निश्चयात्मक बुद्धी –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/sagun-nirgun/sagun-nirgun-by-swami-makarandnath-students-mind-and-wisdom/articleshow/81458766.cms

मनुष्याचे यश आणि अपयश हे त्याच्या मनाची स्थिरता किती आहे, यावर अवलंबून आहे. मनाच्या स्थिरतेकरता निश्चयात्मक बुद्धीची अत्यंत गरज आहे; कारण मनाची स्थिरता बुद्धीच्या निश्चलतेवर अवलंबून आहे.

स्वामी मकरंदनाथ

मनुष्याचे यश आणि अपयश हे त्याच्या मनाची स्थिरता किती आहे, यावर अवलंबून आहे. मनाच्या स्थिरतेकरता निश्चयात्मक बुद्धीची अत्यंत गरज आहे; कारण मनाची स्थिरता बुद्धीच्या निश्चलतेवर अवलंबून आहे. बरेचदा असे दिसते, की घेतलेला एखादा निर्णय चूक, की बरोबर या विषयी आपल्या ठिकाणी गोंधळ चालू असतो. याचे कारण आपली द्विधा मनःस्थिती! यामुळेच आपण कोणतीही गोष्ट ठामपणे ठरवू शकत नाही.

महाविद्यालयीन तरुण विद्यार्थी आवडीने एखादा विषय निवडून शिकायला लागतात आणि थोड्याच दिवसांत कंटाळून दुसराच विषय निवडतात. नवीन नोकरीबाबतही हीच धरसोड दिसते. याचे कारण जीवनात नेमके काय करायचे आहे, याबद्दल बुद्धीचा निश्चय न करता येणे तसेच मनाची चंचलता असणे, हेच असते. यामुळे मनात द्वंद्व निर्माण होते आणि आपण आपल्या जीवनातील सहजता, आनंद आणि वेळ गमावून बसतो.

संकल्पविकल्पांना आपण अतिमहत्त्व देतो हेच मानसिक द्वंद्वांचे मुख्य कारण आहे. निश्चयात्मक बुद्धीच्या मार्गातील हा मोठाच अडसर आहे. यावर मात करण्यासाठी शांत, स्थिरबुद्धीने, विचारपूर्वक एखाद्या कार्याचा निश्चय करावा आणि तो धैर्याने, न डगमगता तडीस न्यावा. मन जर चंचल, कमकुवत असेल तर त्याला धैर्यशील, खंबीर बनविणे आपल्या हातात आहे. त्यासाठी ध्यानाची नितांत आवश्यकता आहे. ध्यानामुळे चंचल मन स्थिर व्हायला खूप मदत होते. त्यासाठी आपल्या मनाचे साक्षी व्हावे. ध्यानसमयी त्याचे बारकाईने निरीक्षण करावे.

मन स्थिर, शांत तसेच बुद्धी निश्चयात्मक होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कोणा सत्पुरुषाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळत नसेल; तर भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोधासारख्या अद्वैत ग्रंथांचे वाचन, मनन, चिंतन करीत रहावे. त्यात सांगितलेली उपासना यथाशक्ती समजून घ्यावी आणि करावी. आपली तळमळ वाढली, की साधना सांगणारे सद्गुरु नक्कीच भेटतात. त्यांच्याकडून श्रवण करावे ते ध्यानाविषयी मार्गदर्शन करतील.

ध्यानाबरोबर थोड्या मौनाच्या, आत्मपरीक्षणाच्या अभ्यासाने आत्मबळ वाढते. बुद्धी अग्र होते. तिचे निश्चय शुद्ध होतात. त्याचबरोबर मनाचा गोंधळ संपून जीवनाचा मार्ग निश्चित होतो. घडणाऱ्या घटनांकडे समबुद्धीने पाहता येते. जीवनांत निश्चिंतता येते. मग खऱ्या अर्थाने जीवन सुख, समाधान, शांतीने भरून जाते. ध्यानामुळे चंचल मन स्थिर, शांत होऊन, बुद्धी अग्र, शुद्ध आणि निश्चयात्मक होते.

….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s