्य कारण, एसव्हीबीने रोखेबाजारात केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य झपाट्याने कमी झाले होते. एकीकडे व्याजदर वाढत असताना एसव्हीबीच्या बाँड्सचे मूल्य घसरत होते. बँकिंग हा मुख्यत: विश्वासावर चालणारा व्यवसाय असतो आणि विश्वास उडाल्यावर ‘आमच्याकडे इतकी गंगाजळी आहे’ वगैरे सफाई कोणी ऐकून घेत नाही. त्यामुळेच, अडीच लाख डॉलरपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या ठेवीदारांनी गर्दी केली आणि एसव्हीबीच्या आरोग्याविषयीची घबराट वाढत गेली. बाजारातून अधिक पैसा उचलण्याची योजना या भीतीच्या लाटेत कुठल्या कुठे वाहून गेली.

जगातल्या मोठ्या आणि जबाबदार बँका नेहेमीच बाजारातील चढउताराचे धक्के सहन करता यावेत, यासाठी मोठी राखीव गंगाजळी ठेवतात. एसव्हीबी यात कमी पडली. भरीव पाठबळ नसेल तर अर्थबाजारातील अनाठायी साहस हे अनेकदा माकडउड्या ठरते. आणि ते इतरांच्या प्राणावर बेतते. तसे झाले आहे का, हे नीट चौकशी झाली तर कळेल. आता पुढे काय, हा प्रश्न आहे. एसव्हीबी ही एखाद्या मोठ्या बँकेत विलीन होऊ शकते. नवी बँक ठेवीदार, कर्जदार यांचे अर्थहित जपू शकते. बँकेची दिवाळखोरी जाहीर झाली तर मात्र ठेवीदारांचे मोठे नुकसान होऊ शकते. सिलिकॉन व्हॅलीत जगातील शेकडो प्रतिभावान तरुण नवनवे प्रयोग करीत असतात. ते प्रयोग जग पुढे नेणारे असतात. या प्रक्रियेला जर खीळ बसली तर ते ही बँक बुडण्यापेक्षा मोठे संकट असेल. एसव्हीबी ही अमेरिकेतील सोळाव्या क्रमांकाची बँक. तिच्यासारख्या इतरही मध्यम व छोट्या बँकांना बायडेन सरकार सावरते का, हे आता कळेलच. अशा अर्थसंकटांचा तडाखा रोखण्यासाठी भारताने ‘फिनान्शियल बफर झोन’ तयार करायला हवा. तो आपल्या वित्तसंस्था व बँकिंग प्रणाली प्रचंड मजबूत करूनच तयार होऊ शकतो. जगातील सगळ्याच बुडितांचे तिमिर जावो. पण निदान ते आपल्याला तरी कमी ग्रासो!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s