करावे कर-समाधान : तोटा आणि प्राप्तिकर कायदा–लोकसत्ता

Clipped from: https://www.loksatta.com/arthvrutant/tips-for-tax-satisfaction-loss-and-income-tax-act-zws-70-2646723/

करदात्याला तोटा झाल्यास तो इतर उत्पन्नातून वजा करता येतो. मात्र हे तोटय़ाच्या आणि उत्पन्नाच्या प्रकारावर अवलंबून आहे

प्रवीण देशपांडे pravin3966@rediffmail.com

उद्योग-व्यवसाय करताना नफा किंवा तोटा अटळ असतो. नफा असेल तर त्यावर कर भरणे ओघाने आलेच. जे करदाते उद्योग-व्यवसाय करतात किंवा समभाग वा म्युच्युअल फंडाच्या युनिट्सचा खरेदी-विक्री व्यवसाय किंवा गुंतवणूक करतात अशा लोकांना काही वेळेला तोटा सहन करावा लागतो. असा तोटा झाल्यास करदात्याला प्राप्तिकरात काही सवलती मिळतात का? हे जाणून घेणे गरजेचे आहे. असा तोटा झाल्यास करदात्याने काय करावे याविषयी जाणून घेऊया.

करदात्याला तोटा झाल्यास तो इतर उत्पन्नातून वजा करता येतो. मात्र हे तोटय़ाच्या आणि उत्पन्नाच्या प्रकारावर अवलंबून आहे. करदात्याचे उत्पन्न हे पाच प्रकारात विभागले आहे. पगार किंवा वेतन, घरभाडे उत्पन्न, उद्योग-व्यवसायातील उत्पन्न, भांडवली नफा आणि इतर उत्पन्न. करदात्याला झालेला तोटा देखील या उत्पन्नाच्या स्त्रोतात विभागला जातो. तोटा उत्पन्नातून कसा वजा करता येतो या विषयी प्राप्तिकर कायद्यातील काही तरतुदी खालीलप्रमाणे:

१. त्याच उत्पन्नाच्या स्त्रोतातून प्रथम वजावट : करदात्याला ज्या उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये तोटा झाला असेल तर तो प्रथम त्याच उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये झालेल्या नफ्यामधून वजा करता येतो. उदा. जर एखाद्या करदात्याला एका उद्योगातून नफा झाला आणि दुसऱ्या उद्योगामधून तोटा झाला तर हा तोटा त्याला प्रथम उद्योगाच्याच उत्पन्नातून वजा करता येतो. याला काही अपवाद आहेत सट्टेबाजी व्यवहारातील (ज्या व्यवहारात मालाचा ताबा घेतला जात नाही) तोटा हा इतर उद्योग-व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही, तो फक्त सट्टेबाजी व्यवहारातील नफ्यामधूनच वजा करता येतो.

* घोडय़ाच्या शर्यतीवरील सट्टय़ात झालेला तोटा हा फक्त घोडय़ाच्या शर्यती सट्टय़ाच्या उत्पन्नातूनच वजा करता येतो.

*  लॉटरी, शब्दकोडे, पत्त्यांचे खेळ, किंवा जुगार, बेटिंगमधील तोटा इतर कोणत्याही उत्पन्नातून वजा करता येत नाही.

*  दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो, अल्प मुदतीच्या भांडवली तोटय़ातून वजा करता येत नाही. अल्प मुदतीचा भांडवली तोटा मात्र दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून किंवा अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो.

२. इतर स्त्रोतातील उत्पन्नातून वजावट : एका उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये झालेला तोटा त्याच स्त्रोतामधून वजा होत नसेल तर तो इतर स्त्रोतामधील उत्पन्नामधून वजा करता येतो. याला अपवाद खालीलप्रमाणे:

* भांडवली तोटा हा इतर स्त्रोताच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही.

* उद्योग-व्यवसायातील तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही.

* घराच्या उत्पन्नातील तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो, परंतु फक्त दोन लाख रुपयांपर्यंतचाच तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो.

* कोणत्याही उत्पन्नाच्या स्त्रोतामधील तोटा हा लॉटरी, शब्दकोडे, पत्त्याचे खेळ, जुगार किंवा बेटिंगमधील उत्पन्नातून वजा करता येत नाही.

* कोणत्याही उत्पन्नाच्या स्त्रोतामधील तोटा हा घोडय़ाच्या शर्यतीवरील सट्टा व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही.

