न्यायव्यवस्थेची ‘समांतर’ गोची —महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/article/retired-judge-rajan-kochar-article-on-judiciary-and-method-of-judgment/articleshow/81522134.cms

न्यायालयांच्या तांत्रिक व अतिजाचक जाळ्यातून मुक्त ठेवून, न्यायदान त्वरित व्हावे, या हेतूने राबविण्यासाठी समांतर न्यायदानाची पद्धत योग्य मार्गाने स्थापन केली खरी; पण ही यंत्रणा राबविणारे म्हणून पुन्हा इथेही त्या तांत्रिकतेचे गुलामच नियुक्त होऊ लागले…

न्या. राजन कोचर

न्यायव्यवस्थेच्या संदर्भात अलीकडे विविध पातळींवर चर्चा सुरू झाली आहे, हे चांगलेच आहे. न्यायवस्थेतील त्रुटींवर बोललेच पाहिजे, यात वाद नाही; परंतु न्यायव्यवस्थेला समांतर अशी, पर्यायी लवाद व्यवस्थाही आपल्या देशात गेली अनेक वर्षे आहे. आता चर्चा सुरू झालीच आहे, तर ओघाने या समांतर व्यवस्थेतील कमतरतांचाही सांगोपांग विचार झाला पाहिजे. त्यासाठी अगदी न्यायव्यवस्थेच्या मुळाकडे आपण आधी थोडक्यात जाऊ आणि मग लवाद व्यवस्थेचा विचार करू.

सत्ययुगात नंतर सहजपणे ईप्सित देणाऱ्या कल्पवृक्षांचाही ऱ्हास झाला. असे मानले जाते, की नागरी जीवन सुरळीत व्हावे, म्हणून आदिनाथ नामक राजाने समाजाला ‘असि, मसि व कृषि’चे धडे दिले आणि समाजजीवनात कर्माचे महत्त्व रुजवले. त्या काळानंतर न्यायाचे तत्त्व स्थापन झाले असावे आणि पंच परमेश्वर ही संकल्पना रूढ झाली असावी. अनेक युगे समाजाने ही रुढी मान्य केली; पण त्यानंतर मोगल शासक आले, राजपूत आणि मराठे शासक झाले. यानंतर न्यायव्यवस्था बदलू लागली. त्यानंतर मग इंग्रज आले आणि त्यांनी त्यांचे राज्य त्यांच्या सोयीनुसार चालविण्यासाठी त्यांना हवे असलेले कायदे केले; तसेच न्यायव्यवस्था स्थापन केली. तिच्या चोख अंमलबजावणीसाठी एक कार्यक्षम यंत्रणा तयार केली आणि चोख राबविलीदेखील. त्यांनी या देशाला उत्तम कायदे दिले आणि कार्यक्षम अशी न्यायप्रणालीही दिली. त्यांनी एक चौकट दिली आणि आपण ती तशीच शाबूत ठेवली, म्हणून आज आपले नागरी जीवन सुरळीत, अव्याहत सुरू आहे, हे मान्य केल्याशिवाय गत्यंतर नाही.

प्रारंभीचा काही काळ उत्तम प्रकारची माणसे या यंत्रणा राबवित होती, म्हणून आपल्या दैवाने देशाचे हे गाडे बऱ्यापैकी चालले. त्यानंतर मात्र कलियुगाच्या दाट सावलीखाली आपली एकूण व्यवस्थाच काय, न्यायव्यवस्थादेखील ढासळत गेली. उत्तम असणाऱ्या न्याय यंत्रणेत बिघाड होऊ लागला. दर्जा एकदम खालावला. अकार्यक्षम लोकांच्या हातात आपली न्याय यंत्रणा हळूहळू जात राहिली. या ऱ्हासाची जाणीव असूनही आणि दुसरा कुठला पर्यायही नसल्याने नाईलाजास्तव लोक न्यायालयांकडे जात राहिले. यातूनच उद्वेग, निराशा, भ्रमनिरास, हताशपणाचे अनुभव अनेकांना येत राहिले. त्याच्या परिणामी पुढे जे व्हायचे तेच झाले आणि शेवटी ‘शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये,’ ही उक्ती समाजात रूढ झाली, समाजमान्यही झाली. मोठ्या प्रमाणात सर्वत्र कामे तुंबू लागली. अन्याय्यपणे ‘न्यायदान’ होऊ लागले. त्याचा परिणाम म्हणून काही सुज्ञ राज्यकर्त्यांनी सद्हेतूने यावर पर्याय शोधला. न्यायदानासाठी एक लवचिक अशी समांतर यंत्रणा त्यांनी स्थापन केली. अर्बिट्रेशनची न्यायदान व्यवस्था कायदेशीर मान्यतेनुसारच उभी केली.

