भुलवायचे की फुलवायचे–महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/article/women-should-not-fall-prey-to-false-promises-says-kshipra-mankar/articleshow/81106309.cms

गोरीपान, देखणी, उंचपुरी अन् अतिशय हरहुन्नरी अशा गौरीला खरे तर सर्वच क्षेत्रात उज्ज्वल भविष्य होते. विशेषतः राजकारणात. तिचे बोलणे, वागणे, राहणे, जनसंपर्क, स्वतःला प्रेझेंट करणे सारेच आकर्षित करणारे होते.

क्षिप्रा मानकर

गोरीपान, देखणी, उंचपुरी अन् अतिशय हरहुन्नरी अशा गौरीला खरे तर सर्वच क्षेत्रात उज्ज्वल भविष्य होते. विशेषतः राजकारणात. तिचे बोलणे, वागणे, राहणे, जनसंपर्क, स्वतःला प्रेझेंट करणे सारेच आकर्षित करणारे होते. गावच्या मातीत, हलाखीच्या परिस्थितीत वाढली असली तरी अनेक जाहीर कार्यक्रमांतील तिचा वावर हा लक्षवेधी होता. सर्वसामान्य मुलींप्रमाणे शहराचा झगमगाट तिलाही खुणावू लागला. पण शहरात आपला टिकाव लागेल कसा या विवंचनेत असताना कुणीतरी हात पुढे केला. गौरीला तो हात, तो स्पर्श, ती आश्वासने, ते भाळणे सारे हवेहवेसे वाटले. पण जरा घाईच झाली.

तिने शहर जवळ केले तसेच त्यालाही. आधुनिक सवयींना जवळ करता करता घसरता पाय अन् गेलेला तोल तिला सावरता आला नाही. गौरीसारख्या अनेक तरुणींनी स्वीकारलेले हे यशाचे शॉर्टकट्‌स पाहता मन उद्विग्न होते. चहुबाजूंनी चाललेल्या बातम्या बलात्कार, विनयभंग, विश्वासघात, नैराश्य, हत्या की आत्महत्या आणि या सर्वांमधे बळी जाणाऱ्यांमध्ये युवापिढीचेच प्रमाण जास्त आहे. मग नेमकी चूक कुणाची? प्रत्येकीला आपला जोडीदार, प्रियकर, गॉडफादर हा हवाच असतो. अनेकांना तो गवसतो. कळतो पण वळत नाही. आपण करंगळी दिली तर समोरचा हात पकडणारच. तेव्हा आपण कुणाच्या हाती हात सोपवतो हे पडताळणे आवश्यक आहे. अनेक गौरींचा घात होतो. त्यामागे अवाजवी अपेक्षा, फाइव्ह स्टार लाइफ स्टाइल, अंथरुणाबाहेर गेलेली पावले, मर्यादेचे उल्लंघन, यशाचा शॉर्टकट हीच कारणे दिसून येतात. मैत्रिणींनो, कधीतरी आत्मपरीक्षण करून बघण्याची आपली तयारी असते का?

आपण राहतो त्या समाजाचेही एक नेतृत्व असते. गॉडफादर असतो. तो कधी वडील, भाऊ, नवरा, अधिकारी, नेता कुणीही असू शकतो. स्त्री, तरुणी जेव्हा अस्थिर होते तेव्हा स्वतःसाठी असा भक्कम आधार शोधू पाहते. पण ती विसरते की आता शिवरायांसारखे गॉडफादर उरलेत कुठे! विश्वासाचा परकोट कधीचाच ढासळला आहे. त्याकाळी परस्त्रीचा आदर होता. स्वराज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग होता. स्त्री ही बुद्धिवान, चरित्र्यवान, चतुर धाडसी व कर्तृत्ववान आहे यावर शिवरायांचा दृढ विश्वास होता. ती भोगाची नाही तर सन्मानाची पवित्र वास्तू मानली जात असे. सर्व जातीधर्मातील, मग ती कल्याणच्या सुभेदाराची सून गौहरबानो असो, लेकासाठी बुरूज सर करणारी हिरकणी असो की किल्लेदार केसरीसिंहाची आई आणि बहीण असो, परस्त्री मातेसमान माननारा तो काळ होता. तसाच स्त्रियासुद्धा जबाबदारीने वागणाऱ्या होत्या. आज मात्र आमिषाला बळी पडणाऱ्या तरुणी दिसताहेत. त्यांचा अधिक बळी जातोय.

शहरात जाऊन आपल्या कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्वाच्या जोरावार स्वतःचा झेंडा फडकविणाऱ्या आदर्श महिला इथे आहेत. त्यांचा असा बळी जात नाही, कारण त्या असला शॉर्टकट शोधत नाही. भाळणे संपल्यावर सांभाळणे येते, हे न समजणारी पुरुषी मानसिकता तरुणींनी वेळीच ओळखायला हवी? आयुष्यात यशस्वी व्हायचे तर स्वतःचीच ध्येय, धोरणे ठरवायची असतात. यशामागे धावत जाताना कुणाला ठेच लागणारच. तेव्हा ठेच लागताच सावरण्याचे कसब तरुणींनी शिकायला हवे. शारीरिक, मानसिक किंवा आर्थिकदृष्ट्या जेव्हा एखाद्या पुरुषाची गरज भासलीच, तर सर्वस्व उधळून देण्यापूर्वी स्वतःचे असे सत्त्व राखता यायला हवे. जे आपल्याला नैराश्य आले तर कामी येईल. ज्या व्हाइट कॉलरला आपण भाळतो, ती आतून किती मळली आहे हे पारखण्याची नजर आपल्याला हवीच. आपल्याला आपला गॉडफादर वाटणारा व्यक्ती आपल्याभोवती कठीण परिस्थितीत परकोट होऊन उभा राहू शकेल का? दिलेली वचने पाळेल का? अखेरपर्यंत आपल्यासोबत उरेल का? याची उत्तरे वेळीच शोधणे गरजेचे आहे.

क्षणिक सुखाच्या मागे न लागता, खोट्या आश्वासनाला बळी न पडता मैत्रिणींनो जरा थांबूया. विचार करूया, कारण ससा होऊन हरल्यापेक्षा कासव होऊन जिंकणे कधीही योग्य. क्षेत्र कुठलेही असो तिथे पोहोचण्यासाठी पावलापावलावरती गुळगुळीत शिड्या भेटतील, पण कायमस्वरूपी टिकण्यासाठी मात्र आपली स्वतःची गुणवत्ताच हवी. शेवटी आकर्षणाने इतरांना भुलवायचे की आपले व्यक्तिमत्त्व फुलवायचे हे आपण ठरवायला हवे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s