मनोहर कथा –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/samwad/article-on-ek-manohar-katha-book-by-mangala-khadilkar/articleshow/81493315.cms

भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या दिवशी – १७ मार्च रोजी नवचैतन्य प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या मंगला खाडिलकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘एक ‘मनोहर’ कथा’ या पुस्तकातील संपादित अंश!

चरित्रलेखनाच्या वळणवाटा मोठ्या आनंददायी आणि गमतीशीर असतात. कधी आठवणींचे हिरवेगार पठार, तर कधी निबिड अरण्यातून वाटचाल करत पुढे जात राहायचे. कधी चकवाही लागतो. पुन्हा पुन्हा एकाच जागी पोहोचावे तसे होते; पण एका क्षणी लख्ख उजाडते आणि पुढची वाट सुकर होते. शोभादर्शकातून पाहू लागले, की समोरच्या दृश्यात कल्पनेतले आकार आणि रंग यांची सरमिसळ होऊ लागते. दुर्बिणीतून पाहावे, तर पलीकडचा हिरवा ऐवज एवढा जवळ येतो, की त्या हिरवाईतल्या रंगच्छटांसोबत आणि रानफुलांसोबत एखादा नकोसा आकार किंवा रंग नजरेला खुपू लागतो.

मग वाटू लागते, की स्वच्छ नजरेने आसमंत पाहावा आणि काळाच्या त्या तुकड्यावर आपल्या पाऊलखुणा उमटवून दिगंताचा प्रवासी झालेला तो माणूस समजून घेत पुढे जावे. मनोहर पर्रीकर हे भारतीय राजकारणातले गेल्या तीन दशकांत सर्वसामान्य जनतेच्या नजरेत भरलेले, बुद्धिवंतांना पटलेले किंवा न पटलेले; परंतु त्यांनी ‘मानलेले’ असे व्यक्तिमत्त्व!

गोव्याच्या ‘आम’ जनतेचे ‘खास’ भाई, निरंतर विकासाचे, सर्वसमावेशक व दूरदृष्टीचे राजकारण करणारे गोव्याचे मुख्यमंत्री आणि अल्प कालावधीत अनेक धाडसी, प्रगतिशील निर्णय घेऊन जवानांपासून ते उच्चाधिकाऱ्यांपर्यंत चैतन्यशील कार्यसंस्कृती निर्माण करून भारतीय सेनेचे मनोबल वाढविणारे संरक्षणमंत्री असा त्य़ांचा चढता राजकीय प्रवास थोडासा अकल्पनीय पद्धतीने गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून पूर्ण झाला.

या राजकीय प्रवासातला २००० ते २००५ हा काळ गोव्यासाठी राजकीय परिवर्तनाचा काळ ठरला. एक ‘आम’ आदमी मुख्यमंत्री झाला होता आणि ‘सुपरमॅन’सारखी कामे करत होता. साधा पोशाख, किमान सरकारी सुविधांचा वापर, सरकारी ‘तामझामाला’ अजिबात न मोजणे, अशा त्यांच्या अनेक गोष्टींच्या चर्चा गोयंकारच नव्हे, तर गोव्याच्या सीमा ओलांडून बाहेर पोहोचू लागल्या. दिवसाचे १८-१८ तास काम करणारा, अभ्य़ासून प्रकटणारा ‘मुख्यमंत्री ऑन २४ तास ड्युटी’, २००५ नंतर तोफेसारखा धडाडणारा अभ्यासू, विरोधी पक्षनेता-लोकनेता ही त्यांची रूपे मला त्या काळात जवळून पाहता आली. त्यांच्यावर पुस्तक लिहावे, या माझ्या विचाराला त्यांनी तत्काळ संमती दिली. दोन ऑगस्ट २००६ पासून चार प्रदीर्घ मुलाखतीही दिल्या; परंतु दुर्दैवाने नंतर मनात असूनही पुस्तकासाठी वेळ काढणे त्यांना जमले नाही.

उंच उंच जाणाऱ्या या माणसाला पाहात असतानाच त्यांच्या जीवघेण्या आजाराचे वृत्त आले. त्यांचे निघून जाणे अवघ्या देशाच्या जिव्हारी लागले. त्या कल्लोळातच या पुस्तकाचे लेखन पुन्हा सुरू झाले.

‘मनोहर’ नावाचे अर्क रूप अस्तित्व या जगातून निघून गेले, तरी त्याच्या अस्तित्वाच्या कणिका मनात जपलेल्या अनेक आप्त, सुहृद, जिवलग, सहकारी, सहयोगी, निरीक्षक यांचा शोध घेत गेले, तसतसे एकेक ‘दार’ उघडत गेले. ‘धूसर’ होण्यापूर्वी त्या आठवणी टिपणे गरजेचे होते. त्यांना अंतर्बाह्य जाणणारी, त्यांना समजून घेतलेली अनेक माणसे – त्यांनी मनःपूर्वक आठवलेला, हृदयाशी जपलेला हा माणूस माझ्या हाती विश्वासाने सोपवला. अंशाअंशाने मिळालेला हा ‘मनोहर’ नावाचा भन्नाट माणूस आठवणींच्या कवडशातून मांडत गेले. ‘झुंजारांची रीत’ स्वीकारलेला हा गुणदोषयुक्त माणूस! पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे नेतेपण सांभाळले, मित्रांनी त्यांचे आवेग सांभाळले, घरच्यांनी त्यांचे प्रखरपण आणि हळवेपण दोन्ही समजून घेतले; असा हा माणूस कुसुमाग्रजांच्या ‘नट’ या कवितेतील ‘नटा’प्रमाणे हजारो, लाखोंच्या जीवनात व स्मरणातही अंशाअंशाने वाटला गेला आहे. त्याने उच्चारलेले शब्द, उभे केलेले कार्य, जपलेले मैत्र, दुरावे, सोबतीने घालविलेले क्षण, हर्ष-विमर्षाचे कल्लोळ यांची स्पंदने टिपण्याचा प्रयत्न ‘एक मनोहर कथा‘ या पुस्तकात मी केला आहे. अंगीभूत अफाट बुद्धिमत्ता, पराकोटीची निःस्पृहता, आत्यंतिक समर्पण भाव, ज्ञानलालसा, काळाच्या पुढे पाहण्याची वृत्ती, लखलखते (पण पुढे मंदावत गेलेल्या वादळवाऱ्यासारखे वाटणारे) कर्तृत्त्व – अखेरच्या क्षणापर्यंत मृत्यूशी धैर्यशील झुंज देणारा हा माणूस जगला कसा, हे सांगण्यासाठीच ही ‘मनोहर’ कथा!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s