दत्तात्रय पाटील : ग्रामविकासाचा नायक –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/article/pankaj-chavan-article-on-dattatray-patil-and-his-social-work/articleshow/81135200.cms

घरात राजकारणाचा वसा नसताना, भक्कम आर्थिक पाठबळ नसताना, प्रस्थापित सत्तेला सुरुंग लावणं सोपं नाही. पण ही सत्ताबदलाची किमया शहापूरच्या दहिवली गावात घडली आहे. लोकशाहीच्या मंदिरात सर्वोभौमत्त्वाची पूजा बांधावी हा विचार घेऊन ‘दत्तात्रय पाटील’ हा तरुण यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आणि विजयी गुलालानंच न्हाऊन निघाला. काही वर्षांपासून सामाजिक जाणिवांचा वसा घेऊन निस्पृहपणे वंचित, दुर्बल, गोर-गरिबांसाठी काम करणारा, त्यांच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या दत्तात्रयने समाजभान जपत राजकीय क्षेत्रातही दमदार प्रवेश केला आहे.

पंकज चव्हाण

सामान्य कुटुंबातल्या मुलाने गावातल्या राजकारणात प्रवेश करणं आता सोपं राहिलेलं नाही. त्यासाठी अगोदर तुमचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं लागतं. गेल्या काही वर्षापासून दत्तात्रयने सामाजिक कार्यातून स्वत:ची ओळख निर्माण केली. हीच ओळख त्याच्या राजकीय प्रवासाची नांदी ठरली. मुरबाड शहापूर सीमेवर असणारं दहिवली हे दोनशे वस्तीचं गाव. या गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत त्याचे प्राथमिक व माध्यमिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालं. वडील शेतकरी त्यामुळे शेतीतून जे पिकेल त्यावर घर चालायचं. कमावण्याचं दुसरं साधन नसल्याने आर्थिक स्थिती कमकुवत. अशा खडतर परिस्थितीशी झुंज देत तो विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाला. मात्र इथपर्यंत शिक्षणही खडतर होत, याबाबत आठवण सांगताना दत्तात्रय म्हणतो, “बारावीत कॉलेजची फी भरायला पैसे नव्हते, त्यामुळे अंतिम परीक्षेचं हॉल तिकीट मिळत नव्हतं. त्याच दरम्यान निवडणुकांचा काळ होता, उमेदवाराच्या प्रचारातून जे पैसे मिळाले त्यातून फी भरून बारावीची परीक्षा दिली”. एकीकडे आर्थिक दुर्बलतेचे चटके असहाय्य करणारे तर दुसरीकडे पुढील शिक्षण, नोकरीची विवंचना सतावत होती. रडत बसून, हताश होऊन यातून मार्ग निघणार नाही याची पुरेपूर त्याला जाणीव असल्याने, हाताला मिळेल ते काम त्याने स्वीकारलं. कधी मेडिकलमध्ये हेल्पर म्हणून तर कधी औद्योगिक वसाहतीत कामं ककरून.

कामं करत असताना त्याने कला शाखेची पदवी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. शालेय वयापासून वाचनाची, लिखाणाची, वक्तृत्वाची आवड असल्याने अवती-भवतीच्या घटनांचा वेध तो विविध माध्यमातून टिपत असे, शिवाय सामाजिक परिस्थितीविषयी त्याच्या जाणिवा प्रगल्भ होत होत्या. असं म्हणतात, ‘पुस्तकं जीवनाची दिशा बदलतात’. ‘तुम्हाला विचारप्रवृत्त करतात’. याचा प्रत्यय दत्तात्रयला आला तो बारावीच्या परीक्षेनंतर. मुळातच वाचनाची आवड असल्याने त्याने लेखक ‘विश्वास पाटील’ यांची ‘महानायक’ कादंबरी वाचली. ‘सुभाषचंद्र बोस‘ यांच्या जीवनावर आधारलेल्या या प्रेरणादायी कादंबरीने त्याची दृष्टीच बदलली. सुभाषबाबूंचे संघटन कौशल्य त्याच्या नेतृत्वगुणांच्या उदयाचा हुंकार होता. आपल्या गावातील युवकांचं संघटन करून आपलं गाव आदर्श गाव कस करता येईल, या विचाराने गावातील तरुणांच्या साथीने ‘नवक्रांती’ मंडळाची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने गाव विकासात्मक कार्याला सुरुवात केली.

