शांतिप्रिय; पण सामर्थ्यशाली –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/india-has-worlds-fourth-strongest-military-military-directs-study/articleshow/81642123.cms

भारतीयांना सैन्यदलांचा अभिमान असणे आणि त्यांच्या शौर्यावर गाढ विश्वास असणे, स्वाभाविकच आहे. या सैन्यदलांच्या विजीगिषू पराक्रमाचा अनुभवही नागरिकांनी अनेकदा घेतला आहे;

भारतीयांना सैन्यदलांचा अभिमान असणे आणि त्यांच्या शौर्यावर गाढ विश्वास असणे, स्वाभाविकच आहे. या सैन्यदलांच्या विजीगिषू पराक्रमाचा अनुभवही नागरिकांनी अनेकदा घेतला आहे; पण भारताच्या या सैन्यदलाच्या ताकदीचे, शौर्याचे आणि तयारीचे मूल्यांकन जगात कसे होते, हेही महत्त्वाचे आहे. ‘मिलिटरी डायरेक्ट‘ या संस्थेने केलेल्या अभ्यासात भारताच्या सैन्यदलांना जगात चौथा क्रमांक दिला आहे. असा अभ्यास करताना सत्तराहून अधिक निकष लावण्यात आले. त्यात प्रत्यक्ष रणभूमीतील जवानांची संख्या, लढाऊ विमाने, रणगाडे,युद्धनौका, युद्ध लढण्याची आणि जिंकण्याची क्षमता, सैन्यदलांवरचा खर्च, यातील प्रत्यक्ष शस्त्रसामग्रीसाठी खर्ची पडणारे धन, शस्त्रास्त्रांची गुणवत्ता आणि अत्याधुनिकता असे अनेक निकष आहेत. हे सर्व निकष लावल्यानंतर चीन, अमेरिका, रशिया यांच्यानंतरचा क्रम भारताचा लागला आहे. यातील सगळ्यांत महत्त्वाची बाब म्हणजे, चीनने अमेरिकेला मागे टाकले आहे. अर्थात, हे सगळे कागदावरचे गणित असून प्रत्यक्ष रणांगणात आणि आज कमालीच्या बदलत चाललेल्या युद्धाच्या प्रकारांमध्ये काहीही होऊ शकते. या पाहणीत एक गमतीदार; पण काल्पनिक कोष्टक आहे. ते म्हणजे, हवाई युद्ध झाले, तर अमेरिका चीन व रशिया यांना गारद करू शकते; कारण अमेरिकेचा आकाशातला वावर इतरांपेक्षा किती तरी जास्त आहे. महासागरात युद्ध झाले, तर चीन इतर दोघांना पाणी पाजेल. युद्धनौकांची संख्या व त्यांची आधुनिकता यांच्यात चीनने गेल्या दोन दशकांत प्रचंड आघाडी घेतली आहे. हा अर्थातच भारताच्या दृष्टीनेही महत्त्वाचा इशारा आहे. तिसरी काल्पनिक स्थिती म्हणजे, रणांगणात युद्ध झालेच तर रशिया चीन व अमेरिका यांना हरवू शकतो. रशियाइतकी चपळ, अत्याधुनिक शस्त्रयुक्त आणि रणांगणातली खडी फौज इतर कुणाकडेही नाही. या तिघांनंतरचा क्रम भारताचा आहे. या स्पर्धेत भारताने फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, सौदी अरेबिया यांना क्रमाक्रमाने ओलांडत, आता निर्णायकपणे मागे टाकले आहे. आता मात्र भारताला पुढचे दशकभर तरी जगातल्या पहिल्या त्रयीत स्थान मिळणे शक्य नाही. अर्थात, खरोखरच युद्धजन्य स्थिती येते, तेव्हा मित्रदेशांची कशी बेरीज होते, हे जगाने पाहिले आहे आणि एखाद्या बलाढ्य देशाला आसपासचे देश शेवटी जेरीस कसे आणतात, हेही जगाने अनुभवले आहे.

भारताच्या दृष्टीने या पाहणीचा महत्त्वाचा अर्थ असा, की जगातल्या कोणत्याही देशाला यापुढे भारतावर युद्ध लादणे किंवा भारताच्या सतत सशस्त्र खोड्या काढणे, परवडणारे नाही. उदारीकरणानंतर गेल्या तीन दशकांमध्ये भारताची सैन्यदलांवरची अर्थसंकल्पी तरतूद सातत्याने वाढत गेली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातला संरक्षण खर्च चार लाख ७८ हजार कोटी रुपये इतका आहे. या ठिकाणी भारताचे दिवंगत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण करणे उचित ठरेल. पर्रीकरांनी तुलनेने कमी काळाच्या कारकिर्दीत शस्त्र आणि सामग्री खरेदीची प्रक्रिया एकीकडे वेगवान आणि दुसरीकडे पारदर्शक कशी होईल, यासाठी अनेक मूलभूत सुधारणा केल्या आहेत; त्यामुळेच संरक्षण दलांतील भांडवली खर्च गुणात्मक पद्धतीने वाढणे शक्य झाले आहे. लवकरच चालू होणाऱ्या आर्थिक वर्षात अशा भांडवली खर्चासाठी एक लाख तीस हजार कोटींहून अधिक तरतूद त्यामुळेच शक्य झाली आहे. गेल्या काही काळात अर्थसंकल्पात शस्त्रखरेदीची तरतूद; पण प्रत्यक्षात खरेदीच नाही, असा प्रसंग अनेकदा आला. तो येऊ नये, असा आग्रही पर्रीकरांनी सातत्याने धरला. अशा अनेक पावलांमुळे भारत आज चौथ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. यात एक प्रश्न पडू शकतो, की भारताने इतके शस्त्रसज्ज आणि युद्धमान असावे का? इतका खर्च वाढविणे योग्य आहे का? भारताला प्रिय असणाऱ्या आणि भारताचा विश्वास असणाऱ्या विश्वशांतीची किंमत म्हणजे ही युद्धसज्जता आहे. आज जगात जे सबळ व समर्थ आहेत; त्यांच्याच शांतिसंदेशांना अर्थ आहे. सामर्थ्यशाली होऊन शांततेसाठी प्रयत्न केले, तरच ते अर्थपूर्ण ठरण्याची शक्यता अधिक असते. गेल्या काही दिवसांतील ‘क्वाड’ या अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चार देशांच्या पुढाकाराकडे या दृष्टीने पाहायला हवे. आज अमेरिकेचा संरक्षण खर्च भारताच्या दसपट आहे. चीनचाही तिपटीने अधिक आहे; पण केवळ खर्च किती होतो, यावर सैन्याचे आणि देशाचेही मनोबल ठरत नाही. तसे असते, तर व्हिएतनाममधून अमेरिकेला काढता पाय घ्यावा लागला नसता. ही शस्त्रसज्जता आणि हे सामर्थ्य आर्थिक विकास, सामाजिक स्थैर्य व देशांतर्गत सामंजस्य यांना पूरक ठरते का, हेही महत्त्वाचे असते. सोव्हिएत युनियनमध्ये तसे झाले नाही. तो कोसळला. समर्थ शस्त्रदले, निकोप लोकशाही व्यवस्था आणि मुक्त विकासोन्मुख समाज, ही त्रिवेणी हे कोणत्याही देशाचे खरे सामर्थ्य असते. भारत तसा आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s