ही समांतर न्यायदानाची पद्धत न्यायालयांच्या तांत्रिक व अतिजाचक जाळ्यातून मुक्त ठेवून, न्यायदान त्वरित व्हावे, या हेतूने राबविण्यासाठी योग्य मार्गाने स्थापन केली खरी; पण ही यंत्रणा राबविणारे म्हणून पुन्हा इथेही त्या तांत्रिकतेचे गुलामच नियुक्त होऊ लागले. नवीन मानसिकता असलेले विद्वान न्यायाधीश दुर्मीळच झाले, म्हणून जुन्या ‘तांत्रिक-मांत्रिकांच्या’ हातातच ही पर्यायी यंत्रणाही संपूर्णपणे गेली. त्याचा परिणाम काय झाला? तर पुन्हा एकदा जे होऊ नये तेच झाले! निकालात अक्षम्य अशी दिरंगाई व न्यायालयांपेक्षा अधिक महाग व खर्चिक न्याय अशी अवस्था झाली. न्यायालयांवर निदान अनेक निर्बंध व अंकुश आहेत. इंग्रजांनी आखून दिलेल्या शिस्तीत वाढलेली आपली न्याय चौकट असल्याने, चौफेर न उधळणारी माणसे आहेत. त्यांचे वागणे आजही पूर्णपणे मनमानी नाही, हे मान्य करावे लागेल; पण दुर्दैवाने लवादांच्या बाबतीत आज तरी तसे म्हणवत नाही. त्यांचे – बहुतेकांचे – वर्तन अनिर्बंध असेच आहे. मनाला येईल तसेच वागणे असल्याने, माझ्यासारख्या अनेकांना त्याचा उबग येणे साहजिक आहे.

न्यायालयांपेक्षाही जास्त ‘तारीख पे तारीख’ आता या लवाद प्रक्रियेत आहे. अनेकदा लवादांचे कामकाज निरंकुश चालू असते. त्यातूनही, या लवादात जर सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त विभूती असतील, तर मग परमेश्वरच तुमचे रक्षण करो. अगदी काही तुरळक असे सन्माननीय अपवाद वगळले, तर सर्वोच्च न्यायालयातील बहुतेक निवृत्त न्यायमूर्ती स्वतःला स्वयंभू श्रेणीप्रमाणे लवाद म्हणून कामकाज चालवितात, हा माझा अनुभव आहे. हे सन्माननीय स्वयंभू न्यायमूर्ती वेळेचे किंवा कुठलेच बंधन नाही, असेच समजून वागत असतात. त्यांनी शुल्क आकारण्यावरही कुठलेच निर्बंध नसतात. ते दिल्लीस्थित असतील, तर विमान प्रवासाचा खर्च; तसेच राहण्याची पंचतारांकित व्यवस्थादेखील पक्षकारांनी द्यावयाची असते. त्यातूनही जर तारीख पडलीच, तर त्या खेपेचा पूर्ण खर्च पक्षकारांनीच द्यायचा असतो. वकिलांचे शुल्क अर्थातच वेगळे.

लवादी-न्यायमूर्ती म्हणजे तर पक्षकारांचे जावईच मानले पाहिजेत, अर्थात जोपर्यंत निकाल होत नाही, तोपर्यंत. हा निकाल अर्थातच अखेरचा नसतो; कारण पुढे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय अशा वाऱ्या असतातच. म्हणूनच ‘न्यायदान प्रक्रिया जिंदाबाद’ व ‘लवाद प्रक्रिया अमर रहे’ असे म्हणायची वेळ आलेली आहे.

आंतरदेशीय लवाद प्रक्रिया मात्र अत्यंत सरळ-सोपी आहे, असे मला वाटते. मी अशा एका लवादाचा अनुभव घेतला आहे. हे लवाद प्रकरण फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे चालले. निव्वळ दोन दिवसांत संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागला; कारण वकिलांना पुरावा व वादविवाद करण्यास वेळेचे बंधनच ठेवले होते. जास्त वेळखाऊ उलट तपासणी नाही. नेमके प्रश्न विचारायचे, जास्त पाल्हाळ-घोळ घालण्यास कुणाला संधीच दिली नाही!

माझा भारतातला-मुंबईचा कटू अनुभव नेमका याच्या विरुद्ध आहे. एका प्रकरणात दोन माजी सरन्यायाधीश व मी निवृत्त न्यायाधीश असे आमचे त्रिसदस्य लवाद मंडळ होते. दोघे सदस्य दिल्लीहून (अर्थातच विमानाने आले आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम केला) आले. लवादाच्या कामकाजास प्रारंभ झाला तो नोव्हेंबर २००६ मध्ये. पुराव्याचे काम आणि वाद-विवाद संपले १५ जानेवारी २०१९ रोजी. त्यानंतर शेवटचा निकाल – अॅवॉर्ड झाला १५ जानेवारी २०२० रोजी. या प्रकरणासाठी एकूण १८० बैठका झाल्या. प्रत्येकी पक्षकाराने कोट्यवधी खर्चून अजूनही अंतिम निकाल आलेला नाहीच. म्हणूनच मी म्हणतो, की लवाद अमर रहे – लवाद चिरायू होवो!

इंग्रजांनी दिलेली न्यायव्यवस्था सरतेशेवटी आपल्याकडे येनकेनप्रकारेण कशी नामोहरम झाली, याचे हे ताजे व जिवंत उदाहरण आहे.

(लेखक मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत.)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s