रात्रीच्या गर्भातला उष:काल –महाराष्ट् टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/editorial-on-indian-economy-and-new-financial-year/articleshow/81803683.cms

आज सुरू होत असणारे नवे आर्थिक वर्ष ही भारतासाठी एक नवी सुरुवात आहे. हे नवे वर्षही करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रभावाखाली सुरू होत असले तरी, मागच्या वर्षाचा विकासाचा नीचांक मागे ठेवून भारतीय अर्थव्यवस्था एक नवी झेप घेईल, असे जागतिक बँकेने अगदी ताज्या अंदाजात म्हटले आहे.

आज सुरू होत असणारे नवे आर्थिक वर्ष ही भारतासाठी एक नवी सुरुवात आहे. हे नवे वर्षही करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रभावाखाली सुरू होत असले तरी, मागच्या वर्षाचा विकासाचा नीचांक मागे ठेवून भारतीय अर्थव्यवस्था एक नवी झेप घेईल, असे जागतिक बँकेने अगदी ताज्या अंदाजात म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्था १०.१ टक्के वेगाने यंदा वाढेल, असे जागतिक बँकेला वाटते आहे. उणे विकासाची दरी ओलांडून होणारा हा विकास आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष व खरा विकासदर कमीच असेल, असे अनेक अर्थतज्ज्ञ म्हणत असले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हेच योग्य. याच कारण, युरोप, अमेरिका, जपान किंवा इतरही अनेक देश इतकी तरी झेप घेऊ शकतील का, याची शंका ‘वर्ल्ड बँके’ला वाटते आहे. याउलट, टाळेबंदीचा काळ संपल्यानंतर भारतीय उद्योग, व्यवसाय आणि कारखान्यांनी ज्या जोमाने नवा प्रवास सुरू केला आहे; तो जगातल्या सगळ्या वित्तसंस्थांनाच नव्हे तर आपल्या रिझर्व्ह बँकेला काहीसा सुखद धक्कादायक वाटला होता. एकूण राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जीडीपीत साडेसात ते साडेबारा टक्के वाढ होईल, असे ‘वर्ल्ड बँके’ने नमूद केले आहे. साडेबारा टक्के हा अंदाज घसरून दहा टक्के झाला तरी ते मोठे यश असेल. गेल्या काही दिवसांत मूडीज, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, केअर रेटिंग्ज, एस अँड पी या सर्वच यंत्रणांनी भारताच्या विकासाचा वेग दहा टक्क्यांच्या वरच राहील, असे म्हटले आहे. यात आता जागतिक बँकेची भर पडली आहे.

अर्थात, सर्वसामान्य नागरिकांना या साऱ्या आकड्यांचा अनुभव आपल्या रोजच्या जीवनात यावा लागतो. सध्या संभाव्य टाळेबंदीला महाराष्ट्रात जो सार्वत्रिक विरोध होतो आहे, त्याचे एक कारण हेच आहे. म्हणजे, सामान्य नागरिक, दुकानदार, कष्टकरी, छोटे उद्योजक आणि कारखानदार हे सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यास उत्सुक आहेत. ती संधी त्यांना दिली गेली पाहिजे. गेल्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने जो हात दिला आहे; ती प्रक्रिया पुढे न्यायची असेल तर आता उद्योगांना बंधनमुक्त करावेच लागेल. जागतिक बँकेने आपला अहवाल देताना ‘भारताच्या लस-मोहिमेकडे लक्ष ठेवावे लागेल’ असे म्हटले आहे. लसीकरण वेगाने झाले तर अर्थव्यवस्थेवरचे मळभ त्याच वेगाने दूर होईल, असा त्याचा अर्थ आहे. तो सरकारी यंत्रणांनी लक्षात ठेवणे, आवश्यक आहे. वेगाने लसीकरण, पुरेशी काळजी आणि उद्योग-धंद्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन अशी त्रिसूत्री स्वीकारली तर ट्रॅक्टर किंवा कारविक्रीच्या वाढत्या आकड्यांमधून दिसणाऱ्या पाऊलखुणा अधिकाधिक स्पष्ट होत जातील. मोठा रोजगार देणारे बांधकाम क्षेत्र आता हळूहळू हलू लागले आहे. या पाठोपाठ लसीकरणाचा वेग वाढला तर कित्येक कोटी रोजगार देणारे पर्यटन क्षेत्रही मोकळे होईल. मग अर्थकारणाच्या फिरत्या चाकांचा वेग वाढेल.

गेल्या वर्षी शिकलेले अनेक धडे लक्षात ठेवायचे आहेत. केंद्राने करोना काळासाठी आजवर वीस लाख कोटींची विविध पॅकेजेस दिली. त्यामुळेच, केंद्र सरकार या वर्षात अनेक सरकारी उद्योग विकण्याच्या मागे आहे. ते योग्यच आहे. याशिवाय, यंदा मोठा आपत्ती निधी उभारावा लागणार आहे. तसेच, आरोग्य व्यवस्था बळकट कराव्या लागतील. यंदा जगातला पैसा भांडवली गुंतवणुकीच्या रूपाने सर्वाधिक कुठे जाईल, या प्रश्नाचे उत्तरही भारतासाठी समाधानकारक आहे. अनेक पाहण्यांमध्ये भारताचा क्रमांक पहिला किंवा दुसरा आहे. ही नवी परकीय गुंतवणूक नक्कीच काही प्रमाणात नवे रोजगार निर्माण करील. शिवाय, वाढत्या खेळत्या पैशाचे इतरही बरेच आनुषंगिक लाभ असतात. आज जगभरातील सरकारांनी करोनामुळे प्रचंड पैसा अर्थकारणात ओतला आहे. याचा एक परिणाम म्हणून भारतीय भांडवली बाजारात काल संपलेल्या वर्षात २.७५ लाख कोटी रुपये नव्याने आले असतील, असा अंदाज आहे. हा गेल्या दोन दशकांमधला विक्रम आहे. हा सगळा पैसाही अर्थकारणाला नव्या वर्षात नक्कीच वेग देईल. आजपासून सात सरकारी बँकांचे अस्तित्वही संपते आहे. त्या इतर बँकांमध्ये विलीन होत आहेत. आजच वेतनरचनेतील विविध प्रकारचे भत्ते कमी करून ‘मूळ वेतन’ किमान पन्नास टक्के करण्याचा नियम अमलात येणार होता. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी वाढला असता. पण हा नियम लांबणीवर पडलेला दिसतो. भारताने नुकतेच परकीय गंगाजळीत रशियाला मागे टाकून जगात चीन, जपान, स्वित्झर्लंड यांच्या मागोमाग चौथे स्थान मिळवले. आपली गंगाजळी आता ५८३ अब्ज डॉलर इतकी प्रचंड झाली आहे. मात्र, या साऱ्या अवाढव्य रकमांचे लाभ सामान्य माणसांना मिळाले नाहीत तर ते त्यांना मृगजळ वाटेल. तरीही, एक दीर्घरात्र संपली आहे. नवा उष:काल होतो आहे. हे नवे आर्थिक वर्ष मध्यमवर्ग आणि वंचितांना वाढती वणवण करायला लावणार नाही, अशी आजतरी आशा आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s