आदर्श गावाची संकल्पना राबविण्यासाठी सातत्यपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम हाती घेण्याचा आग्रह आहे. मंडळ स्थापन केल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. यानिमित्ताने अखंड गाव एकत्र येऊ लागला. संपूर्ण उत्सवकाळात भावभक्तीच्या कार्यक्रमांसोबत सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली. यामध्ये आरोग्य शिबीर घेणं, आधार कार्ड कॅम्प आयोजित करणं, महिला सशक्तीकरणाच्या कार्यक्रमांचं नियोजन करणे अशा कार्यक्रमांतून गावात सामाजिक एकोपा तयार झाला. ‘विशिष्ट ध्येयाने प्रेरित असणारी माणसं ध्येय निश्चिती झाल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत’. दत्तात्रयने गावाच्या विकासासाठी कार्यशील व्हायचं हेच अंतिम ध्येय ठेवल्याने त्या पद्धतीनेच त्याने पावलं टाकायला सुरुवात केली. त्यामुळे त्याने राज्यातील आदर्श गावं पाहिली, त्या गावातील सरपंचांशी चर्चा केल्या आणि आपल्या गावचा विकास कसा करता येईल याची आखणी केली.

दत्तात्रयने गावात तरुणांचं संघटन उत्तम केल्याने गेल्या ११ वर्षांत तरुणांनी गावात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. गावातील वाद-तंटे सुटून गाव आनंदाने नांदावं यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेले अनेक वर्षे तो सामाजिक संस्थेसोबत काम करत आहे. नेहरू युवा केंद्र किंवा शासनाच्या विविध योजनांचा दूत म्हणूनही त्याने काम केले आहे. त्यामुळे ग्रामविकासाच्या विविध योजनांची त्याला माहिती आहे. गावातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणं असो किंवा शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी सहकार्य असो तो तात्काळ करत असतो. आपलं गाव आदर्श व्हावं ही इच्छा मनात बाळगून मार्गक्रमण करताना त्याने ‘संवाद आदर्श गावासाठी’ ही संकल्पना अंमलात आणली आहे.

नवरात्रीत ९ दिवस शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि गावकरी यांच्यात सुसंवाद घडवून आणण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करून गावकऱ्यांना गाव विकासाच्या योजनाची माहिती देण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. सार्वजनिक कार्यक्रमातून गाव एकत्र आलं तर अनेक प्रश्न मार्गी लागतात यासाठी विविध सामाजिक उपक्रम घेण्यासाठी त्याची धडपड सुरू असते. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन मोहीम हाती घेऊन गाव ‘हरित’ करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. गावातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील वर्षी तो शालेय व्यवस्थापन समितीवर सदस्य होता, त्यावेळी त्याने गावातील तरुणांच्या साथीने शाळा सुटल्यानंतर विद्यार्थांची शिकवणी सुरू केली होती. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रम तो घेत असतो.

गावाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या दत्तात्रयने राष्ट्रीय युवा संसद गाजवली आहे. तसेच तो राष्ट्रीय युवा महोत्सव, स्वच्छता समर प्रशिक्षण शिबिरात राष्ट्रीय स्तरावर सहभागी झाला आहे. महामित्र या स्पर्धात्मक उपक्रमात त्याची राज्यस्तरावर निवड झाली आहे. तसेच युवा माहितीदूत या सरकारी योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या उपक्रमाच्या उद्घाटनाचा मान ठाणे जिल्ह्यातून त्यांना मिळाला होता. “तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यायला हवा, आपल्याकडे अजूनही सामान्य तरुणवर्गाला फार कमी संधी दिली जाते ही खेदाची बाब आहे. संविधानिक पदावर काम करताना अनेक मर्यादा असल्या तरी विविध विकासकामे मार्गी लावण्याची ताकद त्यात असते, असे मत दत्तात्रय व्यक्त करतो”. अगदी काही दिवसांपूर्वी तो बिनविरोध निवडून आला. गावाचा आणि तरुणांचा त्याला भक्कम पाठिंबा आहे. गरिबीतून त्याचं नेतृत्व उभं राहिलं आहे, तरुण वयात ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून अनेक युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याने ज्या परिस्थितीतून भरारी घेतली ते पाहता त्याचे पाय मातीशी प्रामाणिक राहतील, असा विश्वास आहे. सध्या तो एका नामांकित संस्थेत काम करत सामाजिक-राजकीय गाडा हाकत आहे. सामाजिक कामातून राजकारणात सक्रिय होणाऱ्या तरुणांमधील दत्तात्रय हे महत्त्वाचं नाव आहे. आगामी काळात ग्रामविकासाचा नायक म्हणून त्याची ओळख निर्माण होईलच, यासाठी त्याला शुभेच्छा देऊया.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s