३. नवीन करप्रणालीचा विकल्प निवडल्यास : करदात्याने कलम ‘११५ बीएसी’नुसार नवीन करप्रणालीचा (कोणतीही वजावट न घेता सवलतीच्या दरात कर भरण्याचा) विकल्प निवडल्यास घरभाडे उत्पन्न या सदरातील तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.

४. विवरणपत्रात ‘सी.वाय.एल.ए’ या सदरात या वर्षांत झालेला तोटा कोणत्या उत्पन्नातून वजा केला आहे आणि तोटा उत्पन्नातून वजा केल्यानंतर बाकी रक्कम या संबंधीची माहिती भरावयाची आहे.  

५.  प्राप्तिकर कायद्यात असा नियम आहे की जे उत्पन्न करमुक्त आहे अशा उत्पन्नाच्या बाबतीत तोटा झाल्यास तो तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.

६. पुढील वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ : एका उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये झालेला तोटा त्याच स्त्रोतामधून वजा होत नसेल आणि तो इतर स्त्रोतामधील उत्पन्नामधून वजा होत नसेल तर तो पुढील वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येतो. या संबंधीच्या तरतुदी आपण पुढील लेखात बघू या.

वाचक प्रश्नांचे निरसन.. 

* प्रश्न : माझे एक राहते घर आहे. या घरासाठी मी गृहकर्ज घेतले आहे. या कर्जावर मी २०२०-२१ या आर्थिक वर्षांत तीन लाख रुपये व्याज भरले आहे. या शिवाय माझे दुसरे घर मी भाडय़ाने दिले आहे. हे मला कसे करपात्र असेल?

– शुभम वैद्य

उत्तर : आपल्या दोन घरांपैकी राहत्या घरावरील घरभाडे उत्पन्न शून्य समजले जाते. त्यामुळे त्यावरील व्याजाची दोन लाख रुपयांचीच वजावट आपण घेऊ  शकता. ही वजावट घेतल्यानंतर या घराचा २ लाख रुपयांचा तोटा हा दुसऱ्या घराच्या उत्पन्नातून वजा करू शकता. हा तोटा पूर्णपणे वजा न झाल्यास उत्पन्नाच्या इतर स्त्रोतातून वजा करता येतो. इतर उत्पन्नातून देखील पूर्णपणे वजा न झाल्यास तो पुढील वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येईल. नवीन करप्रणालीचा विकल्प निवडल्यास हा तोटा वजा होऊ  शकत नाही.   

* प्रश्न : मी माझे घर विकले आणि त्यात मला दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा झाला. याच वर्षी मला समभागाच्या विक्रीतून अल्प मुदतीचा नफा झाला आणि दीर्घ मुदतीचा नफा देखील झाला. मला घराच्या विक्रीवर झालेला तोटा समभागाच्या विक्रीतून झालेल्या नफ्यातून वजा करता येईल का?

– आरती पटणे

उत्तर : आपल्याला घराच्या विक्रीवरील दीर्घमुदतीचा तोटा समभागाच्या अल्प मुदतीच्या नफ्यातून वजा करता येत नाही. घराच्या विक्रीवर झालेला दीर्घमुदतीचा तोटा हा समभागाच्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येईल. हा पूर्णपणे वजा होत नसल्यास इतर उत्पन्नातून वजा न होता पुढील वर्षी ‘कॅरी फॉरवर्ड’ करावा लागेल. यासाठी या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत भरणे बंधनकारक आहे.

* प्रश्न : माझ्याकडे ४ घरे आहेत. यातील दोन घरे मी भाडय़ाने दिलेली आहेत. विवरणपत्रात याचे उत्पन्न दाखविताना मी चारही घराचे एकूण उत्पन्न एकत्र दाखवू शकतो का?

– एक वाचक

उत्तर : विवरणपत्रात प्रत्येक घराचे उत्पन्न आणि त्याच्या वजावटी या वेगवेगळ्या दाखव्याव्या लागतील. विवरणपत्रात प्रत्येक घराचा पत्ता, घराचा सयुक्तिक मालक आणि त्याचा हिस्सा, घर भाडय़ाने दिले आहे का? असल्यास भाडेकरूचा तपशील, भाडे, मालमत्ता कर, व्याज, इत्यादी माहिती द्यावी लागते. त्यामुळे आपण ही माहिती एकत्र देऊ  शकत नाही. 

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s